फिफा विश्वचषकातील चावा प्रकरणानंतर उरुग्वेच्या लुइस सुआरेझने बार्सिलोनाकडून पुनरागमन केले, मात्र सुआरेझच्या पुनरागमनाच्या सामन्यात बार्सिलोनाला पराभवाचा सामना करावा लागला. आता चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी रात्री बार्सिलोनाची लढत अजाक्स संघाविरुद्ध होणार असून, बार्सिलोनातर्फे खाते खोलण्यासाठी सुआरेझ उत्सुक आहे.
२०११मध्ये लिव्हरपूलशी करारबद्ध झाल्यानंतर सुआरेझने चार वर्षांच्या कालावधीत तब्बल १११ गोल लगावले होते, पण जुलै महिन्यात बार्सिलोनाने सुआरेझला करारबद्ध केल्यानंतर त्याला अद्याप गोलचे खातेही खोलता आलेले नाही. गेल्या दोन सामन्यांत लिओनेल मेस्सी, नेयमार आणि सुआरेझ हे बार्सिलोनाचे त्रिकूट अपयशी ठरले. रिअल माद्रिदकडून या मोसमातील पहिलाच पराभव पत्करल्यानंतर बार्सिलोनाला १९४१नंतर प्रथमच सेल्टा व्हिगोने पराभूत करण्याची किमया केली.
‘अजाक्स संघाविरुद्धचा सामना आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. बार्सिलोनाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पुनरागमनानंतर बार्सिलोनाकडून चॅम्पियन्स लीगमध्ये खेळायला मिळणे हे माझे भाग्य आहे,’’ असे सुआरेझने सांगितले. बार्सिलोनाने या सामन्यात विजय मिळवल्यास, ते दोन सामने शिल्लक राखून अंतिम १६ जणांमध्ये मजल मारतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा