पुणे मॅरेथॉनला दरवर्षीच पुणेकरांचा चांगला प्रतिसाद लाभतो. यंदाच्या ३३ व्या स्पर्धेमध्ये देश-विदेशातील धावपटू आणि हौशी नागरिकांनी उत्साहात सहभाग नोंदवला. यामध्ये एक असाही धावपटू होता. जो आपल्यातील जिद्द आणि कष्टाच्या जोरावर सर्वच स्पर्धकांसाठी प्रेरणादायी ठरला, हा स्पर्धक म्हणजे प्रशांत गौरकर. रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या गौरकर यांनी या पुणे मॅरेथॉनमध्ये कृत्रीम पाय वापरुन सर्वसामान्यांप्रमाणे धावण्याचा पराक्रम केला जो सर्वांसाठी लक्ष्यवेधी ठरला.
डिसेंबर महिन्याच्या पाहिल्या रविवारी पुण्यात दरवर्षी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेचे ३३ वे वर्ष होते. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पुणे मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या खेळाडूच वर्चस्व पाहण्यास मिळाले असून फुल मॅरेथॉनमध्ये अटलाव डेबेड विजेता ठरला आहे. या संपूर्ण स्पर्धेत ५ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सहभागी झालेले प्रशांत गौरकर यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रशांत यांचा ट्रेन अपघातामध्ये दोन्ही पाय गेले आणि त्यांनी कृत्रीम पाय लावून या स्पर्धेत सहभागी झाले.
आपल्या या सहभागाबद्दल गौरकर म्हणाले, २००७मध्ये लष्करामध्ये भरती झाल्यावर सुरुवातीला त्यांनी आसाममध्ये काम केले. त्यानंतर कामासाठी नागपूर येथे रेल्वेमधून प्रवास करत होतो. त्यावेळी ट्रेनमधून खाली उतरताना एकाने मला मागून धक्का दिला आणि खाली पडलो. या अपघातामध्ये माझे दोन्ही पाय गेले. आता पुढे काय करायच असा प्रश्न उपस्थित झाल्यावर घरातील आणि मित्र परिवाराने खूप सहकार्य केले. त्याचदरम्यान पायावर शस्त्रक्रिया करित कृत्रीम पाय बसवण्यात आले. त्यामुळे मला चालणे शक्य झाले. आता मी लष्करातून जुलै २०१८ मध्ये निवृत्त झालो. त्यानंतर आता फिटनेस कोच म्हणून काम करत आहे. तसेच २०१६ आणि यंदा पुण्यातील स्पर्धेत सहभागी झालो आहे. या स्पर्धेत सहभागी झाल्याने एक वेगळा आनंद मिळतो.
मी अपघातामध्ये दोन्ही पाय गमावल्यानंतर खूप दुख झाले होते. मात्र, ते दुःख बाजूला सारून मी कृत्रीम अवयवांद्वारे (पाय) पुन्हा माझा प्रवास सुरू केला. तर समाजात किती ही संकटं आले तरी तरुण वर्गाने खचून जाऊ नये. कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर आपण आपले लक्ष गाठू शकतो, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.