दयानंद लिपारे
दादू चौगुले, ध्यानचंद पुरस्कार
कोल्हापूरच्या तेज:पुंज कुस्ती परंपरेतील एक लखलखीत नाव म्हणजे रुस्तम-ए-हिंद दादू चौगुले. समकालीन नामवंत मल्लांना अस्मान दाखवणारे वज्रदेही मल्ल. मैदानातील कुस्ती, कुस्तीचा प्रसार, संघटन, प्रशिक्षण अशा सर्व क्षेत्रांत प्रभावी कामगिरी करणाऱ्या दादूमामांना केंद्र सरकारने मानाचा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांच्यासोबत कुस्ती क्षेत्रात कार्यरत असलेल्या मल्लांना हा पुरस्कार दशकभरापूर्वीच जाहीर झाला, तुलनेत आता बराचसा उशीर झाला असला तरी त्यांचे शल्य मनाला लावून न घेता हा उमद्या मनाचा मल्ल वयाच्या सत्तरीतही नवी पिढी ऑलिम्पिकमध्ये चमकावी यासाठी भल्या पहाटेपासून कार्यरत आहे.
कुस्तीच्या जागतिक नकाशावर कोल्हापूर हे ‘कुस्तीपंढरी’ म्हणून ओळखले जाते. राजर्षी शाहू यांच्या उदार आश्रयाखाली मल्लविद्येचा विकास झाला. तेव्हापासून अनेक मल्लांनी कोल्हापूरची वाट पकडली. त्यातील एक झळाळते नाव म्हणजे दादू चौगुले. ते लाल मातीत आले ते वयाच्या दहाव्या वर्षी. राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथील या मुलाने कोल्हापुरातील मोतीबाग तालमीची पायरी चढली ती आजतागायत मुक्काम येथेच आहे. कुस्तीचे बाळकडू वस्ताद हिंदकेसरी गणपत आंदळकर, बाळू बिरे यांच्याकडू शिकून घेतले.
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दादू चौगले यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली. अल्पावधीत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा नावलौकिक जगभर पोहोचला. डाव-प्रतिडावचे आकलन झाल्यावर महाराष्ट्र केसरीसह मोठय़ा स्पर्धा गाजवण्यासाठी त्यांनी शड्डू ठोकला. संघटक बाळ गायकवाड यांनी या वेळी केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले. १९७० साली परशुराम पाटील यांना पराभूत करून ‘महाराष्ट्र केसरी’, १९७३ साली दीनानाथसिंग यांना अवघ्या एका मिनिटात नमवून ‘रुस्तम-ए-हिंद’ आणि याच वर्षी दिल्लीच्या नेत्रपाल यांना लोळवून ‘महान भारत केसरी’ या मानाच्या गदा चौगुले यांनी आपल्या खांद्यावर मिरवल्या. देशातच नाही तर विदेशातही त्यांची कामगिरी अजोड राहिली. १९७३ साली ऑकलंड या न्यूझीलंडच्या राजधानीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत १०० किलो वजनी गटात फ्री स्टाइल प्रकारात त्यांनी रौप्यपदकावर नाव कोरले. सत्पालबरोबर झालेल्या लढती कुस्तीमुळे ते चर्चेत राहिले.
त्यांची कुस्तीपरंपरा मुलगा विनोदने ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून पुढे चालू ठेवली. तर आता दादूमामा नातू अर्जुन याला रशियात अद्ययावत कुस्ती प्रशिक्षण देण्याचा विचार बोलून दाखवतात. अर्जुनसह कोल्हापूरचे पैलवान ऑलिम्पिक स्पर्धेत यशस्वी झाल्याचे पाहणे हे त्यांचे स्वप्न आहे. प्रख्यात अभिनेता आमिर खान ‘दंगल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पाश्र्वभूमीवर हिंदकेसरी दादू चौगुले मार्गदर्शन करीत असलेल्या मोतीबाग तालमीला भेट देण्यासाठी आल्यावर ही तालीम वलयांकित बनली.
कुस्तीच्या प्रसार आणि संघटनेसाठी दादूमामा सातत्याने सक्रिय राहिले आहेत. शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष म्हणून दादू चौगुले जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे गेली सात वर्षे उपाध्यक्ष, मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचे विश्वस्त, रुस्तम-ए-हिंद मल्ल दादू चौगुले व्यायाम मंडळाचे संस्थापक अशा भूमिकेतून त्यांच्यातील संघटक कुस्तीच्या प्रगतीसाठी कार्यरत राहिला आहे. त्यांच्या या साऱ्या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने १९७४ साली त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले आणि आता मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याने दादू चौगुले यांना आजवरच्या परिश्रमाचे चीज झाल्याचे वाटले.