आठवडय़ाची मुलाखत : सुकांत कदम, पॅरा बॅडमिंटनपटू
‘छोटय़ाशा अपघातामुळे शारीरिकदृष्टय़ा अपंगत्व आले, तरी मी डगमगलो नाही. या गोष्टीचा स्वीकार करीत पॅरा बॅडमिंटनमध्येच कारकीर्द घडवण्याचा निर्धार केला. गिरीशा नागराजेगौडा याच्यासारखे पॅरा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याचे माझे लक्ष्य आहे व ते साध्य करण्यासाठीच मी मेहनत करीत आहे,’ असे पॅरा बॅडमिंटनपटू सुकांत कदमने खास मुलाखतीमध्ये सांगितले.
सुकांतने स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत दोन कांस्यपदकांची कमाई केली. त्याने एकेरी व दुहेरी या दोन्ही विभागांत ही कामगिरी केली. सुकांत हा आटपाडीजवळील खेडेगावचा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर चार पदकांची कमाई केली आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या पाच क्रमांकामध्ये स्थान मिळवीत २०२० च्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा ध्वज फडकाविण्याचे त्याचे ध्येय आहे.
- बॅडमिंटनमध्येच कारकीर्द घडवण्याचे कसे सुचले?
दहा वर्षांचा असताना क्रिकेट खेळताना मी पडलो. त्या वेळी दुखापतीवर उपचार घेत असताना इंजेक्शनचा विपरीत परिणाम झाला व माझ्या डाव्या पायाला कायमचे अपंगत्व आले. तरीही मी डगमगलो नाही. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात शिक्षण घेताना मी अन्य मित्रांबरोबर बॅडमिंटन खेळत होतो. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेताना बॅडमिंटनची आवड वाढली. माझे हे शिक्षण सुरू असताना गिरीशा या दिव्यांग धावपटूने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविल्यानंतर आपणही बॅडमिंटनमध्ये असेच यश मिळवायचे असे मला वाटू लागले.
- आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याचा तुझा अनुभव कसा होता?
इंग्लंडमध्ये २०१४ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत भाग घेण्याची संधी मला मिळाली होती. २०१३ मध्ये चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील विजेतेपदामुळेच मला भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य लाभले. इंग्लंडला जाताना माझा पहिलाच विमान प्रवास होता. त्यामुळे सर्वच गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. या स्पर्धेत भाग घेताना माझ्यावर खूप दडपण होते. साहजिकच मला उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच पोहोचता आले. तथापि तेथील अनुभवामुळे मला भावी कारकीर्दीसाठी उत्तम व्यासपीठ लाभले.
- अभियांत्रिकी शिक्षण व बॅडमिंटनचा सराव या दोन्ही गोष्टी तू कशा सांभाळल्या?
अभियांत्रिकीची शेवटची परीक्षा व विश्वचषकासाठी चाचणी स्पर्धा एकाच वेळी आल्या. विश्वचषक स्पर्धेची संधी पुन्हा मिळू शकेल हा आत्मविश्वास असल्यामुळे अभियांत्रिकीच्या परीक्षेस मी प्राधान्य दिले. अर्थात त्यामुळे मी निराश झालो नाही, कारण खेळाडूलाही शैक्षणिक पदवी महत्त्वाची असते.
- निखिल कानेटकर यांच्या अकादमीतील प्रशिक्षणाचा अनुभव कसा वाटतो?
निखिल सरांनी अनेक वेळा मला आंतरराष्ट्रीय स्पर्धाकरिता प्रायोजकत्व दिले आहे. ते स्वत: मास्टर्स विभागात अजूनही खेळत असल्यामुळे खेळातील सर्व बारकावे त्यांना माहीत आहेत. ते व मयांक गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यातील बॅडमिंटन कौशल्यास भरपूर वाव मिळाला आहे. या खेळासाठी आवश्यक असणारी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, पूरक व्यायाम, फिजिकल ट्रेनर, योग्य आहार आदींबाबत मला योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळत आहे. स्पर्धेत पराभव स्वीकारावा लागला तरी चालेल, पण तेथील अनुभव हा कायमस्वरूपी उपयुक्त होतो, असे निखिल सर नेहमी मला सांगत असतात. त्यामुळेच एखाद्या स्पर्धेत पदक मिळाले नाही तरीही मी निराश होत नाही. उलट तेथे आपण कोठे कमी पडलो याचाच मी विचार करतो व त्यानुसार माझ्या खेळात प्रगती करीत असतो.
- ऑलिम्पिकसाठी कशी तयारी करीत आहे?
टोकियो येथे आणखी तीन वर्षांनी ऑलिम्पिक होणार असले तरीही आतापासूनच मी स्पर्धा व सराव यांचे नियोजन केले आहे. त्यासाठी आई-वडिलांचे सातत्याने सहकार्य मिळत आहे. जागतिक स्तरावर अव्वल दर्जाचे मानांकन मिळविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत त्यानुसार कामगिरी करण्यावर माझा भर आहे. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत किमान कांस्यपदक मिळविण्याचे स्वप्न मी साकार करू शकेन, अशी मला खात्री आहे.