रोहित शर्मा आणि ए. बी. डी’व्हिलियर्स यांची फलंदाजी अतिशय आवडते; पण कोणत्याही क्रिकेटपटूसारखे होण्यापेक्षा मला स्वत:च्याच नावाचा ठसा उमटवायचा आहे, असे मुंबईच्या रणजी विजयात सिंहाचा वाटा उचलणारा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरने सांगितले.
वयाच्या चौथ्या वर्षीच श्रेयसने हातात बॅट घेतली. वडील संतोष अय्यर महाविद्यालयीन स्तरापर्यंत खेळले होते. मात्र आपल्या मुलाने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करावे, अशी त्यांची इच्छा होती. तिथूनच श्रेयसच्या वाटचालीला प्रारंभ झाला. २००४ मध्ये शिवाजी पार्क जिमखान्याच्या क्रिकेट अकादमीत सहभागी होण्यासाठी १० वर्षांचा श्रेयससुद्धा निवड चाचणीला सामोरा गेला. मात्र अकादमीच्या २५ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यात तो अपयशी ठरला; परंतु पुढील वर्षी पुन्हा निवड चाचणीला ये, असा सल्ला प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी त्याला दिला. दुसऱ्या प्रयत्नात मात्र अकादमीची दारे त्याच्यासाठी खुली झाली. अमरे, पद्माकर शिवलकर यांच्यासारख्या अनेकांच्या मार्गदर्शनामुळे या हिऱ्याला पैलू पडत गेले. गेल्याच वर्षी श्रेयसने दिमाखात रणजी पदार्पण केले. यंदाच्या हंगामात ७३.३९ च्या धाव सरासरीने चार शतके आणि सात अर्धशतकांच्या साहाय्याने त्याने रणजीतील सर्वाधिक १३२१ धावा केल्या. गतवर्षी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून तो आयपीएल खेळला. याशिवाय सर्वात जास्त बोली रक्कम (२ कोटी ६० लाख) लागलेला तो बिगरआंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू ठरला होता. श्रेयसशी त्याच्या कारकीर्दीविषयी केलेली खास बातचीत –
* यंदाच्या रणजी हंगामातील कामगिरीविषयी काय सांगशील?
मागील हंगामात रणजी पदार्पण करताना मी ८०९ धावा केल्या होत्या. त्यामुळे या हंगामात तो आकडा मागे टाकण्याचे उद्दिष्ट माझ्यासमोर होते. इतक्या धावा झाल्यामुळे स्वाभाविक माझा आत्मविश्वास उंचावला आहे.
* तुझ्या फलंदाजीत वीरेंद्र सेहवाग दिसतो, असे क्रिकेटविश्वात म्हटले जाते. याबाबत तुझे काय मत आहे?
मी आम्हा दोघांच्या फलंदाजीतील साम्यतेकडे अद्याप एवढय़ा बारकाईने पाहिलेले नाही. सेहवागने अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द अजूनही सुरू झालेली नाही. ते महान फलंदाज आहेत, मी स्वत:ला घडवतो आहे; परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी कोणाशीही तुलना केलेली मला आवडत नाही.
* मुंबईच्या यंदाच्या हंगामातील कामगिरीचे तू कसे विश्लेषण करशील?
यंदाच्या रणजी हंगामातील आंध्र प्रदेशविरुद्धची पहिली लढत अनिर्णीत राहिली होती आणि फक्त एक गुण आम्हाला मिळाला होता. मात्र दुसऱ्या सामन्यापासून मुंबईने आत्मविश्वासाने भरारी घेतली. चार सामने आम्ही निर्णायकपणे जिंकले, तर दोन सामन्यांत पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर गुण कमावले. एकंदर हंगामात आम्ही एकसुद्धा सामना हरलो नसल्यामुळे विजेतेपदासाठी मुंबईचाच संघ खऱ्या अर्थाने लायक होता.
* क्रिकेटप्रमाणेच फुटबॉलचेही प्रेम तू जोपासतोस?
मी गांभीर्याने फुटबॉल खेळायचो. निवड चाचणीलासुद्धा मी सहभागी झालो होतो. मात्र फुटबॉलपेक्षा क्रिकेटवर माझे अधिक प्रेम असल्याने याच खेळात कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला.
* तू गोलंदाज म्हणून क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात केलीस आणि नंतर फलंदाज म्हणून नावारूपाला आलास. हे सारे कसे घडले?
मी मुळात अष्टपैलू खेळाडू होतो. मध्यमगती गोलंदाज याकडे मी गांभीर्याने लक्ष द्यायचो. मात्र शिवाजी पार्क जिमखान्याकडून खेळायला लागलो, तशी माझी फलंदाजी बहरत गेली. मग धावा आणि शतकांमुळेच मी फलंदाज म्हणून घडू लागलो.
* आयपीएल आणि प्रथम श्रेणी क्रिकेट याकडे तू कसे पाहतोस?
क्रिकेटचे हे दोन्ही प्रकार पूर्णत: स्वतंत्र आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू क्वचितच खेळतात. मात्र आयपीएलमध्ये जगातील गाजलेल्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते. जगातील सर्वोत्तम गोलंदाजी अनुभवायला तिथे मिळते. गेल्या वर्षी दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएल खेळताना जीन-पॉल डय़ुमिनी आणि झहीर खान यांचे मार्गदर्शन लाभले.
* कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या क्रिकेटच्या तीन प्रकारांकडे तू कसे पाहतोस?
या तिन्ही प्रकारांत मी आत्मविश्वासाने खेळू शकतो. त्यामुळे या प्रकारांना न्याय देणारा क्रिकेटपटू मला व्हायचे आहे. माझी फलंदाजीची शैली आक्रमक आहे. मी धावा केल्या, तरच माझा संघ जिंकेल, अशी माझी धारणा असते. मात्र धिम्या गतीने फलंदाजी करणे मला जमत नाही. प्रत्येक खेळाडूप्रमाणेच भारतीय संघात स्थान मिळवण्याचे माझे उद्दिष्ट आहे. याचप्रमाणे विश्वविजेत्या भारतीय संघाचा खेळाडू व्हायचे स्वप्न मी बाळगले आहे.