आयपीएलचे दोनदा जेतेपद पटकावणारा, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या मालकीचा आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज आणि आयपीएलचे पहिले जेतेपद पटकावणारा राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचे दोन वर्षांसाठी निलंबन करण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय समितीने दिला आहे. त्याचबरोबर श्रीनिवासन यांचा जावई आणि चेन्नई संघाचा माजी संचालक गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थानच्या संघाचा सहमालक राज कुंद्रा हे दोघेही सट्टेबाजीप्रकरणी दोषी आढळले असून यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे, यानंतर या दोघांनाही क्रिकेटशी निगडित कुठल्याही गोष्टींशी संबध ठेवता येणार नाही. या निर्णयांमुळे सभ्य गृहस्थांचा समजला जाणाऱ्या क्रिकेटला काळिमा फासला गेल्याचे म्हटले जात आहे.
२०१३ साली झालेल्या आयपीएलच्या स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाची सुनावणी करताना माजी न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय समितीने हा निर्णय दिला आहे.
‘‘लाचलुचपत प्रतिबंधक संहितेतील २.२.१ या कलमानुसार क्रिकेट या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी मयप्पनवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर ७.५ कलमानुसार मयप्पनवर क्रिकेटशी निगडित गोष्टींशी संबंध ठेवण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर ६ कलमातील ४.२ नियमांनुसार मयप्पनवर कुठल्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्याशी संबंधित राहण्यावरही आजीवन बंदी घालण्यात आली आहे,’’ अशी माहिती लोढा यांनी पत्रकार परीषदेमध्ये दिली.
राजस्थानच्या संघाचा सहमालक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रालाही मयप्पनप्रमाणेच शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निर्णय देण्यासाठी या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये समितीची स्थापना केली होती. चेन्नई सुपर किंग्ज हा संघ इंडिया सिमेंट आणि राजस्थान रॉयल्स हा संघ जयपूर आयपीएल यांच्या मालकीचा होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा