आठवडय़ाची मुलाखत : देबाशीष मोहंती, भारताचा माजी वेगवान गोलंदाज

देशात वेगवान गोलंदाजी घडवण्यासाठी अकादमी असण्याची नितांत आवश्यकता आहे. वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर विचार करायचा तर ती उत्तरेकडेच असायला हवी, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज देबाशीष मोहंती यांनी व्यक्त केले

‘‘उंची, शरीरयष्टी यांची उत्तम साथ असलेल्या १४ वर्षांखालील मुलांची या अकादमीसाठी निवड करता येईल. मग त्यांच्या प्रशिक्षणाचे कार्य अंतिम टप्प्यात येईपर्यंत त्यांना स्पर्धात्मक अनुभव द्यावा, परंतु ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये खेळवू नये,’’ असे मोहंतीने सांगितले. देशातील वेगवान गोलंदाजीची सद्य:स्थिती आणि आगामी मालिकांविषयी मोहंतीशी केलेली खास बातचीत-

  • भारतातून चांगले फिरकी गोलंदाज निर्माण होतात, पण वेगवान गोलंदाज नाहीत; परंतु शेजारच्या पाकिस्तानमधून मात्र एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज घडत आहेत. या फरकाविषयी काय सांगशील?

भौगोलिकता हीसुद्धा यासाठी महत्त्वाची असते. पाकिस्तानमधील वातावरण हे त्यासाठी अनुकूल आहे. भारताच्या उत्तरेकडील वातावरण हे थोडेसे वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. मात्र दक्षिण आणि पूर्वेकडील वातावरणात अतिशय फरक आहे. याशिवाय आणखी बऱ्याच गोष्टी यासाठी जबाबदार असतात.

  • देशातील कसोटी मालिकेत आपली प्रमुख मदार ही नेहमी फिरकीवर असते. भारताच्या वेगवान माऱ्याविषयी तुझे काय मत आहे?

होय, देशातील मालिकेविषयी सांगायचे तर आपण फिरकी गोलंदाजीवर विसंबून असतो, कारण ते सामने जिंकून देत आहेत; पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेचा विचार केल्यास आपल्या वेगवान गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आहे. भुवनेश्वर कुमारच्या पाच बळींनी सामन्याचे चित्र पालटले होते. मोहम्मद शमी आणि अनुभवी इशांत शर्मासुद्धा टिच्चून गोलंदाजी करीत आहेत. पाच-वर्षांपूर्वी फक्त फिरकी गोलंदाजी हीच आपली क्षमता होती. सध्या किमान आपल्या कामगिरीत वेगवान गोलंदाजांचेही योगदान दिसून येत आहे.

  • परदेशातील दौऱ्यांकडे तू कसा पाहतोस?

भारतातील आणि परदेशातील खेळपट्टय़ा यांच्यात बराच फरक आहे. देशातून अनेक उत्तमोत्तम फिरकी गोलंदाज घडले आहेत. त्यामुळे भारतात जेव्हा मालिका होतात, तेव्हा अनुकूल खेळपट्टय़ांवर फिरकीचे वर्चस्व असणे स्वभाविक आहे; परंतु परदेशात वेगवान माऱ्यावर भरवसा ठेवावा लागतो. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातसुद्धा हे दिसून आले.

  • पुढील वर्षभरात भारताला बरेच कसोटी सामने खेळायचे आहेत. आगामी न्यूझीलंड मालिकेकडे तू कसे पाहतोस?

काही दिवसांपूर्वी आपण वेस्ट इंडिजला त्यांच्या देशात हरवण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. त्यामुळे ही सुरुवात तर अतिशय सकारात्मक झाली आहे. एकापाठोपाठ एक ही आव्हाने असल्यामुळे खेळाडूंची तंदुरुस्ती महत्त्वाची असेल. या पाश्र्वभूमीवर न्यूझीलंडविरुद्धची मालिका रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे.

  • ओरिसामधील क्रिकेटविषयी काय सांगशील?

इथले क्रिकेट संक्रमण अवस्थेतून जात आहे. आगामी रणजी हंगामाची आमची तयारीसुद्धा चालू आहे. हंगामपूर्व काही स्पर्धाचा अनुभवसुद्धा यासाठी पूरक ठरू शकेल. त्यामुळे ही वाटचाल सकारात्मक पद्धतीने सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.