आठवडय़ाची मुलाखत : तुषार आरोठे, भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक
जागतिक स्तरावरील क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावण्याची गुणवत्ता भारतीय महिलांकडे निश्चित आहे. मात्र इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत शंभर टक्के तंदुरुस्ती असणे अत्यंत जरुरीचे आहे, असे भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक तुषार आरोठे यांनी खास मुलाखतीमध्ये सांगितले. इंग्लंडमध्ये जून-जुलै महिन्यात महिलांची एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा होत आहे.
या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची निवड अद्याप केलेली नसली, तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतेच मुख्य प्रशिक्षक पूर्णिमा राव यांना जबाबदारीतून मुक्त केले असून त्यांच्या जागी आरोठे यांच्याकडे भारतीय संघाची धुरा सोपविली आहे. आरोठे यांनी प्रथम दर्जाच्या अनेक सामन्यांमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून आपला ठसा उमटविला आहे. स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर गेली अनेक वर्षे त्यांनी प्रशिक्षक म्हणून यशस्वी कारकीर्द केली आहे.
- महिला संघाचे प्रशिक्षकपद सोपविले जाईल याची पूर्वकल्पना होती का?
महिला संघाबरोबर मी यापूर्वी २००८ ते २०१२ या कालावधीत क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यामुळे महिला संघातील खेळाडू माझ्यासाठी अपरिचित नाहीत. आगामी विश्वचषकासाठी ऐन वेळी माझ्याकडे मुख्य प्रशिक्षकपद सोपविले जाईल याची मात्र कल्पना नव्हती. अर्थात याबाबत थोडीशी कल्पना मला
देण्यात आली होती. मात्र राव यांना एवढय़ा तत्परतेने दूर केले जाईल हे मला अपेक्षित नव्हते. भारतीय संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना मी यापूर्वी मार्गदर्शन केले आहे.
- विश्वचषकसाठी काय व्यूहरचना असणार आहे?
इंग्लंडमधील खेळपट्टय़ा जलदगती गोलंदाजीस पोषक असतात. तेथील वातावरण नेहमीच आव्हानात्मक असते. या दृष्टीने प्रत्येक खेळाडू शंभर टक्के तंदुरुस्त कसा राहील यास महत्त्व राहणार आहे. सुदैवाने आता संघाबरोबर फिजिओ, वैद्यकीय तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, ट्रेनर, सपोर्ट स्टाफ असल्यामुळे मी फक्त खेळाडूंची कामगिरी कशी अव्वल दर्जाची होईल यावरच लक्ष केंद्रित करणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत चार देशांची मालिका खेळणार आहे. आफ्रिकेतील वातावरण व खेळपट्टय़ा आदी गोष्टी इंग्लंडसारख्या असल्यामुळे खेळाडूंना त्याचा फायदा आत्मविश्वास उंचावण्यासाठी होणार आहे. विश्वचषकासाठी संघाची निवड अद्याप झालेली नाही. अंतिम अकरा खेळाडूंमध्ये किमान तीन जलदगती गोलंदाज आवश्यक आहेत. पन्नास षटकांच्या सामन्यात अष्टपैलू खेळाडूंऐवजी त्या त्या क्षेत्रातील अनुभवी खेळाडूंना मी प्राधान्य देईन. त्याचप्रमाणे युवा परंतु नैपुण्यवान खेळाडूंचाही समावेश राहील. त्यामुळे संघ समतोल राहील.
- विश्वचषकासाठी कोणत्या संघांचे मुख्य आव्हान असणार आहे?
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आदी संघांचे आव्हान असणार आहे. वेस्ट इंडिजने महिलांची ट्वेन्टी-२० स्पर्धा जिंकून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका आदी देशांनीही लक्षणीय प्रगती केली आहे. माझ्या मते प्रत्येक संघ तुल्यबळ असतो. सामन्याच्या दिवशी कोणता संघ कसा खेळतो यावरच त्याचे यशापयश अवलंबून असते. हे लक्षात घेता प्रत्येक प्रतिस्पर्धी संघ बलवान आहे व शेवटपर्यंत त्यांच्याविरुद्ध आत्मविश्वासाने खेळत झुंज द्यायची हीच वृत्ती ठेवीत आम्ही खेळणार आहोत. भारतीय संघात मिताली राज, झुलन गोस्वामी, हरमनप्रित कौर, देविका वैद्य आदी नैपुण्यवान खेळाडू आहेत. त्याचप्रमाणे युवा फळीतील खेळाडूही चांगली कामगिरी करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच खेळण्याचा आमचा दृष्टिकोन राहणार आहे.
- महिला संघाबरोबरचा यापूर्वीचा अनुभव कसा आहे?
भारतीय संघाचे क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक म्हणून काम करताना मी शंभर टक्के तंदुरुस्तीवर भर दिला होता. चांगली तंदुरुस्ती असेल तरच तुम्ही चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण करू शकतात. कोणत्याही सामन्यात एखादा झेलही खेळास कलाटणी देणारा ठरतो. अनेक वेळा तुम्ही झेलाच्या संधी निर्माण करायच्या असतात. २००९ मध्ये मी क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक म्हणून काम करताना खेळाडूंकडून खूप मेहनत करून घेतली होती. त्यामुळे भारतीय महिला संघाने केवळ क्षेत्ररक्षणातील कामगिरीच्या आधारे काही सामने जिंकले होते. भारतीय महिला क्रिकेटपटूंचा मी बारकाईने अभ्यास केला आहे. त्यामुळे प्रशिक्षक म्हणून काम करताना मला कोणतीही अडचण येणार नाही.
- भारतीय महिला क्रिकेटच्या सद्य:स्थितीविषयी काय सांगता येईल?
बीसीसीआयकडे महिला क्रिकेटची जबाबदारी आल्यानंतर खेळाडूंचा खूप चांगला विकास झाला आहे. महिला संघाला अनेक स्पर्धामध्ये व मालिकांमध्ये भाग घेण्याची संधी मिळू लागली आहे. शाळा व महाविद्यालयीन स्तरावर या खेळाच्या विकासावर भर दिला, तर निश्चितपणे भारतीय महिला संघ जागतिक स्तरावर वर्चस्व गाजवू शकेल.