ज्ञानेश भुरे, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि डावखुरे फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. बेदी यांच्या पश्चात पत्नी अंजू, मुलगा अंगद आणि मुलगी नेहा असा परिवार आहे.

बेदी यांच्या गुडघ्यावर अलीकडेच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या वेळी झालेला जंतुसंसर्ग त्यांच्या शरीरात पसरला होता आणि त्यातून ते बरेच झाले नाहीत. सोमवारी राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे बेदी कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

बेदी यांचा जन्म १९४६ मध्ये अमृतसर येथे झाला. बेदी भारतासाठी ६७ कसोटी सामन्यांत खेळले. कारकीर्दीत बेदींनी २६६ गडी बाद केले. त्यांनी १४ वेळा पाच किंवा त्याहून अधिक गडी बाद केले. एकदा सामन्यात १० गडी बाद करण्याची किमया त्यांनी साधली होती. निवृत्तीनंतर बेदी यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक, निवड समिती सदस्य म्हणूनही काम पाहिले. मिणदर सिंग आणि मुरली कार्तिक हे दोन्ही फिरकी गोलंदाज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली घडले. बेदी १९९० मध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाचे व्यवस्थापकही राहिले होते.

हेही वाचा >>> बिशन सिंग बेदींना जेव्हा कोटला स्टेडियमवर प्रवेश नाकारण्यात आला होता

भारताच्या फिरकी युगाचे ते एक शिलेदार होते. इरापल्ली प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर, श्रीनिवास वेंकटराघवन आणि बेदी यांनी १९६६ ते १९७८ या कालावधीत भारतीय गोलंदाजीची बाजू समर्थपणे हाताळली होती. मन्सूर अली खान पतौडी यांच्या निवृत्तीनंतर १९७४ ते १९८२ या कालावधीत बेदी यांनी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. विशेष म्हणजे १९७४ ते १९८२ या कालवधीत सर्वाधिक आठ वर्षे ते नवी दिल्ली रणजी संघाचे कर्णधार होते. मैदानावर जेवढी त्यांची गोलंदाजी भेदक वाटायची तेवढेच मैदानाबाहेरील त्यांची वक्तव्ये अनेकदा वादग्रस्त ठरली होती. निवृत्तीनंतर त्यांची बदलत्या क्रिकेटबद्दलची मते कायमच विरोधी राहिली. त्यांच्या परखड विचारांनी अनेकदा वाद निर्माण केले.

तब्बल १२ वर्षे त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी योगदान दिले. चेंडूला उंची देताना चेंडूवर असणारे त्यांचे नियंत्रण पुढे अभावानेच फिरकी गोलंदाजांना जमले. कसोटी क्रिकेटमध्ये ३१ डिसेंबर १९६६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी कोलकात्यात पदार्पण केले. त्यानंतर १९७९ पर्यंत ते भारतीय संघाचे अविभाज्य घटक बनून राहिले होते. सलग १३ वर्षे भारतीय संघात टिकून राहायचे ही सोपी गोष्ट नाही. यातही २२ सामन्यांत त्यांनी संघाचे नेतृत्वही केले. यात भारताने केवळ सहा सामने जिंकले. अर्थात, तो काळ वेगळा होता. भारतीय संघाची ताकद ही केवळ आणि केवळ फिरकी गोलंदाजीवर अवलंबून होती. क्रिकेट हे त्यांच्या रक्तात होते. त्यामुळे निवृत्तीनंतरही स्वस्थ बसले नाहीत. कधी प्रशिक्षक, तर कधी व्यवस्थापक आणि पुढे जाऊन निवड समिती सदस्य असे ते क्रिकेटशी जोडलेच गेले.

फिरकी गोलंदाजीमध्ये जेव्हा जेव्हा ‘आर्मर’ची चर्चा होते, तेव्हा बेदी यांचेच नाव सर्वप्रथम समोर येते. डावखुऱ्या गोलंदाजाने टाकलेला ‘गुगली’इतका हा चेंडू बेदी यांनी अजरामर केला. बेदी यांचे हे मुख्य अस्त्र होते. कारकीर्दीमधील बहुतेक बळी त्यांनी याच चेंडूवर मिळवले. फलंदाज वर्चस्व राखायला लागला की बेदी या चेंडूचा खुबीने वापर करायचे. सांगून खरेही वाटणार नाही, पण त्यांनी नॉर्दम्प्टनशायरकडून खेळताना इंग्लिश कौंटी क्रिकेटही गाजवले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये १९६१-६२ मध्ये त्यांनी पंजाबकडून रणजी पदार्पण केले; पण त्यांनी पुढे नवी दिल्ली संघाचेच प्रतिनिधित्व केले. तब्बल ८ वर्षे ते दिल्ली संघाचे कर्णधार होते. 

मैदानाबाहेरही बेदी यांचे व्यक्तिमत्त्व वादळी होते. गोलंदाजी करायची सोडली, तरी ते निवृत्तीनंतर अनेकदा आपल्या वक्तव्यांनी वादात सापडले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉनी लिव्हरला चेंडूला व्हॅसलिन लावताना बेदी यांनीच पकडले होते. त्यानंतर १९७६ मध्ये विंडीजमध्ये तुफानी गोलंदाजीच्या कारणामुळे भारताचा डावच त्यांनी घोषित केला होता. इतकेच नाही, तर पंचांचा निर्णय चुकीचा असूनही तो स्वीकारण्याचे धाडस त्यांनी दाखवले होते. यामुळे जिंकत आलेला सामना भारताला गमवावा लागला होता. 

बेदी दिल्लीचे प्रतिनिधित्व करत असले, तरी त्यांना मुंबईच्या क्रिकेटने चांगले प्रभावित केले होते. साधारण ९०च्या दशकातील एक किस्सा आठवतो. विंडीज दौऱ्यात भारतीय संघ साफ अपयशी ठरला होता. तेव्हा भारतीय संघाच्या कामगिरीबाबत बोलताना बेदी यांनी संघातील सर्व खेळाडूंना अरबी समुद्रात बुडवायला हवे, अशी टीका केली. पुढे जाऊन ते असे म्हणाले, त्यांच्या जागी मुंबईचा संघ खेळवला असता तरी चालले असते, कारण मुंबईचे खेळाडू अधिक जिगरबाज खेळ करतात. ‘बीसीसीआय’ आणि दिल्ली जिल्हा क्रिकेट संघाविरुद्ध तर त्यांनी अनेकदा टीका केली. अलीकडेच फिरोजशाह कोटला मैदानाचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम करण्यात आले तेव्हादेखील बेदी यांनी विरोध केला होता. अशा या वादळी व्यक्तिमत्त्वाने आज खऱ्या अर्थाने क्रिकेटचा निरोप घेतला. 

अन् बेदींचा कठोर निर्णय..

भारतीय क्रिकेट संघ बिशन सिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. १९७८ सालच्या या दौऱ्यात भारताने पहिला एकदिवसीय सामना जिंकत आघाडी घेतली. तर, दुसरा सामन्यात पाकिस्तानने विजय नोंदवत मालिका बरोबरीत आणली. तिसऱ्या व निर्णायक सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २०५ धावा केल्या. भारतीय संघ ३७. ४षटकांत २ बाद १८३ धावांसह चांगल्या स्थितीत होता. संघाला जिंकण्यासाठी १४ चेंडूंत २३ धावांची आवश्यकता होती. पाकिस्तानचा गोलंदाज सर्फराज नवाजने सलग चार वेळा ‘बाउन्सर’ टाकला. पंचांनी एकही वेळेस त्याला ‘वाईड’ दिले नाही. पंचांच्या भूमिकेला कंटाळून बेदी मैदानात आले व पाकिस्तानचा कर्णधार मुश्ताक मोहम्मदला प्रश्न करु लागले. यातून वाद झाला व बेदी यांनी फलंदाज अंशुमन गायकवाड व गुंडप्पा विश्वनाथ यांनी माघारी बोलवले.

बिशन सिंग बेदी यांच्या निधनाने वाईट वाटले. भारतीय संघाच्या अनेक विजयांत त्यांनी योगदान दिले. त्यांनी नेहमी युवा क्रिकेटपटूंना प्रोत्साहन दिले.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

ही अत्यंत दु:खद बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मी जेव्हा १९७६ मध्ये पदार्पण केले तेव्हा ते भारताचे कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मी अनेक वर्षे खेळलो. यासह मुंबईकडून खेळताना दिल्लीविरुद्धच्या सामन्यांमध्ये तसेच, पश्चिम विभाग व उत्तर विभागाच्या लढतींमध्ये खेळलो. बेदी हे जागतिक दर्जाचे डावखुरे फिरकी गोलंदाज होते. भारताच्या गाजलेल्या फिरकीपटूंच्या चौकडींमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांची गोलंदाजीची शैली ही दैवी देणगीच म्हणावी लागेल. त्यांनी जगातील दिग्गज फलंदाजांविरुद्ध आक्रमक गोलंदाजी केली आणि त्यांना अडचणीत आणले. मला त्यांनी नेहमीच चांगल्या खेळासाठी प्रोत्साहन दिले.

– दिलीप वेंगसरकर,  भारताचे माजी कर्णधार

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta article pay tribute to former indian cricket team captain and left arm spinner bishan singh bedi zws