ब्राझील आणि इटली या ‘अ’ गटातील दोन्ही बलाढय़ संघांनी साखळी फेरीतील दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. मात्र उपांत्य फेरीत विश्वविजेत्या स्पेनविरुद्धची लढत टाळण्यासाठी आणि गटात अव्वल स्थान पटकावण्यासाठी ब्राझील आणि इटली या संघांमध्ये चुरस रंगणार आहे.
आतापर्यंत गटात एकही गोल स्वीकारावा न लागलेल्या ब्राझीलला गटात अव्वल स्थान पटकावण्यासाठी इटलीविरुद्ध पराभवाची नामुष्की टाळावी लागणार आहे. त्याउलट मेक्सिकोविरुद्ध २-१ आणि जपानविरुद्ध ४-३ असे निसटते विजय मिळवणाऱ्या इटलीला ब्राझीलचा पाडाव करण्यासाठी कामगिरी उंचवावी लागणार आहे. इटलीने ब्राझीलला हरवल्यास, २००२नंतर ब्राझीलला त्यांच्याच भूमीत पराभूत करणारा इटली हा पॅराग्वेनंतर दुसरा संघ ठरेल. ब्राझीलच्या डेव्हिड लुइझच्या नाकाला दुखापत झाल्याने तो नाकाला संरक्षक कवच घालून या सामन्यात खेळणार आहे.
जपान-मेक्सिको यांच्यात औपचारिक लढत
बेलो होरिझोन्टे : मेक्सिको आणि जपान यांनी पहिल्या दोन्ही लढती गमावल्यामुळे त्यांचे कॉन्फेडरेशन चषक स्पर्धेच्या बाद फेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे उभय संघांमध्ये शनिवारी मध्यरात्री होणारी लढत औपचारिक ठरणार आहे. मेक्सिको आणि जपान हे दोन्ही संघ तुल्यबळ असले तरी त्यांना या स्पर्धेत मात्र ब्राझील आणि इटली या बलाढय़ संघांविरुद्ध कामगिरी उंचावता आली नाही. एएफसी चषक विजेत्या जपानने ब्राझीलविरुद्ध नांगी टाकली तरी इटलीला त्यांनी कडवी लढत दिली. मेक्सिकोने इटलीविरुद्ध निसटता पराभव पत्करला तरी ब्राझीलविरुद्ध ते निष्प्रभ ठरले. त्यामुळे मेक्सिकोविरुद्ध जपानचे पारडे जड मानले जात आहे.
शनिवारचे सामने
इटली वि. ब्राझील (मध्यरात्री १२.३० वा.पासून)
जपान वि. मेक्सिको (मध्यरात्री १२.३० वा.पासून)
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, ईएसपीएन, ईएसपीएन एचडी.