आठवडय़ाची मुलाखत : डॅरिल डिसुझा, माजी ऑलिम्पिकपटू

जर्मनी, इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारतीय हॉकी संघाचे आक्रमण, व्यक्तीनुरूप प्रतिकार आणि बचाव कौतुकास्पद होता. आपण गेल्या वर्षभरातील संघाची कामगिरी पाहिल्यास त्यात आमूलाग्र बदल झालेला जाणवेल. रिओ ऑलिम्पिकच्या दृष्टीने भारताची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे, असे मत माजी ऑलिम्पिकपटू डॅरिल डिसुझा यांनी व्यक्त केले. १९९२च्या ऑलिम्पिक स्पध्रेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या डिसुझा यांनी  हॉकीच्या अधोगतीच्या कारणांवरही बोट ठेवले.

*  भारतीय संघाच्या कामगिरीचे तुम्ही कसे विश्लेषण कराल?

गेल्या सहा महिन्यांत भारतीय संघाच्या कामगिरीचा आलेख पाहून समाधान वाटते. संघातील या बदलाने आम्हालाही अचंबित केले आहे. जर्मनीसारख्या संघाला बरोबरीत रोखणे ही मोठी बाब आहे. आक्रमण आणि बचाव या आघाडींवर आपण वरचढ होतोच, परंतु रोलँट ओल्टमन्स यांच्या व्यक्तीनुरूप प्रतिकार रणनीतीचीही खेळाडूंनी चोख अंमलबजावणी केली. याच पद्धतीचा खेळ केल्यास रिओ ऑलिम्पिकला पहिल्या सहामध्ये स्थान निश्चित पटकावू शकतो. १९८४ नंतर भारतीय संघाला अव्वल सहामध्ये स्थान मिळवता आलेले नाही. २०१२मध्ये तर संघाला तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले.

*  काळानुरूप बदल स्वीकारण्यात भारतीय संघ अपयशी ठरल्यामुळेच हॉकीची अधोगती झाली का, की याला अजून काही कारणे आहेत?

मला असे वाटत नाही. हॉकीत झालेले बदल आपल्या खेळाडूंनी पूर्णपणे आत्मसात केले आहेत. मात्र, पायाभूत सुविधांमधील सुधारणा अद्याप आपल्याकडे झालेली नाही. आज मुंबईचा विचार केल्यास येथे दोन ते तीनच अ‍ॅस्ट्रो टर्फ मैदाने आहेत. हाच आकडा महाराष्ट्रात १०-१२ असेल. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाइतका असलेल्या हॉलंडमध्ये ३५०हून अधिक अ‍ॅस्ट्रो टर्फ आहेत. यावरून आपण पायाभूत सुविधांच्या बाबतीत किती मागासलेलो आहोत याचा अंदाज येईलच. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित प्रशिक्षक, अजून इतरही बाबतीत आपण पिछाडलेलो आहोत. यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे.

*  भारतीय संघ अजूनही पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरत आहेत.

पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करण्यात अजूनही आपल्याला हवे तितके यश मिळत नाही, यात तथ्य आहे. पण ओल्टमन्स रिओपूर्वी यावर अभ्यास करून नक्की तोडगा काढतील. ते संघासोबत गेली तीन-चार वष्रे आहेत. पूर्वी ते तांत्रिक समितीचे मुख्य म्हणून होते, आता ते प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. पण त्वरित निकालाची अपेक्षा करणे चुकीचे आहे.

*  ऑलिम्पिकमध्ये बलाढय़ संघाचे आव्हान  पेलण्यासाठी भारताने कोणती रणनीती वापरावी?

ऑलिम्पिकमध्ये दोन्ही गटांत चुरशीचे सामने पाहायला मिळतील. भारतासाठी एक जमेची बाजू म्हणजे त्यांना आर्यलड व कॅनडा या तुलनेने कमकुवत संघांविरुद्ध खेळायचे आहे. त्यामुळे या दोन्ही लढती जिंकून आपल्याला सहज अव्वल आठमध्ये स्थान मिळू शकते. यंदा नियमातही बदल झाल्यामुळे पहिला अडथळा पार करण्यासाठी हे विजय महत्त्वाचे आहेत.

*  कोणत्या खेळाडूकडून अधिक अपेक्षा आहेत?

सरदारा सिंग, आर. श्रीजेश यांच्याकडून अपेक्षा जास्त आहेत. त्यांच्या मदतीला व्ही. आर. रघुनाथ, एस. व्ही. सुनील, मनदीप सिंग, आकाशदीप सिंग हे असल्यास संघ अजून बळकट होईल.

 

Story img Loader