उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लीगमध्ये अॅटलेटिको माद्रिदवर २-१ अशी मात; उपांत्य फेरीची दावेदारी भक्कम
घरच्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी रिअल माद्रिदकडून झालेल्या मानहानीकारक पराभवाचे दु:ख विसरून बार्सिलोना क्लबने बुधवारी युरोपियन महासंघाच्या (युएफा) चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेत दमदार विजयाची नोंद केली. लुईस सुआरेझच्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लीगमध्ये अॅटलेटिको माद्रिदवर २-१ असा विजय मिळवला. अॅटलेटिकोकडून फर्नाडो टोरेसने एकमेव गोल नोंदवला.
प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या कॅम्प नाऊ स्टेडियमवर गेल्या आठवडय़ात ला लिगा फुटबॉल स्पध्रेतील सामन्यात बार्सिलोनाला रिअल माद्रिदकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे बार्सिलोनाची यंदाच्या हंगामातील ३९ सामने अपराजित राहण्याची मालिका खंडित झाली होती. त्यामुळे चॅम्पियन्स लीगच्या या लढतीत बार्सिलोनाच्या कामगिरीवर साऱ्यांचे लक्ष लागले होते. २५व्या मिनिटाला टोरेसने अप्रतिम गोल करून बार्सिलोनाला धक्का दिला. मात्र, अवघ्या दहा मिनिटांत पंचांनी लाल कार्ड दाखवल्यामुळे टोरेसला मैदान सोडावे लागले. दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या माद्रिदने मध्यंतरापर्यंत १-० अशी आघाडी घेत बार्सिलोनावरील दडपण वाढवले होते.
माद्रिदच्या या रणनीतीमुळे स्टेडियमवर तणावाचे वातावरण दिसू लागले, परंतु दुसऱ्या सत्रात सुआरेझच्या गोलने हा तणाव मावळला. ६३व्या मिनिटाला जॉर्डी रॅमोसच्या पासवर सुआरेझने गोल करत बार्सिलोनाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. या गोलने स्टेडियमवर पुन्हा जल्लोश सुरू झाला आणि त्यात ७४ व्या मिनिटाला सुआरेझने भर घातली. सुआरेझच्या या दुसऱ्या गोलने सामना बार्सिलोनाच्या बाजूने झुकला आणि उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लीगमध्ये त्यांनी २-१ अशी आघाडी घेतली आहे. या आघाडीमुळे त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा