आठवडय़ाची मुलाखत : ई.भास्करन यू मुंबाचे मुख्य प्रशिक्षक
प्रो कबड्डी लीगचा चौथा हंगाम हा यू मुंबासाठी आव्हानात्मक असणार आहे, असे मत त्यांचे प्रशिक्षक ई. भास्करन यांनी व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या प्रो कबड्डीच्या लिलावात बऱ्याच संघांमध्ये दिग्गज खेळाडू सामील झाले आहेत. मात्र यू मुंबातील महत्त्वाचे खेळाडू अन्य संघांमध्ये गेल्याने या हंगामाकडे नव्याने पाहावे लागणार आहे, परंतु तरीही आम्ही आत्मविश्वासाने या हंगामाला सामोरे जाऊ, असा विश्वास भास्करन यांनी व्यक्त केला. आगामी हंगामाच्या पाश्र्वभूमीवर यू मुंबाच्या रणनीतीविषयी भास्करन यांच्याशी केलेली खास बातचीत-

* प्रो कबड्डीच्या चौथ्या हंगामाकडे तुम्ही कशा रीतीने पाहात आहेत?
चौथ्या हंगामाकडे वाटचाल करताना यू मुंबावर दडपण नक्कीच आहे. परंतु पहिल्या हंगामाप्रमाणेच आम्ही या हंगामाकडे पाहणार आहोत. पहिल्या हंगामात नव्या खेळाडूंसोबतच आम्ही खेळलो होतो. नंतर त्यांनी खेळावर छाप पाडली. नेमके तेच धोरण आमचे असणार आहे.

* गेल्या तीन हंगामांत संघाच्या आक्रमण आणि बचाव फळीची ताकद अन्य संघांवर दहशत निर्माण करणारी होती. सध्याच्या ताकदीविषयी तुमचे काय मत आहे?
तिसरा ते चौथा हंगाम हा कालावधी तसा अतिशय कमी आहे. त्यामुळे तयारी करण्याच्या दृष्टीने आमच्यासाठी आव्हानात्मक परिस्थिती आहे. बचाव हे आमचे बलस्थान होते. आता नव्या खेळाडूंसह बचाव फळी नव्याने बांधण्याचे आव्हान आमच्यावर असेल.

* मोहित चिल्लर, सुरेंदर नाडा आणि विशाल माने हे तीन महत्त्वाचे बचावपटू नसल्याची उणीव संघाला भासेल का?
पहिल्या हंगामाला सामोरे जाण्यापूर्वी मोहित, सुरेंदर आणि विशाल हे अनोळखी खेळाडू होते. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या हंगामात त्यांच्या खेळाची ओळख निर्माण झाली. पाटणा पायरेट्सचा सुनील कुमार, पुण्याचा मनोज धूल यांच्यासारखे खेळाडू बचावातील उणीव भरून काढतील, अशी माझी अपेक्षा आहे.

* गेल्या हंगामात दक्षिण आशियाई स्पध्रेसाठी महत्त्वाचे खेळाडू नसतानाही यू मुंबाने आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. त्याविषयी काय सांगाल?
या काळात भारताचा अनुभवी खेळाडू राकेश कुमारने प्रेरणादायी खेळाचे प्रदर्शन केले. महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत यू मुंबाचा संघ हाराकिरी पत्करणार, असे सर्वाना वाटत होते. परंतु ती अपेक्षा फोल ठरली होती. हे खेळाडू काही दिवस आपल्यासोबत नसणार, हे गृहीत धरूनच आम्ही सरावाला प्रारंभ केला होता.

* लिलावानंतर आता अन्य संघांच्या ताकदीचे तुम्ही कसे विश्लेषण कराल?
लिलावानंतर प्रत्येक संघ मजबूत झाला आहे. पहिल्या हंगामाप्रमाणेच अज्ञात; पण गुणी खेळाडूंची फळी संघात सामील झाली आहे. पुणेरी पलटण हा संघ आता सर्वात समतोल आणि बलवान संघ झाला आहे. याशिवाय बंगाल वॉरियर्सचा संघसुद्धा अधिक चांगला दिसतो आहे. तेलुगू टायटन्सकडेही संभाव्य विजेते म्हणून पाहता येईल.

Story img Loader