व्हॅलेंटाइन विशेष, सौजन्य –
प्रेम कुणावरही करावं असं म्हटलं जात असलं तरी क्रीडा क्षेत्रात वावरणाऱ्या काही जणांच्या बाबतीत असं होतंच असं नाही. त्यांच्यातल्या काही नशिबवानांना त्यांच्या क्षेत्रात, त्यांच्या आसपासच वावरणारा जोडीदार भेटतो आणि प्रेम आणि करिअर दोन्ही बहरतं..
खरेखुरे प्रेम जात, धर्म, देशाच्या सीमा ओलांडूनही प्रकट होते आणि फुलते. मैदानावर खेळत असताना झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात होते आणि नंतर ते एकमेकांचे जीवनसाथीही होतात अशी कितीतरी उदाहरणे पाहावयास मिळतात. स्टेफी ग्राफ व आंद्रे अगासी, सानिया मिर्झा व शोएब मलिक, मिल्खासिंग व निर्मल कौर या जोडय़ांनी आपापल्या खेळात नावलौकिक मिळविला, पण त्याचबरोबर प्रेमविवाह करणारे खेळाडू म्हणूनही त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली.
आपला जीवनसाथी म्हणून एखाद्याची निवड केल्यानंतर एकमेकांपासून अलग न होण्याचा निर्णय ते घेतात. एकमेकांना भेटल्यानंतर काही वर्षे लोटली तरीही हे धागे पक्केअसतील तर ते कोणीही तोडू शकत नाही. मिल्खासिंग व त्यांची पत्नी निर्मल कौर यांच्याबाबत असेच काहीसे घडले. १९५५ मध्ये या दोघांची पहिल्यांदा भेट झाली, मात्र त्यांचा विवाह होण्यास तब्बल सात वर्षांचा कालावधी लागला.
निर्मल कौर या आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू होत्या. १९५५ मध्ये सिलोनमध्ये (आता श्रीलंका) झालेल्या आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघाचे नेतृत्व करीत होत्या. त्याच वेळी मिल्खासिंग हे आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तेथे गेले होते. निर्मल व मिल्खासिंग यांची तेथे पहिल्यांदा भेट झाली. तिथे ते गप्पागोष्टीही करीत असत. निर्मल यांनी त्याच वेळी मिल्खासिंग यांना आपला भावी पती म्हणून निवड केली होती. एकदोन वेळा त्यांनी हा विषय काढण्याचा प्रयत्न केला होता. तथापि मिल्खासिंग यांनी हा विषय टाळला.
त्यामागे कारणही तसेच होते. बहिणीच्या घरी राहत असताना त्यांच्या वस्तीत असलेल्या एका तरुणीला त्यांनी पसंत केले होते. पण त्यावेळच्या रिवाजानुसार ते स्वत: पुढाकार घेऊ शकत नव्हते.
सेनादलाकडून खेळताना त्यांना अनेक मैत्रिणी मिळाल्या मात्र विवाहाचा प्रस्ताव करण्याचे धाडस ते दाखवू शकले नाहीत. १९६० मध्ये दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती. त्या वेळी व्हॉलीबॉल खेळावयास निर्मल आल्या होत्या. तर मिल्खासिंग अॅथलेटिक्सकरिता आले होते. त्या वेळी जुन्या मैत्रीचे धागे पुन्हा विणले गेले. गप्पागोष्टींमध्ये विवाहाचा विषय निघाला नाही तर नवलच. या वेळी निर्मल यांच्या प्रस्तावास विरोध दर्शविण्याचे धाडस मिल्खासिंग दाखवू शकले नाहीत. मात्र स्पर्धात्मक कारकीर्द संपेपर्यंत थांबण्याची अट मिल्खासिंग यांनी घातली आणि निर्मल यांनी मान्य केली. दोघांच्याही घरून त्यास विरोध झाला नाही.
स्टेफी ग्राफ व आंद्रे अगासी हे दोघेही अव्वल दर्जाचे टेनिसपटू. स्टेफी जर्मन तर अगासी अमेरिकन. स्टेफीशी मैत्री होण्यापूर्वी अगासीचे ब्रुक शील्ड या ख्यातनाम अभिनेत्रीबरोबर प्रेमप्रकरण सुरू होते. शील्ड हिला चित्रपटात करिअर करायचे असल्यामुळे अगासी व शील्ड यांनी एकमेकांशी फारकत घेतली. स्टेफी त्याच्या प्रेमात पडली. सुरुवातीला अगासीने याकडे केवळ दोस्ती म्हणून पाहिले. टेनिसमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर स्टेफीने अगासीसमोर विवाहाचाच प्रस्ताव ठेवला आणि त्याने तो मान्यही केला.
रशियाची मारिया शारोपावा ही स्लोव्हेनियाचा बास्केटबॉलपटू साशा लुजेसिक याच्या केव्हा प्रेमात पडली हे तिलाही कळले नाही. अमेरिकेतील एनबीए लीग स्पर्धामध्ये साशा हा एका क्लबकडून अनेक वर्षे खेळत आहे. मारिया ही अनेक वेळा अमेरिकेतील मानांकन स्पर्धामध्ये खेळते. एका स्पर्धेच्या वेळी प्रेक्षकांमध्ये बसून तिला प्रोत्साहन देणाऱ्या साशाबाबत तिला खूप ओढ निर्माण झाली. त्याच्याशी ओळख झाल्यानंतर त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. तो अमेरिकेतच स्थायिक झाला असल्यामुळे मारियानेही अमेरिकेतच राहण्याचा निर्णय घेतला.सुखाच्या प्रसंगापेक्षा दु:खात भागीदार होतो, तोच आपल्याला जास्त जवळचा वाटतो. सानिया मिर्झा व शोएब मलिक यांच्याबाबत असेच काहीसे घडले. या दोघांची पहिली भेट २००४ मध्ये ऑस्ट्रेलियात झाली. सानिया ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा खेळावयास गेली होती तर शोएब पाकिस्तानच्या संघाबरोबर तेथे मालिका खेळावयास आला होता. एकाच हॉटेलमध्ये सानिया व पाकिस्तानचे खेळाडू उतरले होते. त्या वेळी सानिया व शोएब यांची ओळख झाली. केवळ दोनच मिनिटांची त्यांची ती भेट होती. मात्र पहिल्याच भेटीत त्यांच्यात ‘इशारो इशारोमें’ घडले. त्यानंतर तेथील क्रिकेट सामन्यांना सानियाची उपस्थिती असायची तर सानियाच्या सामन्यांना शोएब आवर्जून जायचा. ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील एकेरीत दारुण पराभवानंतर सानिया खूपच निराश झाली. त्याच वेळी पाकिस्तानलाही सपाटून मारा खावा लागला होता. निराश झालेल्या सानिया व शोएब यांनी त्या वेळी हॉटेलमध्ये एकमेकांच्या दु:खात वाटा उचलला. खरं तर सानियाचा विवाह तिचा बालपणापासून कौटुंबिक मित्र असलेला सोहराब मिर्झा याच्याशी ठरला होता. मात्र शोएबशी ओळख झाल्यानंतर सानियाच्या मनात वादळ उठत होते. अखेर तिने शोएबशी विवाह करायचा निर्णय घेतला.
असे असले तरी शोएबशी विवाह करायचा म्हणजे अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार हे सानियाला कळत होते. सर्वात पहिली समस्या होती ती त्याला व्हिसा मिळण्याचीच. कारण पाकिस्तान व भारत यांच्यात राजकीय शत्रुत्व आहे. सानियाचे नशीब जोरदार होते. त्याला व्हिसा मिळाला आणि सानियाला मनासारखा पती मिळाला. सानियाचा शोएबशी विवाह होणार असल्याच्या बातमीने भारतात खळबळ उडाली. आपल्या देशातील सर्वात सौंदर्यवती टेनिसपटू म्हणून बिरुद लाभलेल्या सानियास भारतात एकही चांगला नवरा मिळाला नाही याचेच आश्चर्य सर्वाना वाटले. तिच्यावर फिदा होणाऱ्यांनाही या बातमीने पुरते घायाळ केले.
दिनेश कार्तिक या लग्न झालेल्या क्रिकेटपटूवर दीपिका पल्लीकल ही स्क्वॉशपटू फिदा होईल असे कोणी स्वप्नातही पाहिले नसेल. पण चेन्नईतील एका व्यायामशाळेत या दोघांची ओळख झाली व अवघ्या एक वर्षांनंतर या दोस्तीचे रूपांतर जीवनसाथी करण्यात झाले. वयाने बऱ्यापैकी मोठा असला तरी दिनेशला जीवनसाथी करण्याचा निर्णय दीपिकाने घेतला तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. कारण त्याच्यापेक्षा दीपिका ही सर्वार्थाने उजवी आहे. अर्थात प्रेम हे आंधळे असते असे म्हटले जाते. दीपिकाने त्याच्याशी विवाहाचा निर्णय घेतल्यानंतर दिनेशला पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घ्यावा लागला.
आपल्या देशात क्रीडा क्षेत्रातील अनेक ख्यातनाम खेळाडूंचा प्रेमविवाह झाला आहे. भाषा, राज्य, जात आदी कशाच्याही सीमांची अडचण त्यामध्ये आली नाही. महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू कमलेश मेहता याने आपल्याच खेळातील पूर्वाचलाची खेळाडू आंतरराष्ट्रीय मोनालिसा बारुआ हिच्याशी विवाह केला. भारताची सुवर्णकन्या पी.टी.उषा हिने जीवनसाथी म्हणून आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू श्रीनिवासन याची निवड केली. धावपटू अंजू बॉबी जॉर्ज हिने आपलेच प्रशिक्षक व तिहेरी उडीतील अनुभवी खेळाडू रॉबर्ट जॉर्ज यांच्याशी विवाह केला. पुल्लेला गोपीचंद या बॅडमिंटनपटूची त्याचीच सहकारी व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पी.व्ही.लक्ष्मी हिने आपला जीवनसाथी म्हणून निवड केली. क्रीडा क्षेत्रातच हे खेळाडू वावरत असल्यामुळे ते एकमेकांच्या समस्यांबाबत परिचित असतात. त्यामुळे प्रत्येकाचे करिअर करण्यास ते एकमेकांना पूर्ण सहकार्य करीत असतात. गोपीचंद याला त्याच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अकादमीत लक्ष्मीचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभत असते. उषा हिने अॅथलेटिक्स अकादमी सुरू केली आहे. त्यासाठी तिला सतत आपल्या पतीचे सहकार्य मिळत असते. त्यांना पहिले अपत्य झाल्यानंतर उषाने पुन्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही घरची आघाडी श्रीनिवासन याने सांभाळली. बुद्धिबळ, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, बास्केटबॉल, जलतरण आदी अनेक खेळांमधील असे प्रेमविवाह झाले आहेत. अशा विवाहांमध्ये कधी कधी कौटुंबिक अडचणींनाही सामोरे जावे लागण्याचे प्रसंग अनेक खेळाडूंना आले आहेत. मात्र ज्याप्रमाणे खेळाची कारकीर्द करताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते, त्याप्रमाणेच जीवनाचा साथीदार होताना आलेल्या अडचणींवर मात करण्यातच खरी मजा असते हे या खेळाडूंना लक्षात आले आहे. गुलाबाच्या फुलांचा वास घेताना थोडेसे काटे टोचले तरी चालतील कारण हा गुलाब हवाहवासा असतो नाही का?
प्रेम मैदानावरचे आणि मैदानाबाहेर
प्रेम कुणावरही करावं असं म्हटलं जात असलं तरी क्रीडा क्षेत्रात वावरणाऱ्या काही जणांच्या बाबतीत असं होतंच असं नाही.
First published on: 14-02-2014 at 12:04 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love on the ground and outside ground