पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रेरित केले, मोदींनी ऑलिम्पिक पदक विजेता भालेफेक पटू नीरज चोप्रा आणि बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू यांच्याशीही व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी नीरज चोप्राकडे आईने हाताने बनवलेल्या खास पदार्थाची मागणी केली, यावर नीरजने ऑलिम्पिकनंतर पंतप्रधानांना नक्की आणतो असे आश्वासन दिले. दोघांमधील संभाषणाचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदींनी नीरज चोप्राला आईच्या हातचा चुरमा हा पदार्थ बनवून आणण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निवासस्थानी आज पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळांची भेट घेत गप्पा मारल्या. यावेळी जर्मनीत असलेला नीरज चोप्रा देखील कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाला होता, यावेळी मोदींशी बोलण्याच्या सुरुवातीलाच नीरजने त्यांना अभिवादन करत, “सर कसे आहात” असा प्रश्न विचारला, ज्यावर मोदींनी हसत “मी तसाच आहे” (वैसा ही हु) असे उत्तर दिले.

यानंतर पीएम मोदींनी नीरजला त्यांच्यासाठी चुरमा आणण्याची आठवण करुन दिली. “मला अजून माझा चूरमा मिळालेला नाही”. (मेरा चुरमा अभी तक आया नाही), असे मोदी म्हणाले.

नीरज चोप्राने यावर स्मितहास्य करत उत्तर दिले की, ” यावेळी मी हरियाणातील चुरमा तुमच्यासाठी घेऊन येईन, गेल्यावेळी दिल्लीतील सारखेचा चुरमा आला होता.”

यावर पंतप्रधान मोदींनी विशेषत: “घरी आईने हाताने बनवलेला चुरमा मला खायचा आहे” असे सांगितले, यावर नीरजने पंतप्रधान मोदींना वचन दिले की, ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर तो त्यांना भेटण्यासाठी येईल तेव्हा घरी आईने हाताने बनवलेला ‘चुरमा’ घेऊनच येईल.

याविषयानंतर पंतप्रधान मोदींनी नीरज चोप्राला तंदुरुस्त आणि दुखापतमुक्त राहण्याचे आवाहन केले, आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी एक्सवर पॅरिस ऑलिम्पिकसाठी खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंबरोबरच्या भेटीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, @Olympics साठी पॅरिसला जाणाऱ्या आमच्या संघाशी संवाद साधला. मला विश्वास आहे की, आमचे खेळाडू त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन करतील आणि भारताचा गौरव करतील, त्यांचा जीवनप्रवास आणि यश १४० कोटी भारतीयांना आशा देतो. यावेळी त्यांनी लोकांना #Cheer4Bharat असे आवाहन केले आहे.

यावेळी रमिता जिंदाल (एअर रायफल नेमबाजी), रितिका हुडा (कुस्ती), आनंद पंघल (कुस्ती), निखत जरीन (बॉक्सिंग) इत्यादी काही नवीन खेळाडूंशीही पंतप्रधान मोदींनी संवाद साधला.