इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेतील भ्रष्टाचारप्रकरणी दोषी आढळलेल्या गुरुनाथ मयप्पन, राज कुंद्रा यांच्यासह चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या फ्रँचाइजीना न्यायमूर्ती लोढा समिती शिक्षा सुनावणार आहे. २०१३मध्ये क्रिकेट विश्वाला काळिमा फासणारे स्पॉट-फिक्सिंग प्रकरण उघड झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने २२ जानेवारी २०१५ रोजी लोढा समितीची नियुक्ती केली होती. या समितीत निवृत्त न्यायमूर्ती आर.एम. लोढा, निवृत्त न्यायाधीश अशोक भन आणि आर. रवींद्रन यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयातर्फे निर्देशित मुदगल समितीने याप्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर केला होता. याप्रकरणी दोषी आढळलेल्या व्यक्तींना लोढा समिती शिक्षा देणार आहे. आयपीएलचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रमण यांचा याप्रकरणातील सहभाग लक्षात घेऊन दोषी आढळल्यास त्यांनाही शिक्षा सुनावण्यात येणार आहे. भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी ही समिती बीसीसीआयला उपाययोजना सुचवणार आहे.

Story img Loader