स्वत:वर उपचार सुरू असताना कुणी दुसऱ्यावर उपचार करण्यासाठी धावून येईल का? पण लुईस सुआरेझच्या बाबतीत तसे घडले आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे सुआरेझ कोस्टा रिकाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. या सामन्यातील पराभवामुळे उरुग्वेचे बाद फेरीतील स्थान धोक्यात आले होते. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सुआरेझ खेळणे, उरुग्वेसाठी महत्त्वाचे होते. सुआरेझ दुखापतीतून बरा व्हावा, यासाठी उरुग्वेचे फिजियो वॉल्टर फरेरा हे स्वत:च्या कर्करोगावर सुरू असलेले थांबवून थेट ब्राझीलमध्ये अवतरले. लवकरच त्यांना या मेहनतीचे फळ मिळाले.
चार आठवडय़ांपासून सुआरेझ दुखापतीने त्रस्त होता. वॉल्टर फरेरा तो लवकर बरा होण्यासाठी बरीच मेहनत घेत होते. त्यासाठी त्यांनी आपल्यावरील उपचार थांबवले होते. अखेर इंग्लंडविरुद्ध पहिला गोल झळकावल्यानंतर सुआरेझने धावत येऊन फरेरा यांना मिठी मारून हा आनंद साजरा केला. राष्ट्रीय संघासाठी फरेरा यांनी केलेल्या त्यागाचे सुआरेझने केलेले हे कौतुक होते.
सुआरेझबाबत फरेरा म्हणाले, ‘‘विश्वचषकात खेळण्यासाठी तो बरीच मेहनत घेत होता. मी उरुग्वे संघाच्या सराव शिबिरात जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे सुआरेझ माझ्या घरी येत होता. तो तंदुरुस्त होण्यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतली. त्या कष्टांचे चीज झाले!’’ सुआरेझने मिठी मारल्यानंतर फरेरा यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ‘‘हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. पण त्यासाठी लढा हा द्यावाच लागतो. उरुग्वेच्या यशामुळे मी आनंदी असलो तरी माझा लढा कायम असणार आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा