दमदार सलामीनंतर पी. व्ही. सिंधूने मकाऊ ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. अव्वल मानांकित सिंधूने थायलंडच्या सालाकजित पोनसन्नावर १८-२१, २१-८, २१-१४ अशी मात केली.
पोनसन्नाने शानदार खेळ करत पहिला गेम नावावर केला. पोनसन्नाच्या प्रभावापुढे सिंधू निष्प्रभ ठरली. मात्र दुसऱ्या गेममध्ये सिंधूने लौकिकाला साजेसा खेळ करत पोनसन्नाला नामोहरम केले. जोरदार रॅलींवर भर देत सिंधूने पोनसन्नाची दमछाक केली. त्याच वेळी नेटजवळून सुरेख खेळ करत तिने दुसरा गेम नावावर केला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधूने वर्चस्व राखताना सुरुवातीपासूनच आघाडी मिळवली. हीच आघाडी वाढवत नेत तिने तिसऱ्या गेममसह सामन्यावर कब्जा केला. चीन सुपर सीरिज स्पर्धेत सिंधूला सलामीच्या लढतीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते. आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक नावावर असणाऱ्या सिंधूने हा पराभव मागे ठेवत आगेकूच केली.
दरम्यान, अन्य लढतींमध्ये पुणेकर सायली गोखले तसेच पी. सी. तुलसी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. थायलंडच्या चोचुवांग पॉर्नपवीने सायलीवर २१-१९, १०-२१, २१-१५ असा विजय मिळवला.
पहिल्या गेममध्ये दोघींमध्ये जोरदार मुकाबला पाहायला मिळाला. एकेका गुणासाठी चुरस रंगलेल्या या गेममध्ये पॉर्नपवीने सरशी साधली. मात्र दुसऱ्या गेममध्ये सायलीने आपला खेळ उंचावत सरशी साधली. शैलीदार फटके, ताकदवान स्मॅशेसच्या आधारे सायलीने मुकाबला अंतिम गेममध्ये नेला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये मात्र पॉर्नपवीने वेगवान खेळ करत सायलीला नामोहरम केले. चीनच्या डी सुओने तुलसीचा २१-१५, २१-७ असा धुव्वा उडवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा