एखाद्या खेळाडूने परदेशात पराक्रम केला की त्याच्या स्वागतासाठी देशवासीय विमानतळावर स्वागतासाठी एकच गर्दी करतात, पण उरुग्वेवासीय ‘चावे’बाज लुइस सुआरेझच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. इटलीविरुद्धच्या सामन्यात जॉर्जियो चिएलिनीला सुआरेझने चावा घेतला होता, त्यानंतर फुटबॉलच्या मैदानावरील या ‘व्हिलन’च्या कृत्याचा सर्वच थरांतून निषेध करण्यात आला. फिफानेही त्याच्यावर कडक कारवाई केली. त्यानंतर मात्र सहानुभूतीची लाट सर्वत्र पसरली आहे. दस्तुरखुद्द चिएलिनीनेच ही शिक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे.
उरुग्वे हा फुटबॉलवेडय़ांचा देश. विश्वचषकात त्यांना पहिल्याच सामन्यात कोस्टा रिकाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण ‘इंग्लंडला कसे पराभूत करायचे, हे मला माहिती आहे’ असे सुआरेझने सांगितले आणि पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही त्याला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळवले. या सामन्यात सुआरेझने दोन गोल करत संघाला विजय मिळवून दिला, तर त्यानंतरच्या इटलीविरुद्धच्या सामन्यातही तो खेळला आणि उरुग्वे जिंकली, त्यामुळे सुआरेझ उरुग्वेसाठी यशदायी असल्याचे म्हटले गेले, पण इटलीच्या चिएलिनीचा ‘चावा’ घेतल्यामुळे फिफाने त्याच्यावर कठोर कारवाई केली आणि त्यामुळेच त्याला विश्वचषक स्पर्धा सोडून मायदेशी परतावे लागले. पण मायदेशी परतण्यापूर्वी सुआरेझने त्याची कामगिरी चोख बजावली, अशी भावना उरुग्वेवासीयांच्या मनात असून ते त्याच्या स्वागतासाठी येथील कारास्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठय़ा संख्येने दाखल झाले. या वेळी बऱ्याच जणांच्या हातामध्ये सुआरेझचे स्वागत करणारे फलक आणि त्याच्या नावाचा नाद सर्वत्र घुमत होता.

शिक्षा जास्तच वाटते
‘‘सामन्याबद्दल माझ्या मनात राग आणि नैराश्य आहे, पण सुआरेझ आणि त्याच्या कुटुंबीयांबाबत मी विचार करीत असून ते फार वाईट परिस्थितीतून जात आहेत. माझ्या मनात सुआरेझबद्दल सध्याच्या घडीला कोणतीच भावना नाही. त्याच्याबद्दल चांगले किंवा वाईट काहीच वाटत नाही. ही घटना माझ्यासाठी मैदानावरच संपली होती.’’
– जॉर्जियो चिएलिनी, इटलीचा खेळाडू
घटनेमुळे स्पध्रेला गालबोट
‘‘प्रतिस्पर्धी खेळाडूला चावा घेण्याच्या लुइस सुआरेझच्या कृत्यामुळे विश्वचषकाला गालबोट लागले आहे. मी माझ्या कारकिर्दीत आतापर्यंत कोणालाही चावलेलो नाही. चावणे खूपच वेदनादायी असू शकते. माझी मुले मला चावत, तेव्हा मी त्यांना शिक्षा देत असे. लहान मुलांना शिक्षा देता येते. त्याचप्रमाणे सुआरेझसारख्या प्रौढ व्यक्तीला चार महिने फुटबॉलशिवाय राहण्याची शिक्षा योग्यच आहे.’’
– रोनाल्डो, ब्राझीलचा माजी फुटबॉलपटू
सुआरेझने उपचार करून घ्यावेत
‘‘चावणे अत्यंत चुकीचा प्रकार आहे. असे प्रकार थांबवण्यासाठी त्याने उपचार करून घ्यायला हवेत. हजारो लोकांनी हा प्रकार पाहिला आहे. लहान मुलांनी असे कृत्य करायला नको. चुकीला शिक्षा झाली तरच योग्य पायंडा पडेल.’’
जेरोम वाल्के, फिफाचे सरचिटणीस

Story img Loader