आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ उभारणीच्या कामामध्ये आणखी एक मोठा अडथळा आलेला नाही. जसप्रीत बुमराहपाठोपाठ अष्टपैलू हार्दिक पांड्याही आपल्या पाठीला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित हंगाम क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. बीसीसीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक थोड्याच दिवसांमध्ये उपचारांसाठी इंग्लंडला रवाना होणार असल्याचं समजतंय. दुबईत आशिया चषक स्पर्धेदरम्यान हार्दिक पांड्याला पाठीची दुखापत झाली होती. यानंतर हार्दिकने भारतीय संघात पुनरागमनही केलं. इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धाही तो खेळला, मात्र त्याच्या या पाठीच्या दुखापतीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे.

“हार्दिक आपल्या पाठीच्या दुखापतीवर डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी इंग्लंडला रवाना होईल. तो बांगलादेश दौऱ्यात नक्कीच खेळणार नाहीये, मात्र तो आणखी किती दिवस क्रिकेट खेळू शकणार नाही हे अजून निश्चीत समजलेलं नाही. डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर त्याच्याबद्दल निर्णय घेण्यात येईल.” पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना बीसीसीआयमधील सुत्रांनी माहिती दिली. विश्वचषकानंतर हार्दिक पांड्याला विंडीज दौऱ्यात विश्रांती देण्यात आली होती. यानंतर त्याने आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत पुनरागमन केलं होतं. आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून हार्दिक हा महत्वाचा खेळाडू आहे, त्यामुळे आगामी काळात त्याच्या दुखापतीबद्दल नेमकी काय माहिती समोर येतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader