|| धनंजय रिसोडकर

आठवडय़ाची मुलाखत: समीर वर्मा,  बॅडमिंटनपटू

गत दोन वर्षांपासून मी शारीरिक आणि बौद्धिक तंदुरुस्तीवर प्रचंड भर दिला. त्याचाच फायदा मला गेल्या वर्षी तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकताना झाला. मात्र यंदा मला जागतिक क्रमवारीत पहिल्या पाच खेळाडूंमध्ये स्थान गाठण्याचे आव्हान खुणावते आहे. त्यासाठी आणखी कठोर मेहनतीला मी सध्या प्राधान्य देत आहे, असा निर्धार भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू आणि मुंबई रॉकेट्स संघाचा कर्णधार समीर वर्माने व्यक्त केला.

समीरने गेल्या वर्षीच्या हंगामात स्विस खुली, हैदराबाद खुली आणि सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावत जागतिक क्रमवारीत ३०व्या स्थानावरून थेट १२व्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे. तसेच समीरच्या नेतृत्वाखाली मुंबई रॉकेट्सने यंदाच्या प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये (पीबीएल) अफलातून कामगिरी केली. या पाश्र्वभूमीवर आगामी आव्हाने आणि ‘पीबीएल’मधील कामगिरीबाबत समीरशी केलेली खास बातचीत

  • ‘पीबीएल’मधील तुझ्या अपराजित कामगिरीकडे तू कशा प्रकारे पाहतोस आणि एक खेळाडू म्हणून तुला या लीगकडून नक्की काय मिळाले?

यंदाचा ‘पीबीएल’चा हंगाम माझ्यासाठी खूप आव्हानात्मक मात्र अत्यंत चांगला ठरला. उपांत्य लढतीमध्ये आमच्या संघासमोर पी. व्ही. सिंधूच्या संघाचे आव्हान असतानाही ते पेलण्याची कामगिरी ही आमच्या दृष्टीने उत्साहवर्धक ठरली. त्याचाच फायदा आम्हाला झाला. संपूर्ण स्पर्धेत काही अत्यंत अटीतटीच्या लढती खेळल्याने माझ्या आत्मविश्वासात भर पडली असून हीच लय यापुढेही कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.

  • ‘पीबीएल’मुळे उदयोन्मुख खेळाडूंना काय मिळाले असे तुला वाटते आणि यंदाच्या स्पर्धेत तुला सर्वाधिक आवडलेली बाब कोणती?

आंतरराष्ट्रीय स्तरावर उदयोन्मुख असलेल्या लक्ष्य सेन, ध्रुव कपिल आणि अर्जुन एमआर यांसारख्या भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सातत्यपूर्ण सहवास आणि त्यांचा खेळ जवळून पाहण्याची संधी त्यांच्या कारकीर्दीसाठी खूप उपयुक्त ठरली आहे. या खेळाडूंना अगदी अल्पावधीत इतके मोठे व्यासपीठ मिळाल्याने भविष्यातील त्यांच्या कामगिरीला त्याचा नक्कीच लाभ होणार आहे. तसेच यंदाच्या हंगामात पुणे सेव्हन एसेस या संघाची पडलेली भर ही माझ्या दृष्टीने अत्यंत आकर्षक बाब वाटली. कर्णधार कॅरोलिना मरिन आणि संघमालक अभिनेत्री तापसी पन्नूने ज्या प्रकारे संघाचा प्रचार-प्रसार केला, ते पाहणे नक्कीच आनंददायी होते.

  • मुंबई रॉकेट्सच्या डगआऊटमध्ये तुझ्यासह अन्य आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे एकमेकांशी सुसंवाद कशा प्रकारे होतात?

ली यंग डेसारखा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू केवळ खेळाडू म्हणून स्फूर्तीचा स्रोत म्हणून संघाला प्रेरणा देत होता. त्यामुळे संपूर्ण संघात अत्यंत सकारात्मक वातावरण राहात होते. तसेच खेळाडूंचे आपापसातील संबंध अगदी सलोख्याचे असल्यानेच सांघिक स्तरावर आम्ही यश मिळवू शकलो.

  • गेल्या दोन वर्षांमध्ये तुझ्या खेळात झालेला फरक आणि मागील वर्षी मिळवलेल्या यशाविषयी काय सांगशील?

यात न सांगण्यासारखे कोणतेही गुपित नाही. मी केवळ माझ्या शारीरिक आणि बौद्धिक तंदुरुस्तीवर अधिक भर दिला. त्यामुळेच खेळ अधिक बहरला. त्याचाच फायदा मला २०१८ च्या हंगामात झाला. मात्र त्यापेक्षाही अधिक मेहनत घेण्याचे मी यंदा ठरवले आहे.

  • यंदाच्या वर्षी आणि नजीकच्या भविष्यातील तुझ्या काय योजना आहेत?

यंदाच्या वर्षी अन्य जागतिक स्पर्धापेक्षाही मी ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचे ध्येय ठरवले आहे. भारतीय खेळाडूंना तीन दशके हे विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे त्या स्पर्धेतील विजेतेपदाला माझा अग्रक्रम राहणार आहे. तसेच यंदाच्या वर्षी जागतिक क्रमवारीत पहिल्या पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याचे माझे ध्येय मी निश्चित केले आहे.

Story img Loader