आठवडय़ाची मुलाखत
दिलीप तिर्की, माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू
ऑलिम्पिक पदक मिळविण्याची क्षमता सध्याच्या भारतीय हॉकी संघात निश्चित आहे. मात्र प्रत्यक्ष सामन्याच्या वेळी ते कशी तंदुरुस्ती दाखवितात व त्यांच्यामध्ये कसा समन्वय साधतात, यावरच त्यांचे यशापयश अवलंबून आहे, असे भारताचे माजी हॉकीपटू दिलीप तिर्की यांनी सांगितले.
रिओ येथे पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील पुरुष व महिला या दोन्ही विभागांत भारतीय हॉकी संघाने प्रवेश निश्चित केला आहे. या स्पर्धेची कार्यक्रम पत्रिकाही जाहीर झाली आहे. भारतीय संघास पदक मिळविण्याच्या किती संधी आहेत व हे ध्येय साध्य करण्यासाठी काय व्यूहरचना केली पाहिजे, याबाबत तिर्कीशी केलेली खास बातचीत-
भारतीय संघाला ऑलिम्पिक पदकासाठी कितपत संधी आहेत?
भारतीय पुरुष संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळवित ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले आहे. हे लक्षात घेता आपल्या संघात ऑलिम्पिक पदक मिळविण्याची चांगली संधी आहे. साखळी गटात दोन सामने जिंकले तरी उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश सुकर होणार आहे. त्यामुळे आता उपांत्यपूर्व फेरीत आपण कशी कामगिरी करतो हे महत्त्वाचे आहे. अझलन शाह चषक स्पर्धेत आपण ऑस्ट्रेलियावर मात केली आहे, तर जागतिक लीगमध्ये आपण कांस्यपदक मिळविताना इंग्लंड व नेदरलँड्स यांना पराभवाचा धक्का दिला आहे. ही कामगिरी पाहिल्यास ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकापर्यंत वाटचाल करताना अडचण येणार नाही.
भारतीय संघाच्या तयारीविषयी काय सांगता येईल?
भारतीय संघातील खेळाडूंना यंदा परदेशातील सामन्यांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली होती. परदेशी संघांबरोबर भारत कसोटी सामनेसुद्धा खेळला. भारताच्या २१ वर्षांखालील संघालाही भरपूर सराव करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे परदेशातील किंवा परदेशी संघांबरोबरचा सराव मिळाला नाही अशी अडचण सध्याच्या संघाला आलेली नाही. ऑलिम्पिकमध्ये संभाव्य प्रतिस्पर्धी कोण आहेत, हे आपल्या खेळाडूंना माहीत झाले आहे. साहजिकच या संघांच्या शैलीचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ आपल्याकडे आहे. त्याच्या आधारे ऑलिम्पिकसाठी व्यूहरचना करणे सहज शक्य आहे.
संघाच्या प्रशिक्षकांबाबत तुझे काय मत आहे?
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कोणतीही योग्य व्यक्ती चालेल, मात्र त्यांचे मार्गदर्शन दीर्घकाळ कसे राहील, याचा विचार हॉकी संघटकांनी केला पाहिजे. परदेशी प्रशिक्षकांबरोबर संवाद साधण्यासाठी काही कालावधी जातो. त्यांच्याशी जरा कुठे सूर जुळले जात असतानाच त्याला पदावरून दूर केले जाते. किमान दोन-तीन वर्षे एकाच व्यक्तीकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविणे योग्य ठरेल. संघाचे उच्च कामगिरी संचालक रोलँट ओल्टमन्स यांच्याकडेच मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते गेली काही वर्षे भारतीय संघाबरोबर असल्यामुळे त्यांनी खेळाडूंच्या गुणदोषांचा बारकाईने अभ्यास आहे. ते भारतीय खेळाडूंकडून ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून घेतील अशी मला खात्री आहे.
पेनल्टी कॉर्नरच्या तंत्राबाबत काय सांगता येईल?
पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करण्याबाबत आपण अजूनही मागेच आहोत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. सराव शिबिरात या तंत्रावर अधिक भर दिला जात आहे. ऑस्ट्रेलिया, जर्मनीचे खेळाडू कशी शैली वापरतात याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. अर्थात केवळ पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल मारण्याच्या तंत्रावर अवलंबून न राहता फिल्डगोलवरही भर देण्याची गरज आहे. तसेच गोल करण्याबाबत अचूकता आणण्याची आवश्यकता आहे.
अलीकडेच राजकीय क्षेत्रात तू प्रवेश केला आहेस. त्याविषयी काय सांगता येईल?
खेळाडूंच्या समस्यांबाबत आवाज उठविण्याची मला इच्छा होती. त्यामुळे राजकीय क्षेत्राखेरीज अन्य कोणताही योग्य पर्याय माझ्याकडे नव्हता. सुदैवाने मला राज्यसभेवर पाठविण्यात आले आहे. खासदारकीचा उपयोग करून खेळाडूंच्या समस्यांबाबत प्रश्न मांडण्याची मला संधी मिळाली होती. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंना अजूनही रोजगार उपलब्ध झालेला नाही या प्रश्नाकडे मी राज्यसभेत शासनाचे लक्ष वेधले आहे. राजकीय क्षेत्रात सुरुवात चांगली झाली असली तरी अजूनही हॉकी खेळ मी सोडलेला नाही. विविध संघांकडून मी खेळत असतो. हॉकी हा माझा आत्माच आहे. त्याच्या ऋणात राहणेच मला आवडणार आहे.