२०१०च्या विश्वचषकाचा अंतिम सामना बऱ्याच कारणांनी गाजला. इंग्लंडचे रेफरी हॉवर्ड वेब यांनी तब्बल १४ पिवळी आणि १ लाल कार्ड दाखवून ऐतिहासिक ठरवला. नेदरलँड्सच्या वाटय़ाला नऊ पिवळी आणि एक लाल कार्ड तर स्पेनच्या वाटय़ाला पाच पिवळी कार्ड होती. पण आंद्रेस इनियेस्टाच्या निर्णायक गोलमुळे विश्वचषक उंचावण्याच्या नेदरलँड्सच्या स्वप्नांचा चुराडा झाला, तर पहिल्यांदाच स्पेनने जगज्जेतेपदाला गवसणी घातली. चार वर्षांनंतर आजही नेदरलँड्सला या पराभवाच्या कटू स्मृती विसरता आलेल्या नाहीत. पण लुइस व्हॅन गाल यांची प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर नेदरलँड्सचे भाग्यच पालटले आहे.
‘एक सांघिक ध्येय डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येकाने एकत्र येऊन काम करण्याची गरज असते. फुटबॉल या खेळात ११ प्रतिस्पर्धी एक संघ या नात्याने तुमच्याविरुद्ध खेळत असतात. प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीची जाणीव असावी लागते. सहकाऱ्यांना मदत करूनच ते सांघिक ध्येय साकार करता येते,’’ नेदरलँड्सचे प्रशिक्षक लुइस व्हॅन गाल यांचे हे तत्त्वज्ञान.
पारंपरिक आक्रमकपणा आणि अप्रतिम तांत्रिक खेळ ही नेदरलँड्सच्या खेळाची शैली. म्हणूनच ८०च्या दशकात सुवर्णकाळ अनुभवलेल्या नेदरलँड्सला १९७४ आणि १९७८च्यानंतर २०१०मध्ये केवळ उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. २०१०चे हुकलेले विश्वविजेतेपद आणि युरो २०१२मध्ये पहिल्या फेरीतील मानहानीकारक पराभवानंतर लुइस व्हॅन गाल यांच्यावर दुसऱ्यांदा नेदरलँड्सच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळण्याची वेळ आली. स्पेनविरुद्धचा वचपा आणि विश्वचषकाचे जेतेपद अशी अग्निदिव्ये त्यांच्यासमोर होती.
युरो चषकातील तिन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यामुळे दोन वर्षांपूर्वी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारणारा हाच तो नेदरलँड्सचा संघ का, असा प्रश्न व्हॅन गाल यांना सतावू लागला. त्यामुळे त्यांनी खेळाडू, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून प्रत्येकाला संघात काय सुधारणा घडवून आणाव्यात, याविषयी मनमोकळेपणाने, न घाबरता मते मांडण्याचा आदेश दिला. वेस्ले श्नायडर, आर्येन रॉबेन या अनुभवी खेळाडूंनी आपली मते मांडली. त्यानुसार व्हॅन गाल यांनी संघात बदल घडवून आणण्यास सुरुवात केली. श्नायडरची कर्णधारपदी आणि रॉबेनची उपकर्णधारपदी निवड केल्यानंतर व्हॅन गाल यांनी ४-३-३ या आक्रमक व्यूहरचनेपेक्षा ५-३-२ ही काहीशी बचावात्मक, पण आक्रमक व्यूहरचना राबवली. रॉबिन व्हॅन पर्सी, केव्हिन स्टट्रमॅन आणि आर्येन रॉबेन हे व्हॅन गाल यांच्या रणनीतीचे प्रमुख शिलेदार. पण स्टट्रमॅनने दुखापतीमुळे माघार घेतली आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे व्हॅन पर्सीच्या समावेशाविषयी साशंकता निर्माण झाली.
२००२च्या विश्वचषकात व्हॅन गाल यांच्या प्रशिक्षकपदाखाली नेदरलँड्सला मुख्य फेरीत पात्र ठरता आले नव्हते. त्यामुळे व्हॅन गाल यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. त्यामुळे २०१४च्या विश्वचषक स्पर्धेआधी व्हॅन गाल यांनी खेळाडूंसमोर आपली व्यूहरचना सादर केली. खेळाडूंशी सलोख्याचे संबंध ठेवत त्यांनी डॅले ब्लाइंड, डॅरेल जॅनमॅट आणि मेम्फिस डीपे यांसारख्या युवा खेळाडूंना संधी दिली. बचाव फळी भक्कम केली. विश्वचषकाच्या पहिल्याच फेरीत नेदरलँड्ससमोर आव्हान होते ते स्पेनचे. गतपराभवाचा वचपा काढण्यासाठी नेदरलँड्स संघ सज्ज झाला होता. स्पेनविरुद्धच्या सामन्यासाठी व्हॅन गाल यांनी खेळाडूंना आनंदात ठेवण्यासाठी त्यांना सराव शिबिराला उपस्थित राहण्याऐवजी आपल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडना भेटण्याची परवानगी दिली. सामना सुरू होण्यापूर्वी चार तासआधी व्हॅन पर्सी आपल्या मुलांसोबत स्नूकर खेळत होता. गेल्या दोन वर्षांपासून व्हॅन पर्सीवर व्हॅन गाल यांनी बरीच मेहनत घेतली होती. त्याचाच परिणाम नेदरलँड्सला पाहायला मिळाला. पहिलाच लाजवाब गोल केल्यानंतर व्हॅन पर्सीने धावत येऊन व्हॅन गाल यांना टाळी दिली होती. नेदरलँड्सने गतविजेत्या स्पेनचे पानिपत केले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि चिलीचा धुव्वा उडवत ब गटात अव्वल स्थान पटकावले. नेदरलँड्सकडून दारुण पराभव आणि चिलीकडून हार यामुळे स्पेनचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. गतविजेत्यांना नामोहरम करण्याची व्हॅन गाल यांची रणनीती यशस्वी ठरली. पहिल्या फेरीत तिन्ही सामने जिंकणाऱ्या नेदरलँड्सच्या यशाचे रहस्य म्हणजे व्हॅन पर्सी किंवा रॉबेन नव्हे तर लुइस व्हॅन गाल हेच आहे.
फ्री-कीक : मॅजिकमॅन !
२०१०च्या विश्वचषकाचा अंतिम सामना बऱ्याच कारणांनी गाजला. इंग्लंडचे रेफरी हॉवर्ड वेब यांनी तब्बल १४ पिवळी आणि १ लाल कार्ड दाखवून ऐतिहासिक ठरवला.
First published on: 25-06-2014 at 02:11 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Louis van gaal plays important role for netherland