रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेसह आणखी काही स्थानिक क्रिकेट स्पर्धामध्ये निराशामय कामगिरी करणाऱ्या मुंबई संघाने आयपीएलच्या बाजारात मात्र आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे. सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासहित मुंबईच्या ११ खेळाडूंना मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब अशा चार संघांनी खरेदी केले आहे. मुंबईच्या सर्वाधिक पाच खेळाडूंना राजस्थान रॉयल्सने तर चार खेळाडूंना मुंबई इंडियन्सने संघात स्थान दिले आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांनी मात्र मुंबईच्या खेळाडूंविषयी उत्सुकता दर्शवली नसल्याचेच सिद्ध होते.
गतवर्षी मुंबई इंडियन्सने मुंबईकर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकण्याची किमया साधली होती. त्यामुळे मुंबई इंडियन्सने रोहितला लिलावाआधीच संघात कायम राखले, तर प्रत्यक्ष लिलावामध्ये वेगवान गोलंदाज आणि मुंबईचा कर्णधार झहीर खानला दोन कोटी ६० लाख रुपयांना, तर यंदाचा स्थानिक हंगाम गाजवणाऱ्या आदित्य तरेला एक कोटी ६० लाख रुपये किमतीला खरेदी केले. याशिवाय सुशांत मराठेला दहा लाख रुपयांचा भाव मिळाला.
आयपीएलच्या मागील हंगामात क्वालिफायर-२ पर्यंत आणि चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या यशाचा शिल्पकार होता, तो अजिंक्य रहाणे. चॅम्पियन्स लीगमध्ये ४२ वर्षीय प्रवीण तांबेने आपल्या लाजवाब फिरकीने सर्वाचे लक्ष वेधले. चॅम्पियन्स लीग स्पध्रेत रहाणेला ‘गोल्डन बॅट’ तर तांबेला ‘गोल्डन बॉल’ हा पुरस्कार मिळाला. मुंबईच्या बळावर मिळालेले हे यश राजस्थान रॉयल्सची मुंबईनिवासी मालकीण अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ध्यानात ठेवून रहाणेला लिलावाआधीच संघात राखले, तर तांबेला दहा लाख रुपयांना खरेदी केले. मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीला एक कोटी १० लाख रुपये भाव मिळाला, तर अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायरला ७५ लाख आणि फिरकी गोलंदाज इक्बाल अब्दुल्लाला ६५ लाख रुपयांची बोली लावून राजस्थानने खरेदी केले.
मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवला कोलकाता नाइट रायडर्सने ७५ लाख रुपये बोली लावून खरेदी केले, तर यंदाच्या हंगामात टिच्चून वेगवान मारा करणाऱ्या शार्दूल ठाकूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने २० लाख रुपयांना खरेदी केले.
याविषयी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि मुंबईचे माजी प्रशिक्षक प्रवीण अमरे म्हणाले की, ‘‘गेली काही वष्रे मुंबई इंडियन्सला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. गेल्या वर्षी त्यांचे जेतेपदाचे स्वप्न रोहितच्या नेतृत्वाखाली साकारले. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याला त्यांनी संघात कायम राखले. रहाणे आयपीएल खेळू शकेल का, असा प्रश्न काही वर्षांपूर्वी उपस्थित केला गेला होता. परंतु रहाणेने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. आयपीएलमध्ये खूप पैसा आहे. परंतु दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याचा, मार्गदर्शनाचा अनुभव हा मोठा आहे. रोहित व अजिंक्य यांना तर फ्रँचायझींना कायम राखले आहे. हा मुंबईच्या खेळाडूंचा सन्मानच आहे.’’
तथापि, मुंबईचा आदित्य तरे म्हणाला की, ‘‘गेली काही वष्रे मी मुंबई इंडियन्समधूनच खेळतो आहे. लिलावामध्येही माझ्यावर हा विश्वास फ्रँचायझींनी दाखवला, त्यामुळे मी खूष आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना अनेक दिग्गज खेळाडू आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळते. त्यामुळे चांगली तयारी होते आणि कामगिरी सुधारते.’’
धवल कुलकर्णीने प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘‘राहुल द्रविडसारखा आदर्श क्रिकेटपटू मार्गदर्शक असलेल्या संघात खेळायची संधी मिळते आहे, याचा खूप आनंद होतो आहे. गेली काही वष्रे मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना दिग्गज खेळाडूंकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळायल्या. राजस्थानच्या संघात माझ्यासोबत मुंबईचे पाच खेळाडू आहेत, हेसुद्धा अतिशय आनंददायी आहे.’’

पंजाब आणि मुंबई संघात भूमीपुत्रांना न्याय
रणजीच्या व्यासपीठावर जरी २७ राज्यांचे प्रतिनिधित्व होत असले तरी सध्या आयपीएलमध्ये मात्र नावाजलेल्या आठ शहरांचेच नावाच्या रूपात प्रतिनिधित्व होत आहे. त्यामुळे नावाला जागत भूमीपुत्रांना न्याय देण्यात फक्त किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ सर्वात अग्रेसर दिसला. या संघात पंजाबच्या करणवीर सिंग, मनप्रीत सिंग, संदीप शर्मा, मनन व्होरा, गुरकिराट सिंग मान यांचा समावेश आहे. त्यानंतर क्रमांक लागणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघात झहीर खान, रोहित शर्मा, आदित्य तरे आणि सुशांत मराठे असे मुंबईचे चार खेळाडू आहेत. याचप्रमाणे चेन्नई सुपर किंग्जमध्ये आर. अश्विन, विजय शंकर आणि बाबा अपराजित असे तामिळनाडूचे तीन खेळाडू आहेत. सनरायजर्स हैदराबाद संघात चामा मिलिंद आणि आशीष रेड्डी असे हैदराबादचे दोन खेळाडू आहेत, तर कोलकाता नाइट रायडर्स संघात देवव्रत दास आणि वीर प्रताप सिंग असे बंगालचे दोन खेळाडू आहेत. राजस्थान रॉयल्समध्ये राजस्थानचा दिशान याज्ञिक तर दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये दिल्लीचा मिलिंद कुमार असे एकमेव चेहरे आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात मात्र कर्नाटकच्या एकाही खेळाडूचा समावेश नाही.

Story img Loader