अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व पाहायला मिळाले असले तरी दैवदुर्विलासामुळे त्यांना कसोटी जिंकता आली नाही. पावसाने त्यांच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरले आणि मालिका जिंकण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्धार विरून गेला. आता ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकता येणार नसली तरी उर्वरित दोन्ही सामने जिंकून त्यांना मालिकेत २-२ अशी बरोबरी साधता येईल. त्या अनुषंगाने चौथा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण असेल. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर मालिकेत बरोबरी करण्याच्या त्यांच्या आशा कायम राहतील. पण हा सामना ऑस्ट्रेलियाला गमवावा लागला किंवा अनिर्णित राहिला तर मात्र ऑस्ट्रेलियाच्या पदरी मालिका पराजय पडेल. त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यात जिंकण्याच्या ईर्षेनेच उतरतील.
तिसऱ्या सामन्यात दमदार शतक लगावत कर्णधार मायकेल क्लार्कने आपण फॉर्मात आल्याचे दाखवून दिले आहे. सलामीवीर ख्रिस रॉजर्स, स्टिव्हन स्मिथ आणि ब्रॅड हॅडिन यांच्या कामगिरीत सुधारणा दिसत असली तरी त्यांना मोठी खेळी साकारता आलेली नाही.
गोलंदाजीमध्ये पीटर सिडल आणि रयान हॅरिस चांगल्या फॉर्मात आहेत, पण या दोघांना वगळल्यास ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा भेदकपणा दिसत नाही.
वेळ : दुपारी ३.३० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट आणि स्टार एचडी वाहिनीवर.
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया ‘डीआरएस’च्या पाठीशी
दुबई : अ‍ॅशेस मालिकेत दोन्ही संघांनी यूडीआरएसवर टीका केली असली तरी आयसीसीचे महाव्यवस्थापक जेफ अलार्डिस यांच्याशी संघाच्या प्रतिनिधींनी चर्चा करून पुन्हा ‘डीआरएस’च्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. ‘‘गेल्या तीन सामन्यांमध्ये ‘डीआरएस’ची कामगिरी अपेक्षेसारखी झाली नसल्याचे आम्ही मान्य करतो. या वेळी दोन्ही संघांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे याबाबतचे मत जाणण्यासाठी मी येथे आलो आहे,’’ असे अलार्डिस यांनी सांगितले.

Story img Loader