तब्बल २३ वर्षे सचिन तेंडुलकरने देशाची सेवा केली आणि क्रिकेटविश्वाचा तो राजदूत झाला. सचिनने क्रिकेटजगताला आनंदाचे अनंत क्षण दिले आणि चाहत्यांनीही त्याच्यावर उदंड प्रेम केलं. त्यामुळेच या चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे सचिनही हेलावला आणि त्याचे डोळे पाणावले. चाहत्यांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे माझे डोळे पाणावले, अशी प्रतिक्रिया सचिनने ‘ट्विटर’च्या माध्यमातून दिली आहे.
रविवारी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सचिन कुटुंबीयांसमवेत सुट्टीसाठी मसुरीला आला आहे. सचिनच्या निवृत्तीचा साऱ्यांनाच धक्का बसला असून सचिनने याबद्दल कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. पण मंगळवारी ‘ट्विटर’च्या माध्यमातून सचिनने आपल्या मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. वर्षोन्वर्षे चाहत्यांचे मला उदंड प्रेम आणि पाठिंबा लाभला, त्यांना धन्यवाद देण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांमुळे माझं हृदय आनंदात होतं, हसतं होतं, तर दुसरीकडे डोळ्यांतून आसू आल्यावाचून राहिले नाहीत. एकदिवसीय क्रिकेटमधल्या अद्भुत आठवणी आयुष्यभर माझ्याबरोबर राहतील, धन्यवाद, असेही सचिनने ‘ट्विटर’वर लिहिले आहे.    

Story img Loader