आठवडय़ाची मुलाखत : रमेश तावडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक

आम्ही फारशा सुविधा व सवलती नसताना आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई केली. मात्र आता सुविधा व सवलती योग्य पद्धतीने मिळत असतानाही भारतीय खेळाडूंमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकण्याची इच्छाच दिसून येत नाही. त्यामुळेच ऑलिम्पिकमधील अ‍ॅथलेटिक्समध्ये भारतीय धावपटूंची पाटी कोरी राहिली आहे, असे ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक रमेश तावडे यांनी सांगितले.

राज्य शासनाने तावडे यांना शनिवारी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. तावडे यांनी आशियाई क्रीडा स्पर्धासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये घवघवीत यश मिळविले आहे. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीचे ते संस्थापक असून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी बालेवाडी येथील जमीन निवडण्याबाबत त्यांचा मोठा वाटा होता. पुण्याजवळील अनेक उद्योग संस्थांमध्ये धावपटूंना नोकरी देण्याबाबत त्यांनी पुढाकार घेतला होता. भारतीय धावपटूंच्या सध्याच्या दर्जाबाबत त्यांच्याशी केलेली खास बातचीत…

  • जीवनगौरव पुरस्काराबाबत काय सांगाल?

खरे तर हा पुरस्कार यापूर्वीच मिळायला पाहिजे होता. पण उशिरा का होईना, शासनाने माझ्या कामाची दखल घेतली आहे. हा अ‍ॅथलेटिक्स क्षेत्राचा गौरव आहे. अर्थात मी मॅरेथॉन शर्यतीचे रोपटे लावले व त्याची लोकप्रियता भारताबाहेर पसरली आहे, हाच माझा खरा पुरस्कार आहे. पूर्वी आपल्या देशात एकदोनच मॅरेथॉन शर्यती आयोजित केल्या जात असत. आता मॅरेथॉन शर्यतींची संख्या वाढली आहे. लोकांमध्ये निरोगी जीवनासाठी धावण्याचा व्यायाम ही संकल्पना चांगली रुजली आहे. आता आपल्या देशात २०पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅरेथॉन शर्यती होत असतात व त्यामध्ये अनेक देशांचे स्पर्धक सहभागी होतात, ही अतिशय समाधानकारक गोष्ट आहे.

  • खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधांविषयी काय सांगता येईल?

आमच्या वेळी मैदानाजवळ पोशाख बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या नव्हत्या. त्यामुळे आम्ही स्पध्रेसाठीचा पोशाख करूनच घरातून मैदानावर जात होतो. आम्हाला पाहून अनेक लोक जोकरची उपमा देत असत. आता मात्र खेळाडूकडे आदरयुक्त भावनेने पाहिले जात असते.

  • खेळाडूंच्या दर्जाबाबत तुमचे काय मत आहे?

दुर्दैवाने गेल्या नव्वद वर्षांमध्ये एकही पदक आपल्याला अ‍ॅथलेटिक्समध्ये मिळवता आलेले नाही. आमच्या वेळी परदेशी प्रशिक्षण, सराव शिबीर, तंदुरुस्तीतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, मसाजतज्ज्ञ, वैद्यकीय सल्लागार अशा सुविधांचा अभाव होता. पण तरीही आम्ही संघर्ष करीत जागतिक स्तरावर सर्वोच्च कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. हल्लीचे धावपटू ऑलिम्पिक पात्रता पूर्ण करण्यातच समाधान मानतात. पात्रता ‘ब’ श्रेणीऐवजी ‘अ’ श्रेणी पात्रता पूर्ण करणाऱ्यांनाच ऑलिम्पिकमध्ये संधी दिली पाहिजे. मात्र ‘ब’ श्रेणी पात्रता पूर्ण करणाऱ्यांची संख्या भरपूर असते. त्यामुळे व्यवस्थापक व प्रशिक्षक म्हणून अनेकांना ऑलिम्पिकवारी करण्याची संधी मिळते. शासनाने ‘अ’ श्रेणी पूर्ण करणाऱ्यांनाच प्राधान्य दिले पाहिजे.

  • अ‍ॅथलेटिक्सचा प्रसार खरोखरी समाधानकारक आहे काय?

अ‍ॅथलेटिक्सचा सध्याचा दर्जा अतिशय सुमार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील यशावर समाधान मानून नोकरी मिळवण्याचा खेळाडूंचा कल दिसतो. जागतिक स्तरावर आपल्याला अव्वल यश कसे मिळेल, याचा विचार केला पाहिजे. अ‍ॅथलेटिक्सचा खेडोपाडी प्रसार करण्याची गरज आहे. दुर्दैवाने प्रशिक्षकांचा दर्जा निराशाजनक आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार होण्यापुरतेच त्यांचे लक्ष असते. प्रत्येक प्रशिक्षकाला त्याच्या कामगिरीबाबत उत्तरदायित्व ठरवण्याची गरज आहे. चांगले खेळाडू घडवता येत नसतील तर अशा प्रशिक्षकाला पुन्हा संधी देणे अयोग्य होईल. खेडेगावात व शहरांमध्ये अ‍ॅथलेटिक्सच्या मैदानांवरील अतिक्रमणे थांबवण्याची आवश्यकता आहे. मैदान खेळाडूंना सरावाकरिता योग्य आहे की नाही हे पाहण्याची गरज आहे. सुमार दर्जाचे मैदान असेल तर खेळाडूंना चांगला सराव करता येत नाही, त्याचप्रमाणे त्यांना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागते. अ‍ॅथलेटिक्सचा दर्जा उंचावण्यासाठी खेळाडू, पालक, प्रशिक्षक, संघटना व शासन यांच्यात योग्य समन्वय असला तरच आपले खेळाडू ऑलिम्पिक पदकापर्यंतच पोहोचू शकतील.