तब्बल ६१ वर्षांच्या प्रर्दीघ प्रतीक्षेनंतर विदर्भ क्रिकेट संघाने रणजी करंडक स्पध्रेचे विजेतपद पटकावत क्रिकेट पंडितांना आश्चर्याचा धक्का दिला. संघानेही कधी नव्हे अशी उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली. अर्थातच विजेतेपदाचे खरे शिल्पकार प्रशिक्षक चंद्रकांत पंडित होते. त्यांनी विदर्भाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभळण्यापूर्वीच पुरस्कार रकमेचे काय करणार, असा प्रश्न विचारत विजेतेपदाचे संकेत दिले आणि ते मिळवून दाखवलेही. आता नव्या हंगामातही ते जेतेपद राखण्याचे खडतर आव्हान विदर्भाला पेलावे लागणार आहे. मात्र त्यासाठी ‘एक पाऊल पुढे’ खेळावे लागेल, असे पंडित यांनी सांगितले.

  • विजेतेपद मिळवल्यामुळे नव्या हंगामात दबाव अधिक असेल का?

दबाव नव्हे, विजेतेपद कायम राखण्याचे आव्हान असेल. कारणे प्रतिस्पर्धी संघ विदर्भाकडे विजेता संघ म्हणून बघेल आणि प्रत्येक संघ विदर्भाविरुद्ध खेळण्याची रणनीती अधिक तीव्र करेल. गत वर्षी रणजी करंडकाची उंची विदर्भाने वाढवलेली आहे. त्यामुळे नव्या हंगामात जिंकण्याची पातळी समांतर ठेवणे महत्त्वाचे आहे. विजेतेपदानंतर खेळाचा दर्जा टिकवणे तेवढेच आव्हानात्मक आहे.

  • यंदाच्या हंगामासाठी विदर्भाची काय खास तयारी असेल?

नक्कीच, खेळामध्ये दर वर्षी खास तयारी असतेच. मात्र यंदा आमचा गट बदललेला असेल आणि त्या गटात जिंकण्याची सवय असलेल्या तगडय़ा संघाविरुद्ध आम्हाला सुरुवात करावी लागेल. नव्या हंगामात प्रत्येक सामन्याची रणनीती नव्याने आखावी लागेल. मुलांसाठी रणनीती आता नवी राहिली नसली तरी प्रत्येक संघाविरुद्ध वेगळी रणनीती आम्हाला आखावी लागणार आहे. आखलेल्या रणनीतीप्रमाणेच आम्ही खेळू. यामध्ये फलंदाजाला कसे बाद करायचे किंवा गोलंदाजाला कसे हाताळायचे हे कौशल्य खेळाडूंना दाखवावे लागेल. मात्र त्यासाठी आम्हाला एक पाऊल पुढे खेळावे लागेल हे नक्की.

  • विदर्भातील उदयोन्मुख क्रिकटेपटूंबद्दल काय सांगाल?

– विदर्भात नवा दमाच्या खेळाडूंमध्ये प्रचंड प्रतिभा आहे आणि ती समोर येऊ लागली आहे. त्यांचे कौतुक केलेच पाहिजे. आज दुलीप करंडकामध्ये विदर्भाच्या सहा खेळाडूंचा समावेश आहे. १९ वर्षांखालील युवा संघातही विदर्भाच्या खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. गत वर्षी रजनीश गुरबानी, आदित्य ठाकरे, अर्थव तायडे, फैज फजलने कठीण परिस्थतीतून संघाला तारले. त्यामुळे विदर्भाच्या खेळाडूंचे भविष्य उज्ज्वल आहे. रणजीनंतर प्रथमच इराणी चषकही जिंकूण विदर्भाने दुहेरी इतिहास रचला आहे. अशात त्यांचा आत्मविश्वासही वाढत आहे. विदर्भ आता कमकुवत संघ नाही हे खेळाडूंनी सिद्ध केले आहे.

  • विदर्भाला व्यावसायिक खेळाडूंची गरज आहे का?

– होय, व्यावसायिक खेळाडूंची गरज आहे. कारण संघातील तरुण खेळाडू आता परिपक्व होण्याच्या प्रक्रियेत आहेत. अशा वेळी त्यांना व्यावसायिक खेळाडूंचा अनुभव आणि मार्गदर्शनातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. वसिम जाफरने गेल्या हंगामात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संघातील इतर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला आहे. शिवाय सामना जिंकण्यासाठी तांत्रिक माहिती व्यासायिक खेळाडूंकडूनच अवगत होते. त्यांनाच बघूनच नवोदित त्यांच्याप्रमाणे खेळण्यास भर देतात. अजूनही विदर्भाच्या खेळाडूंना भरपूर काही शिकण्याची गरज आहे. त्यामुळे भविष्यात व्यावसायिक खेळाडूंची गरज असेलच. शिवाय वरच्या पातळीचे डावपेच समजण्यासाठी आणि खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील.

  • कर्णधार म्हणतो, पंडितसर खडूस प्रशिक्षक आहेत, याविषयी काय सांगाल?

होय, मी खडूस आहे आणि आयुष्यभर राहणार. खरे तर खडूस म्हणजे शेवटपर्यंत खेळ सोडायचा नाही. भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंगलंडने शेवटपर्यंत सामना सोडला नाही. त्यालाच मी खडूसपणा म्हणतो. मैदानावर कोणतीही परिस्थीती ओढवली असली तरी तिचा सामना तुम्हाला करता आला पाहिजे. त्या कठीण वेळी उभे राहण्याची ताकद खेळाडूत असली पाहिजे. हीच नेमकी बाब मी खेळाडूंना शिकवत असतो. तुम्ही शतक ठोकले तर त्याचे कौतुक होईलच. मात्र त्या शतकाचे चीज झाले पाहिजे.