प्रशिक्षक आणि खेळाडू या नात्यातील गुरू हा पालकाप्रमाणेच, किंबहुना त्यापेक्षा अधिक आत्मीयतेने शिष्याचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यामुळे यश मिळवण्यासाठी प्रशिक्षकाला अशा बऱ्याच भूमिका वठवाव्या लागतात, असे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांनी सांगितले. रिओ ऑलिम्पिकमध्ये ‘प्रोडय़ुनोव्हा’ हा अतिशय कठीण प्रकार सादर करून जगभरातील क्रीडारसिकांची मने जिंकणाऱ्या जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकरच्या यशात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

‘‘प्रशिक्षक आणि खेळाडू या दोघांमधील समन्वय जर नीट नसेल तर खेळाडूचा ठरावीक पातळीपर्यंत विकास होईल. मात्र मोठय़ा प्रमाणात यश मिळवण्यासाठी या समन्वयाची अतिशय आवश्यकता आहे. कधीकधी मला दीपाच्या मैत्रिणीची भूमिका वठवावी लागते, तर कधी प्रशिक्षक होऊन तिला शिस्तीचा बडगा दाखवावा लागतो,’’ असे नंदी यांनी गुरू-शिष्य नात्याचे महत्त्व विशद करताना सांगितले. ऑलिम्पिक स्पध्रेच्या पाश्र्वभूमीवर नंदी यांच्याशी केलेली खास बातचीत-

  • दीपामध्ये कोणत्या खास गोष्टी आहेत?

आक्रमक स्वभाव ही दीपाची प्रमुख खासियत आहे. तिला सदैव काही तरी करायचे असते. तिची जिद्द आणि हिंमत याला दाद द्यायला हवी. सुरुवातीच्या प्रशिक्षणाच्या काळात ती सराव करीत असताना तिच्याकडून योग्य पद्धतीने तो होत नव्हता. जिम्नॅस्टिक हा जोखीमपूर्ण खेळ असल्यामुळे आणि दीपा थकल्याचे स्पष्टपणे दिसत असल्यामुळे मी तिला सराव थांबण्याचे निर्देश दिले. मात्र तरीही तिने प्रयत्न केला आणि तिच्या आणखी एका अपयशी प्रयत्नात तिला दुखापत झाल्यामुळे रक्त वाहू लागले, पण तरीही तिला सराव चालूच ठेवायचा होता. त्यामुळे मी रागावून आता थांबवली नाहीस तर मी तुझे तंगडे मोडेन, असे शब्द वापरले. ती तावातावाने बाहेर गेली आणि एक बांबू घेऊन येताना दिसली. मला वाटले, आता ती हा माझ्या डोक्यात घालणार. मनातून थोडासा घाबरलो, पण तिने तो आणून माझ्या हातात दिला आणि मोडा माझा पाय, असे सांगितले. तिच्या याच आक्रमक स्वभावाचे परिवर्तन जिंकण्याच्या ईष्रेत मी केले आहे.

  • एखाद्या पुरुष किंवा महिला खेळाडूला प्रशिक्षण देण्याबाबत तुम्ही कसे पाहता?

सर्वसामान्यपणे पुरुष प्रशिक्षक पुरुष खेळाडूंना शिकवण्यास प्राधान्य देतात. काही वर्षांपूर्वी मुलींसोबत त्यांचे पालकसुद्धा प्रशिक्षणाच्या वेळी उपस्थित राहायचे. मात्र आता काळ बदलला आहे, पण फरकच सांगायचा तर कोणत्याही पुरुष खेळाडूला सूचना दिल्यावर त्यापैकी तो किती टक्के पालन करील, याबाबत मलाही साशंका असते, परंतु महिला खेळाडू या सूचनांचे तंतोतंत पालन करतात.

  • देशातील क्रीडाविषयक मूलभूत सुविधांबाबत तुम्ही काय सांगाल?

जपान, चीन, रशिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या देशांमध्ये क्रीडा संस्कृती पूर्णत्वाने रुजली आहे. आपला देश हा क्रीडात्मक पातळीवर विकसित देश नाही. भारत त्या दिशेने वाटचाल करीत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये शंभरहून अधिक खेळाडू पात्र ठरले होते. ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात भारतीय खेळाडू याआधी कधीच सहभागी झाले नव्हते.

  • परदेशी प्रशिक्षणामुळे किंवा प्रशिक्षकामुळे खेळाडूंना खरेच काही फायदा होतो असते वाटते का?

पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकांची कमाई केली. दीपाचे थोडक्यात हुकले, पण या तिघींच्या प्रशंसनीय कामगिरीतील समान धागा म्हणजे भारतीय प्रशिक्षक. देशातील प्रशिक्षकांना योग्य साधनसामग्री उपलब्ध करून दिल्यास ऑलिम्पिकमधील यश मिळवणेसुद्धा कठीण नाही, हीच गोष्ट यातून अधोरेखित होते. मग परदेशी प्रशिक्षक किंवा प्रशिक्षणाकडे आपण का वळावे? रिओ ऑलिम्पिकच्या आधीसुद्धा आम्हाला या

संदर्भात विचारण्यात आले होते. मात्र आम्ही ते नाकारले होते, पण दीपाच्या सरावासाठी आवश्यक उपकरणे ‘साइ’ने दहा दिवसांत भारतात आणली होती.

  • ऑलिम्पिकनंतर आता दीपाच्या पुढील आव्हानांकडे कसे पाहता?

माँट्रियल (कॅनडा) येथे पुढील वर्षी जागतिक अजिंक्यपद कलात्मक जिम्नॅस्टिक स्पर्धा आहे. ते आता आमच्यापुढील पहिले प्रमुख आव्हान असेल. रिओ ऑलिम्पिकनंतर सध्या विश्रांतीचा काळ सुरू आहे. लवकरच आम्ही त्यासंदर्भात योग्य योजना आखू. त्यापुढे आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाची आव्हाने आहेत, पण जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत नव्वदहून अधिक देशांचे खेळाडू सहभागी होतात. त्यामुळेच या स्पध्रेकडे आम्ही गांभीर्याने पाहात आहोत.