आठवडय़ाची मुलाखत : भूषणसिंग ठाकूर, आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक
संख्यात्मक विकास साधल्याशिवाय गुणात्मक प्रगती होत नाही. हे लक्षात घेऊनच भारतीय टेबल टेनिस महासंघाने दोन्ही गोष्टींवर भर देण्यास सुरुवात केली आहे. आणखी चार वर्षांमध्ये या खेळातील खेळाडूंची संख्या एक कोटीपर्यंत नेण्याचे ध्येय आहे व हे ध्येय निश्चित साकार होईल, असे आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक भूषणसिंग ठाकूर यांनी सांगितले.
महासंघातर्फे स्टॅग फाऊंडेशनच्या सहकार्याने टेबल टेनिसचा तळागाळापर्यंत प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे. आगामी चार वर्षांमध्ये देशात २० हजार ठिकाणी नवोदित खेळाडूंसाठी प्रशिक्षण अकादमी सुरू करण्याचा मानस आहे. या प्रकल्पाच्या प्रमुखपदी ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकूर यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेतला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय दर्जाचे खेळाडूही झाले आहेत. नवीन प्रकल्पाविषयी ठाकूर यांच्याशी केलेली बातचीत-
- संख्यात्मक वाढीवर भर देण्यामागील उद्देश काय सांगता येईल?
आपल्या देशात अनेक वेळा परदेशी प्रशिक्षक नियुक्त केले जात असतात. त्यांचा दर्जा खूप चांगला असतो यात कोणतीही शंका नाही. मात्र हे प्रशिक्षक प्रत्येक खेळाडूला वेगवेगळ्या शैलीचे फटके मारण्यावर भर देत असतात. जर या खेळाडूला त्याच्याइतकेच फटके मारू शकणारा सहकारी नसेल, तर या खेळाडूच्या तंत्रात अपेक्षेइतकी प्रगती होत नाही. हे लक्षात घेऊनच खेळाडूंची संख्या वाढण्यावर प्राधान्य दिले जात आहे. चांगले प्रतिस्पर्धी मिळाले तरच खेळाडूला आपल्या खेळातील गुणदोषांचा अधिक प्रभावीपणे अभ्यास करता येतो आणि त्यानुसार तो आपल्या शैलीत सुधारणा करू शकतो.
- नवीन प्रकल्पाला कोठे सुरुवात झाली आहे व त्यास प्रतिसाद कसा मिळाला आहे?
आसाममधील या प्रकल्पाचे पहिले शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यास खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामधून साधारणपणे ८० मुला-मुलींनी या खेळात करिअर करण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पांतर्गत सहा वर्षांवरील खेळाडूंना भाग घेता येणार आहे. कमाल वयाची कोणतीच मर्यादा नसल्यामुळे या प्रकल्पास भरपूर लोकप्रियता मिळेल अशी अपेक्षा आहे. आसामातील शिबिरात एक-दोन मुला-मुलींच्या पालकांनीही या खेळाचे प्रशिक्षण घेण्याचे ठरविले आहे. आपले पालक खेळत आहेत असे पाहिल्यानंतर मुलांचाही उत्साह वाढतो.
- या शिबिरांतून ऑलिम्पिकसाठी नैपुण्यशोध घेतला जाणार आहे काय?
होय. मात्र आम्ही २०२४च्या ऑलिम्पिकसाठी गुणवान खेळाडू तयार करण्यावर भर देत आहोत. २०२०पर्यंत एक कोटी खेळाडू होतील अशी अपेक्षा आहे. त्यामधून सर्वोत्तम दोनशे खेळाडूंची निवड करण्यात येईल. या खेळाडूंमधून साधारणपणे २० ते ३० खेळाडू संभाव्य ऑलिम्पिकपटू होतील, असा प्रयत्न राहणार आहे. जगातील अव्वल दर्जाचे प्रशिक्षक पीटर कार्लसन यांचे मार्गदर्शन या खेळाडूंना मिळणार आहे. त्याचबरोबर या खेळाडूंना परदेशातील स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी दिली जाईल. ऑस्ट्रिया, स्पेन, उत्तर कोरिया आदी देशांमध्ये होणाऱ्या लीग स्पर्धामधून या खेळाडूंना तुल्यबळ प्रतिस्पध्र्याबरोबर खेळण्याची संधी मिळेल. साहजिकच त्यांना भरपूर अनुभव मिळेल व त्यांच्या तंत्रातही सुधारणा होईल.
- तंदुरुस्तीबाबत काय विशेष प्रयत्न केले जाणार आहेत?
आपले खेळाडू परदेशी खेळाडूंच्या तुलनेत शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीमध्ये कमी पडतात, हे ओळखूनच त्यावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे. केवळ तीन तास स्पर्धात्मक खेळावर भर देऊन अपेक्षेइतका सराव होत नाही. त्याच्या जोडीला एक तास पूरक व्यायामावरही लक्ष देण्याची आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन लवचिकता, शारीरिक क्षमता वाढविणे, हातापायांच्या हालचाली कशा जलद रीतीने होतील यावर भर दिला जाणार आहे. खेळाडूंचा सर्वागीण विकास कसा होईल हेच आमचे ध्येय असून त्या दृष्टीनेच नियोजन करण्यात आले आहे व त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.