Para Asian Games: एका क्षणी तुम्ही सैन्यात सैनिक म्हणून देशाची सेवा करत असाल आणि दुसरीकडे काही लोकं देशासाठी सोडा स्वतःसाठी सुद्धा काही करू शकत नाही. मात्र, सैनिकांची गोष्ट वेगळी असते. त्यांचा एक जरी अवयव निकामी झाला तरी ते जिद्द सोडत नाहीत. असाच काहीसा प्रकार पुण्यातील मेजर सोमेश्वर राव यांच्याबाबतीत घडला. जम्मू-काश्मीरमधील उरी येथे झालेल्या भूसुरुंगाच्या स्फोटामुळे त्यांना डावा पाय गमवावा लागला. २०१७ मध्ये झालेल्या या अपघाताने एका धाडसी लष्करी जवानाचे आयुष्य क्षणार्धात बदलून टाकले. घटनेनंतर उपचारादरम्यान स्वत:चे जीवन संपवण्याचा विचारही सोमेश्वरच्या मनात आला. पण त्याच्या आईच्या फोनने त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले.
३३ वर्षीय सोमेश्वर राव या घटनेतून बरे झाले आणि त्यांनी खेळ हा त्यांच्या आयुष्याचा मुख्य आधार बनवून घेतला. ५४वर्षीय पॅरा ट्रायथलीट लेफ्टनंट कर्नल गौरव दत्ता यांच्या भेटीने सोमेश्वरच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सोमेश्वर यांनी सांगितले की, “ते लेफ्टनंट दत्ता यांना पुण्यातील कृत्रिम अवयव केंद्रात भेटले, त्यानंतर त्यांनी ट्रॅक आणि फील्ड या लांब उडी प्रकारात हात आजमावला. आता त्या खेळात ते वर्षाअखेरीस होणाऱ्या पॅरा आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सोमेश्वर म्हणाले, “मी ब्लेड-रनर म्हणून सुरुवात केली, पण नंतर लांब उडीकडे वळलो आणि आता त्याच खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.” त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेची आठवण करून देताना राव म्हणतात की “त्या रात्री उरी येथील एका खंदकात भूसुरुंगाचा स्फोट झाला. आम्ही तिथे पाहणी करायला गेलो. तिथे बऱ्यापैकी अंधार होता, त्यामुळे बॅटरीच्या प्रकाश आम्ही तिथे गेलो. त्या रात्री काहीही झाले नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परत जात असताना एका खाणीत अडकलो. आम्ही अनेकदा या वाटेने जायचो, पण त्यादिवशी मार्ग पूर्वीसारखा नव्हता. मग जो प्रकार घडला तो सर्वांसमोर आहे.
राव यांच्यासोबत, जंपर्स सोलाई राज आणि उन्नी रेणू पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत संघात सामील होतील. तर जसबीर सिंग आणि अजय कुमार ४०० मीटर स्पर्धेत सहभागी होणार आहेत. याशिवाय होकातो सेमा, सोमण राणा आणि वीरेंद्र हे शॉटपुटमध्ये सहभागी होणार आहेत. लेफ्टनंट कर्नल दत्ता यांनी २०१७ मध्ये लष्कराच्या पॅरालिम्पिक (नोड) गटाची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता, सोमेश्वर रावसह APN चे आठ प्रशिक्षणार्थी २२-२३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग असतील. यासाठी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरही चाचण्या घेण्यात आल्या. सोमेश्वर आता चीनमध्ये भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
लेफ्टनंट कर्नल दत्ता म्हणतात की, “हे लोक कोणत्या परिस्थितीतून जात आहेत मला चांगलेच ठाऊक आहे. एके दिवशी तुम्ही योद्धा होता, दुसऱ्या दिवशी तुम्हाला असे वाटते की तुम्ही शेतात काम करण्यासही योग्य नाही. मी त्यांची मानसिकता समजू शकतो. म्हणूनच मी त्यांना मार्गदर्शन करतो आणि खेळांबद्दल प्रोत्साहन देतो.” विशेष म्हणजे, कर्नल गौरव दत्ता हे भारताचे पॅरा ट्रायथलीट आहे. अजूनही ते अपंगत्वाचा सामना करत असलेल्या देशातील माजी सैनिकांना मदत करतात.