भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण आता राजकीय खेळपट्टीवर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. युसूफ पठाणला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळाले असून त्यांना बेरहामपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. युसूफ पठाण बहरामपूरमधून अधीर रंजन चौधरी यांच्याविरुद्ध लढणार आहेत.
भारत आघाडीतील जागांवर सुरू असलेल्या गोंधळादरम्यान,तृणमूल काँग्रेसने लोकसभेच्या जागांसाठी ४२ उमेदवारांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये क्रिकेटर युसूफ पठाणच्या नावाचाही समावेश आहे.
युसूफ पठाणव्यतिरिक्त माजी भारतीय क्रिकेटपटू आणि १९८३ विश्वचषक विजेते कीर्ती आझाद यांना दुर्गापूर लोकसभा जागेसाठी तृणमूल काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाले आहे. किर्ती आझाद यांनी यापूर्वी २०१४ मध्ये दरभंगा येथून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकली होती. २०१८ मध्ये त्यांनी भाजपला राम राम ठोकला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नंतर २०२१ मध्ये टीएमसीशीसोबत ते जोडले गेले.
भारतासाठी २००७ ते २०१२ या कालावधीत ५७ एकदिवसीय आणि २२ टी-२० सामने खेळलेला युसूफ पठाण क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखला जात होता. टीम इंडियासाठी एकदिवसीय सामन्यात युसूफने २ शतके आणि ३ अर्धशतकांसह ८१० धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये गोलंदाजी करताना युसूफ पठाणने एकूण ३३ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय टी-२० फॉरमॅटमध्ये त्याने २३६ धावा केल्या आहेत आणि १३ विकेट्सही मिळवल्या आहेत. टीम इंडिया व्यतिरिक्त युसूफ विविध आयपीएल संघांसाठी एकूण १७४ सामने खेळला आहे.