लिव्हरपूलचा स्टार खेळाडू लुइस सुआरेझला इंग्लंडमधील प्रोफेशनल फुटबॉलर्स असोसिएशनने या वर्षीचा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार देऊन त्याच्या कामगिरीला योग्य न्याय दिला आहे. २७ वर्षीय सुआरेझ जून महिन्यात ब्राझीलमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेत उरुग्वे संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. सुआरेझने या मोसमात ३० गोल झळकावले असून १२ गोल रचण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे लिव्हरपूलने दोन सामने शिल्लक असताना इंग्लिश प्रीमिअर लीगच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी मजल मारली आहे. ‘‘इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये अव्वल खेळाडू विविध संघांचे प्रतिनिधित्व करतात. या खेळाडूंनी आपल्या कामगिरीची दखल घेणे, हेच अभिमानास्पद आहे. संघासाठी प्रत्येक वेळी सर्वोत्तम योगदान देण्याचा मी प्रयत्न केला आहे. लिव्हरपूलमधील सहकारी आणि सपोर्ट स्टाफ यांच्या मदतीशिवाय हा पुरस्कार पटकावणे शक्य नव्हते,’’ असे सुआरेझने सांगितले. सुआरेझने आपले सहकारी स्टीव्हन गेरार्ड, डॅनियल स्टरिज तसेच चेल्सीचा इडेन हझार्ड, मँचेस्टर सिटीचा याया टौरे आणि साऊदम्प्टनचा अॅडन लालाना यांच्यावर मात करत हा बहुमान पटकावला आहे. लिव्हरपूलसाठी एका मोसमात ३० गोल झळकावणारा सुआरेझ हा इयान रश (१९८६-८७) यांच्यानंतरचा पहिला खेळाडू ठरला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा