|| धनंजय रिसोडकर
आठवडय़ाची मुलाखत – राहुल आवारे, राष्ट्रकुल सुवर्णविजेता मल्ल
ऑलिम्पिक पदक मिळाल्यानंतर खेळाडूंना मानसन्मान आणि लाखो-कोटी रुपये देण्याची गरज नाही. पदक मिळवल्यानंतर ते त्यांना सारे मिळणारच आहे. पण ज्या खेळाडूंमध्ये ऑलिम्पिक पदकाची क्षमता आहे, अशा खेळाडूंसाठी शासनाने किंवा नामांकित कंपन्यांनी पुढाकार घेऊन त्यांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तरच भारताला कुस्तीतून अधिकाधिक ऑलिम्पिक पदके मिळतील, अन्यथा ऑलिम्पिक संपल्यानंतर पुन्हा आपल्याला कुस्तीत एक-दोनच पदके का, असा विचार करण्याची वेळ येईल, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भारतीय मल्ल राहुल आवारे याने केली. पुण्यात सुरू असलेल्या ‘महाराष्ट्र कुस्ती दंगल’च्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राचा युवा मल्ल राहुलशी केलेली खास बातचीत-
- कुस्तीमध्ये भारत पाच-सात ऑलिम्पिक पदके मिळवू शकेल, अशी प्रत्येक वेळी अपेक्षा असते. परंतु प्रत्यक्षात एखाद-दुसरेच पदक हाती लागते, असे का घडते?
विदेशांमध्ये ज्यांच्यात प्रचंड गुणवत्ता आहे किंवा स्थानिक मोठय़ा स्पर्धामधून ज्यांनी त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे, अशा खेळाडूंना बाराव्या वर्षीच दत्तक घेतले जाते. त्यांना आठ-दहा वर्षे आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा, प्रशिक्षण, आहार, वैद्यकीय सुविधा हे काही एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाते. त्यांना ऑलिम्पिक पदक मिळेपर्यंत त्यांना लागतील त्या सुविधा देऊन त्यांचा सांभाळ केला जातो. त्यामुळे इतर देशांना अधिक पदके मिळतात. आपल्याकडे ऑलिम्पिक पदक मिळवेपर्यंत खेळाडूंसाठी असे कोणतेच पाठबळ नसते. ऑलिम्पिक पदक जिंकल्यावर मग त्याला त्या लाखाच्या पुरस्कारांची काही किंमत नसते. कारण तोपर्यंत त्याला लाखो, कोटी देणाऱ्या जाहिराती, बँड्र द्यायला पुढे आलेले असतात. त्यामुळे १२-१५ प्रतिभावान खेळाडूंना एकत्र एकाच छताखाली किमान तीन-चार वर्षे सर्व सुविधा देऊन कायम स्वरूपाची काही सुविधा उपलब्ध करावी, ज्यामुळे भारत कुस्तीत किमान चार-पाच पदके मिळवू शकेल.
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि लीग अशा स्पर्धामध्ये तारखांचा समन्वय राखला जातो का? त्याचा खेळाडूंच्या कामगिरीवर कितपत परिणाम होतो?
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या तारखांमध्ये बऱ्यापैकी समन्वय राखलेला असतो. तसेच खेळाडूंना कोणत्या स्पर्धेत खेळायचे आहे, त्यासाठी कधीपासून खऱ्या अर्थाने मेहनत करायची आहे, ते सुस्पष्ट असते. मात्र राष्ट्रीय लीगसह अन्य काही स्पर्धाच्या आयोजनात तारखांचा ताळमेळ राखला जात नाही. त्यामुळे आयोजकांनी सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा या सगळ्यांचा विचार करून त्यांच्या लीगचे, स्पर्धाचे वेळापत्रक आखणे आवश्यक आहे; अन्यथा खेळाडूंचे वेळापत्रक बिघडून त्यांच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.
- कुस्तीपटूंना जे मानधन, पुरस्कार दिले जातात, ती रक्कम मल्लांना व्यावसायिक कुस्तीपटू म्हणून आकर्षित करण्यासाठी पुरेशी आहे का?
कुस्ती हा खेळ प्रचंड खर्चीक आहे. मल्लांचा खुराक, त्यांचे प्रशिक्षण, त्यांच्या वैद्यकीय सुविधा हे प्रत्येक मल्लाच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेरचे काम असते. माझ्यासारख्या राष्ट्रकुल पदक विजेत्या मल्लालादेखील ऑलिम्पिकच्या तयारीकरिता करावा लागणारा खर्च क्षमतेबाहेरचा आहे. मग इतर युवा मल्लांची काय अवस्था असेल, त्याचा तुम्ही विचारदेखील करू शकत नाही. ऑलिम्पिकसाठी तयारी करायची असेल, तर एकेका महिन्याचा खर्चच किमान सात-आठ लाख रुपयांमध्ये असतो. वैयक्तिक प्रशिक्षक, फिजिओ, आहारतज्ज्ञ ठेवायचे असतील तर हा खर्च वाढतो. इतके पैसे सामान्य मल्लाने कुठून आणायचे? काही स्पर्धा जिंकल्या तरी त्यातून इतका पैसा हाताशी येत नाही, हे वास्तव आहे.
- कुस्तीच्या प्रसारासाठी आणि गतवैभव प्राप्त होण्यासाठी अजून काय करायला हवे?
सर्वप्रथम गावागावांतील व्यायामशाळांमध्ये मॅट पोहोचणे आवश्यक आहे. मातीतल्या कुस्तीपेक्षा मॅटवरील कुस्ती खूप वेगळी असल्याने बालपणापासूनच मल्लांना मॅटवर खेळण्याचा सराव मिळायला हवा. त्यासाठी स्थानिक क्रीडा संस्था, संघटना, दानशूरांनी आपापल्या गावांमध्ये कुस्तीच्या मॅट आणि उत्तम प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना पोषक असे वातावरण व आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिल्यास कुस्तीचे सुवर्णयुग पुन्हा अवतरू शकते, असे मला वाटते.