आठवडय़ाची मुलाखत: शुभांगी कुलकर्णी, भारताच्या माजी क्रिकेट कर्णधार
क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा घेत महिलांना या खेळात विविध माध्यमांमार्फत करिअर करण्याची उत्तम संधी आहे, हे मी स्वानुभवाद्वारे आत्मविश्वासाने सांगू शकते, असे भारताच्या माजी क्रिकेटपटू शुभांगी कुलकर्णी यांनी सांगितले.
भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपद अनेक वर्षे सांभाळणाऱ्या कुलकर्णी या सध्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या महिला समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. खेळाडू, प्रशिक्षक, संघटक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या या महिला खेळाडूला अलीकडेच लॉर्ड्स येथील मेरिलिबोर्न क्रिकेट क्लबचे (एमसीसी) सन्माननीय तहहयात सदस्यत्व लाभले आहे. त्यांच्या या बहुमानाबाबत व महिला क्रिकेट क्षेत्राविषयी कुलकर्णी यांच्याशी केलेली बातचीत-
- एमसीसीचे सदस्यत्व मिळेल, अशी कधी अपेक्षा केली होती काय?
लॉर्ड्स मैदानावर खेळणे, हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न होते. आमच्या वेळी महिलांकरिता फारसे सामने नसायचे. त्यामुळे असा बहुमान मिळेल अशी अपेक्षा केली नव्हती. १९७९ मध्ये लॉर्ड्स येथे क्रिकेट सामना पाहण्याची संधी मी साधली होती. आता सदस्यत्व मिळाल्याबद्दल मला खूप अभिमान वाटत आहे. या बहुमानामुळे अनेक दिग्गज पुरुष कसोटीपटूंच्या उपस्थितीत तेथील पॅव्हेलियनमध्ये बसून सामना पाहण्याचा आनंद मला घेता येणार आहे. माझ्याबरोबरच भारताच्या अन्य काही महिला खेळाडूंनाही हा सन्मान मिळाला आहे. हा भारतीय महिला क्रिकेटचा गौरव आहे.
- सध्याच्या महिला क्रिकेटविषयी काय सांगता येईल?
आम्ही खेळत असतानाच्या स्थितीचा विचार केल्यास आता महिला क्रिकेटपटूंना खूप चांगले दिवस पाहावयास मिळत आहेत. आमच्या वेळी महिलांचे सामने व्हावेत, यासाठी अनेक महिला खेळाडूच आर्थिक निधी उभा करीत असत. त्या वेळी महिलांना अपेक्षेइतके प्रोत्साहन व प्रायोजकत्व नव्हते. आता महिला खेळाडूंना खूप चांगल्या सुविधा मिळू लागल्या आहेत. सामन्यांची संख्या वाढली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप सकारात्मक बदल झाले आहेत.
- जागतिक स्तरावर महिलांचे क्रिकेट उंचावले आहे काय?
हो, निश्चितच. पूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड आदी मोजक्याच देशांच्या खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय मानांकनात वर्चस्व होते. अलीकडे वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका यांच्यासह अनेक देशांच्या खेळाडूंनी खूप प्रगती केली आहे. विंडीजच्या महिलांनी विश्वविजेतेपद मिळवत सनसनाटी कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे महिला क्रिकेटची जबाबदारी आल्यापासून खूपच प्रगती झाली आहे. आशियाई खंडातील इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती यांच्यासह अनेक देशांमध्ये महिला क्रिकेटची पाळेमुळे रुजू लागली आहेत. युरोप व आफ्रिकेतील अनेक देशांमध्येही त्याची लोकप्रियता वाढली आहे.
- भारतात या खेळाची काय स्थिती आहे?
आपल्या देशातही संख्यात्मक व गुणात्मक विकास होऊ लागला आहे. मात्र शालेय स्तरावर आणखी प्रगती होण्याची आवश्यकता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे याबाबत काही योजना दिल्या आहेत. आता मंडळाच्या व्यवस्थापन समितीवर डायना एडल्जी यांच्यासारख्या अनुभवी महिला क्रिकेटपटूला स्थान मिळाले आहे. त्याचा फायदा निश्चितच होणार आहे. अलीकडेच अनेक माजी महिला क्रिकेटपटूंना १५ ते २० लाख रुपये मानधन मिळाले आहे. ही या महिला क्रिकेटपटूंनी कारकीर्द घडवताना केलेल्या त्यागाची पावती आहे. ऑस्ट्रेलियात बिग बॅश स्पर्धेत महिलांकरिता स्वतंत्र सामने होत असतात. त्याप्रमाणे सुरुवातीला चार संघांची आंतरराष्ट्रीय लीग आयोजित केली पाहिजे. या चार संघांमध्ये जगातील सर्वोत्तम महिला खेळाडूंना स्थान दिले पाहिजे. या सामन्यांद्वारे खेळाची लोकप्रियता वाढू शकेल, तसेच महिला खेळाडूंना आर्थिक फायदाही होऊ शकेल.
- महिलांना या खेळात करिअर घडवण्यासाठी कितपत संधी आहे?
आजकाल अनेक महिला पंच, सामनाधिकारी आणि समालोचक म्हणून काम करू लागल्या आहेत. काही महिलांनी गुणलेखिका म्हणून आपला ठसा उमटवला आहे. प्रशिक्षक, सांख्यिकी म्हणूनही भरपूर संधी उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे. महिलांनी क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे धाडस केले, तर त्यांचे कष्ट वाया जाणार नाहीत, याची मी खात्री देते.