लग्नाच्या गाठी वर जुळतात. पण प्रत्येकालाच आपल्यावर प्रेम करणारा, समजून घेणारा, असा जोडीदार हवा असतो. प्रेमाचे धागे पक्के असतील तर ते कोणीही तोडू शकत नाही. प्रेम झाल्यापासून ते विवाह करण्यापर्यंतचा काळ फार रोमँटीक असला तरी तो तेवढाच आव्हानात्मक असतो. काही वेळा हे नात विवाहबद्ध होण्यामध्ये बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. पण खरं प्रेम या साऱ्यावर मात करत पूर्णत्वाकडे नक्कीच पोहोचतं. मिल्खासिंग व त्यांची पत्नी निर्मल कौर यांच्याबाबत असेच काहीसे घडले. त्यांचा प्रेमविवाह म्हणजे एखाद्या चित्रपटातील कथेला साजेशीच कथा ठरली.
मिल्खा व निर्मल यांची १९५५ मध्ये पहिल्यांदा भेट झाली, मात्र त्यांचा विवाह होण्यास तब्बल सात वर्षांचा कालावधी लागला. त्यांच्या या प्रवासात अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. निर्मल या आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू होत्या. १९५५ मध्ये सिलोनमध्ये (आता श्रीलंका) झालेल्या आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघाचे नेतृत्व त्या करीत होत्या. त्याचवेळी मिल्खासिंग हे आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तेथे गेले होते. निर्मल व मिल्खासिंग यांची तेथे पहिल्यांदा भेट झाली. मिल्खा यांच्यावर लहानपणी झालेले कौटुंबिक आघात, त्यांच्या आईवडिलांसह अनेकांची झालेली हत्या, त्यानंतर त्यांनी जीवनात केलेला संघर्ष व कारकीर्द घडविताना त्यांनी घेतलेली मेहनत यामुळे सुरुवातीच्याच भेटीत निर्मल यांनी मिल्खासिंग यांची आपला भावी पती म्हणून निवड केली होती. एकदोन वेळा त्यांनी हा विषय काढण्याचा प्रयत्न केला होता. तर मिल्खासिंग यांनी हा विषय निघाल्यानंतर हळुच दुसरा विषय सुरू करीत विवाहाचा विषय टाळला होता.
मिल्खासिंग यांनी त्या वेळी हा विषय टाळण्यामागे कारणही तसेच होते. त्या वेळी एखाद्या तरुणाने अनोळखी मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला तर साक्षात मृत्यूलाच निमंत्रण असायचे. विवाह जमविण्याचे काम घरची वडिलधारी मंडळी करीत असत. वडिलधारी मंडळीविरुद्ध आवाज काढायचे धाडस कोणी दाखवत नसे.
सेनादलाकडून खेळताना त्यांना अनेक मैत्रिणी मिळाल्या, मात्र विवाहाचा प्रस्ताव करण्याचे धाडस ते दाखवू शकले नाहीत. दरम्यानच्या काळात मिल्खा व निर्मल यांची दोन-तीन वेळा पतियाळा येथे भेट झाली होती. मात्र त्या वेळीही विवाहाचा विषय निघू शकला नव्हता. १९६० मध्ये दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती. त्याकरिता मिल्खासिंग गेले होते. त्या वेळी निर्मल या दिल्लीतील लेडी आयर्विन महाविद्यालयात साहाय्यक क्रीडा संचालक म्हणून रुजू झाल्या होत्या. स्पर्धेनंतर मिल्खा यांना त्या महाविद्यालयात भाषण देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. एका शिक्षिकेच्या पोशाखातील निर्मल यांनी मिल्खा यांना आणखीनच मोहित केले. जुन्या मैत्रीचे धागे पुन्हा विणले गेले. दरम्यानचे काळात मिल्खा यांनी सेनादलाला रामराम केला व पंजाब शासनाच्या क्रीडा संचालनालयात उपसंचालकपदी रुजू झाले. योगायोगाची गोष्ट म्हणजे निर्मल त्याआधीच त्याच विभागात अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यामुळे मिल्खा व निर्मल यांची रोजच भेट होत गेली. त्यांच्या प्रेमाच्या गोष्टी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कैरोनसिंग यांच्यापर्यंत पोहोचण्यास वेळ लागला नाही. त्यांनी मिल्खा यांना पाचारण करीत खरोखरीच प्रेम असेल तर लगेच विवाह करून टाका असा सल्ला दिला. मिल्खा हे शीख, तर निर्मल या हिंदू असल्यामुळे दोघांच्या घरच्यांकडून विवाहाला ठाम विरोध होता. अखेर कैरोनसिंग यांनी मध्यस्थी करीत दोघांना विवाहबंधनात अडकविण्यासाठी पुढाकार घेतला.
प्रेमप्रकरणाबाबत निर्मल यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. मिल्खा यांना पहिल्या भेटीतच मी पती म्हणून निवडले होते. कितीही वर्षे लागली तरी चालतील, पण विवाह करीन तर मिल्खा यांच्याशीच असा दृढनिश्चय मी मनाशी केला होता. सुदैवाने देवाने माझे स्वप्न पुरे केले. हे ऋण फेडणे या जन्मी शक्य नाही, असे त्यांनी सांगितले.
विवाहाचा प्रस्ताव कोणी पहिल्यांदा मांडला, असे विचारले असता मिल्खा म्हणाले, र्थात निर्मल हिनेच. एक मात्र नक्की, आम्ही अतिशय विचारपूर्वक निर्णय घेतला. कितीही विरोध झाला तरी एकमेकांशीच विवाह करायचा, नाहीतर आजन्म विवाह करायचा नाही असेच आम्ही ठरविले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा