आठवडय़ाची मुलाखत : राम मेहेर सिंग, पाटणा पायरेट्स संघाचे मुख्य प्रशिक्षक
खेळांडूची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, प्रेक्षकांचा पाठिंबा याचा विचार केल्यास प्रो कबड्डी लीगचा तीन महिन्यांचा कालावधी अतिशय कंटाळवाणा वाटतो. त्याऐवजी दोन महिन्यांचा कालावधी पुरेसा आहे, असे मत यंदाच्या विजेत्या पाटणा पायरेट्स संघाचे मुख्य प्रशिक्षक राम मेहेर सिंग यांनी व्यक्त केले आहे.
‘‘प्रो कबड्डीचा कालावधी कमी झाल्यास चुरसही शेवटपर्यंत कायम राहील व खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर त्याचा अनिष्ट परिणाम होणार नाही. प्रो कबड्डीसोबतच स्थानिक स्तरावरील स्पर्धाचाही आम्हाला विचार करावा लागतो. स्थानिक सामने अतिशय महत्त्वाचे असतात. काही खेळाडू नोकरी करीत असतात. त्यांना प्रत्येक वेळी या स्पर्धेसाठी सवलत मिळेल अशी खात्री नसते. हे लक्षात घेऊनच लीगमधील सामन्यांचा कालावधी कमी केला पाहिजे,’’ असे राम मेहेर यांनी सांगितले. प्रो कबड्डीमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिक साकारणाऱ्या पाटणाच्या कामगिरीबद्दल त्यांच्याशी केलेली खास बातचीत-
- अंतिम फेरीत १०-१५ अशा पिछाडीवरून पाटणाने गुजरातला ५५-३८ असे हरवले. विजेतेपदाविषयी तुमच्या काय भावना आहेत?
माझ्या दृष्टीने विजेतेपद फारसे महत्त्वाचे नव्हते. गुजरात संघाचे गर्वहरण करण्याची आम्हा सर्वाचीच इच्छा होती. साखळी सामन्यात दुसऱ्यांदा आम्हाला पराभूत केल्यानंतर मनप्रीत व अन्य काही खेळाडूंनी आमच्या खेळाडूंवर प्रखर टीका केली होती. अंतिम फेरीत पाटणा संघाविरुद्ध खेळण्यास आम्ही प्राधान्य देऊ, असेही त्यांनी वक्तव्य केले होते. तेव्हापासूनच आम्ही अंतिम फेरीत त्यांना हरवण्याचा निश्चय केला होता. जरी पहिल्या १५ मिनिटांत प्रदीप नरवालला फारसे यश मिळाले नव्हते, तरी तो केव्हाही सामन्याला कलाटणी देईल, याबाबत मला भरवसा होता. त्याप्रमाणे १६व्या मिनिटाला त्याला सूर सापडला व आम्ही सामन्यावर वर्चस्व निर्माण केले.
- सलग तिसऱ्या विजेतेपदाची खात्री होती का?
विजेतेपदाची मला सुरुवातीपासूनच खात्री होती, पण त्याहीपेक्षा साखळी गटात गुजरातकडून दुसऱ्यांदा पराभव स्वीकारल्यानंतर त्यांनी केलेल्या टीकेला खणखणीत उत्तर देण्याची माझी इच्छा होती. आम्ही गुजरातचा १७ गुणांच्या फरकाने पराभूत करीत त्यांचे गर्वहरण केले.
- गुजरातच्या बचावपटूंचे दडपण होते काय?
फझल अत्राचाली व अबोझार मिघानी या दोन्ही इराणच्या खेळाडूंमुळे गुजरातचा बचाव अतिशय भक्कम मानला जात होता. प्रदीप हा आमच्या संघाचा महत्त्वाचा कणा आहे; पण त्याचबरोबर चढाईत मोनू गोयतची तर पकडीत विजय व जयदीप यांचीही कामगिरी अव्वल दर्जाची झाली. गुजरातच्या बचावात्मक डावपेचांना कसे तोंड द्यायचे, याचा आम्ही बारकाईने अभ्यास केला होता. त्या दृष्टीने नियोजनही केले होते. मी पाटणा संघाबरोबर गेले दोन वर्षे आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूची नस मला माहीत आहे. मनप्रीत हा गतवर्षी आमच्या संघाकडून खेळत असे. प्रत्येक अव्वल दर्जाचा खेळाडू उत्तम प्रशिक्षक असतो असे नाही. हाच आम्हा दोन संघांमधील फरक होता. अर्थात संघातील सर्व खेळाडूंप्रमाणेच साहाय्यक मार्गदर्शकांची भूमिकासुद्धा मोलाची होती.
- पाटणामधील कबड्डीच्या विकासाच्या दृष्टीने कोणती पावले फ्रँचायझीकडून उचलली जाणार आहेत?
विजेतेपदामुळे पाटणा शहराचा नावलौकिक उंचावला आहे. तिथे कबड्डीसाठी विपुल नैपुण्य आहे, मात्र अपेक्षेइतका विकास झालेला नाही. हे लक्षात घेऊनच स्थानिक स्तरावरील खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव कसा मिळेल, याचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. तिसऱ्या विजेतेपदामुळे प्रायोजकांकडून भरपूर सहकार्य मिळण्यात अडचण येणार नाही. स्थानिक स्तरावर अधिकाधिक स्पर्धा आयोजित करण्याचा विचार आहे. विविध वयोगटांकरिता या स्पर्धा घेतल्या जातील व त्यामधील उदयोन्मुख खेळाडूंकरिता कायमस्वरूपी सराव शिबीर घेतले जाईल.