सामना कुठेही असो, सचिन तेंडुलकरवर निस्सीम प्रेम करणारे बिहारचे सुधीरकुमार गौतम हे तिथे हमखास सर्वाचे लक्ष वेधतात. शरीरावर देशाचा तिरंगा आणि सचिनचे नाव रंगवून हातात झेंडा आवेशाने फडकत ठेवणाऱ्या गौतम यांनी हे व्रत २००२पासून जपले आहे. त्यांनी आपले अखंड आयुष्य भारतीय क्रिकेट संघाचे सामने पाहण्यासाठी समर्पित केले आहे. आतापर्यंत २०९ एकदिवसीय, ३१ कसोटी, १८ ट्वेन्टी-२०, ५३ आयपीएल, तीन रणजी करंडक सामने सुधीरने पाहिले आहेत. आता वानखेडेवर सचिन आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात खेळणार आहे. त्यामुळे सुधीरही जड अंत:करणाने मुंबईत येणार आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत-
सचिनचे तुम्ही एक प्रकारे प्रचारक मानले जाता?
सचिन क्रिकेटचे दैवत आहे, मी फक्त एक भक्त आहे.
सचिनचे हे काय प्रेम आहे, ज्याने तुमच्यावर गारुड केले आहे?
मास्टर-ब्लास्टर सचिनमुळेच मला ही प्रेरणा मिळाली. २००२पासून मी शरीर रंगवून आणि झेंडा घेऊन सामने पाहायला सुरुवात केली. २००३मध्ये माझी सचिनशी भेट झाली. सचिनमुळेच मला क्रिकेटमध्ये आदराची वागणूक मिळते आहे. तो त्या सामन्यात खेळो अथवा न खेळो, मला प्रत्येक सामन्याचे तिकीट आवर्जून दिले जात आहे.
२ एप्रिल २०११ या दिवशी भारताने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती. सचिनने मग ड्रेसिंग रूममध्ये तुझी खास भेट घेतली होती?
त्या दिवशी माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. क्रिकेटमधील या महापुरुषाने मला ड्रेसिंग रूममध्ये बोलावून विश्वचषक माझ्या हातात दिला. त्या विश्वचषकाचा स्पर्श साक्षात त्याच्यामुळे साधता आला. तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणून मी नमूद करेन.
जगभरातील क्रिकेटरसिकांना सुधीर गौतम हे नाव ठाऊक आहे. तुमच्या कुटुंबीयांचे तुमच्याविषयी काय मत आहे?
माझ्या जीवनशैलीवर माझे कुटुंबीय नाराज आहेत. आपला मुलगा बिनकामाचा आहे, असेच त्यांचे मत आहे. बेरोजगार असल्यामुळे घरी आई-वडिलांना पैसे देणे कठीण जाते.
तुमचा चरितार्थ कसा चालतो?
क्रिकेटमुळेच चालतो. मला क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या अनेकांची मदत लाभते. कुठे सामने पाहायला गेलो तरी खाणे-राहणे या समस्या येत नाहीत.
तुम्ही ठिकठिकाणी क्रिकेट सामने पाहायला जाता. तिथे शरीरावर रंगकाम कसे करता?
मी जिथे जातो, तिथे रेल्वे स्थानकावरच माझी दोस्त मंडळी हजर राहतात. मला पुढे एक पैशाचाही खर्च होत नाही. फक्त रंग माझे असतात. बऱ्याचशा शहरांमध्ये मला रंगवणारे माझे मित्र माझ्याकडून पैसेही घेत नाहीत. माझी फार मोठी आर्थिक कुवत नाही. परंतु प्रत्येक रंगकार्यात मदत करणाऱ्या व्यक्तीला ५१ रुपये मी नक्की देतो.
सचिनच्या दोनशेव्या कसोटीसाठी तुम्ही काही वेगळा विचार केला आहे का?
हो. माझ्या शरीरावर तिरंग्याच्या रंगांमधील हिरव्या रंगावर ‘गॉड ऑफ क्रिकेट’ नमूद करण्यात येईल.
सचिनच्या निवृत्तीनंतरही तुमचे हे ‘प्रचारा’चे कार्य चालू राहील?
होय, जोपर्यंत मी या जगात शेवटचा श्वास घेईन, तोपर्यंत ‘तेंडुलकर टेन’चे माझे कार्य चालूच राहील. सचिन आता क्रिकेटच्या मैदानावर नसेल, याचे माझ्यासह सर्व देशवासीयांना अतीव दु:ख झाले आहे, परंतु तरीही भारतीय संघासोबत माझा प्रवास अखंड चालू राहील.

Story img Loader