|| ऋषिकेश बामणे
आठवडय़ाची मुलाखत: मोहम्मद घुफ्रान, भारतीय कॅरमपटू
राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे विजेतेपद मिळवले असले तरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धामध्ये मला नेहमीच निराशा पत्करावी लागली आहे. त्यामुळे आता सर्वप्रथम राष्ट्रीय विजेतेपद मिळवण्याचे ध्येय मी डोळ्यांसमोर ठेवले आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कॅरमपटू मोहम्मद घुफ्रानने व्यक्त केली.
रत्नागिरी येथे नुकत्याच झालेल्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत मोहम्मदने कारकीर्दीत पहिल्यांदाच राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटातील विजेतेपदावर कब्जा केला. २९ वर्षीय मोहम्मद हा मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील मुरादाबादचा; परंतु कॅरमच्या प्रेमापोटी मुंबईत स्थलांतरित झालेला मोहम्मद सध्या व्यावसायिक पातळीवर इंडियन ऑइलचे प्रतिनिधित्व करतो. भविष्यातील योजनांविषयी आणि आतापर्यंतच्या वाटचालीविषयी मोहम्मदशी केलेली ही खास बातचीत-
- राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी कशा प्रकारे तयारी केलीस?
खरे सांगायचे तर मी या स्पर्धेसाठी काहीही विशेष तयारी केली नव्हती. मुंबईत किंबहुना महाराष्ट्रात दर महिन्याला किमान एक-दोन स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे त्यासाठी दिवसातून प्रत्येकी सहा ते आठ तास मी सराव करतोच. या स्पर्धेत मला प्रामुख्याने मुंबई-पुण्याच्या खेळाडूंकडूनच कडवी झुंज मिळणार, याची अपेक्षा होती. त्यानुसारच मी रणनीती आखली व विजेतेपद मिळवले. सांघिक गटात मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्याची खंत आहे.
- तुझा आतापर्यंतचा प्रवास कसा होता?
वयाच्या ६-७व्या वर्षी वडील यामिन घुफ्रान आणि मोठा भाऊ यांना क्लबमध्ये कॅरम खेळताना पाहून मला या खेळाची आवड निर्माण झाली. तेव्हाच मी कॅरममध्ये कारकीर्द घडवण्याचा निश्चय केला. त्या वेळी उत्तर प्रदेशमध्ये कॅरमच्या फारशा स्पर्धा नसायच्या. त्याचबरोबर प्रशिक्षणाचे वर्गही मोजकेच असायचे, त्यामुळे घरातच वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मी कॅरमचे बारकावे शिकू लागलो. हळूहळू जिल्हा आणि राज्य स्तरावरच्या स्पर्धामध्ये मी सहभागी होऊ लागलो. वयाच्या १८व्या वर्षी २००८ मध्ये वाराणसी येथे झालेली राष्ट्रीय कनिष्ठ स्पर्धा जिंकलो व तेथून खऱ्या अर्थाने माझी कारकीर्द बहरली. २०१२ मध्ये मी आंतर-विभागीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. पुढे २०१४च्या विश्वचषकात मला प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी लाभली. मात्र तेथे मी एकेरीचे विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरलो; परंतु विश्वचषकात खेळण्याचे माझे एक स्वप्न पूर्ण झाले. त्या वेळी मी एअर इंडियाचे प्रतिनिधित्व करायचो. मात्र २०१५ मध्ये मला इंडियन ऑइलतर्फे बोलावणे आले आणि ती संधी साधून मी मुंबईत स्थायिक झालो.
- आगामी स्पर्धासाठी कशा प्रकारे योजना आखल्या आहेस?
आजवर कारकीर्दीत मी अनेक राज्य मानांकन स्पर्धा जिंकल्या. आता राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा चषकही माझ्याकडे आहे. मात्र राष्ट्रीय स्पर्धामध्ये मला नेहमीच विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धापेक्षा राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवणे नेहमीच कठीण असते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत श्रीलंका, कॅनडा यांसारख्या कडवी झुंज देणाऱ्या देशांतील खेळाडूंविरुद्ध विजय मिळवल्यास तुम्ही किमान उपांत्य फेरीपर्यंत सहज मजल मारू शकता. मात्र राष्ट्रीय स्पर्धेत तुम्ही पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०१७ मध्ये फेडरेशन चषकाचे विजेतेपद मिळवल्यानंतर मला एकही राष्ट्रीय स्तरावरील विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे सर्वप्रथम वर्षांच्या अखेरीस होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत मला विजेतेपद मिळवून स्वत:ला अधिक सिद्ध करायचे आहे.
- कॅरमच्या सद्य:स्थितीविषयी तुझे काय मत आहे?
महाराष्ट्रात सध्या ज्या प्रकारे कॅरमचे वारे सुसाट वाहात आहेत, ते पाहता येणाऱ्या काही वर्षांत हा खेळ अधिक उंची गाठेल अशी आशा आहे. विशेषत: आता चाहत्यांना यू-टय़ूबवरून थेट सामने पाहण्याची सोय उपलब्ध आहे. त्याशिवाय खेळाडूंना रोजगाराच्या संधीही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. रत्नागिरी कॅरम लीगप्रमाणे राष्ट्रीय-आतंरराष्ट्रीय पातळीवरील कॅरम लीग सुरू झाल्यास खेळासाठी अधिक लाभदायी ठरेल. त्यामुळे युवा पिढीने कॅरमकडे फक्त करमणुकीचे साधन म्हणून न पाहता त्यामध्ये कारकीर्द घडवण्याचा विचार करावा, अशी माझी अपेक्षा आहे.