* राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारिणीची सोमवारी पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक
* निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गटातटांमधील राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. याचप्रमाणे अध्यक्षपदासाठीच्या समीकरणांनासुद्धा गती प्राप्त झाली होती; परंतु राजकारण आणि खेळ या दोन्ही प्रांतांमध्ये निष्णात असलेल्या शरद पवारांचे पुतणे अजित पवार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या नियमावलीवर मात करतील आणि कबड्डीवरील वर्चस्व टिकवण्यात यश मिळवतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. या पाश्र्वभूमीवर सोमवारी पुण्यात होणारी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारिणीची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
ताज्या घडामोडींनुसार, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदात अजित पवार व्यक्तिश: रस घेणार नाहीत; परंतु त्यांचे संघटनेवरील नियंत्रण मात्र निश्चितच असेल. त्यामुळे २८ एप्रिलला अपेक्षेप्रमाणेच राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. यात अजित पवार यांच्या विश्वासातील आणि संघटनेतील अनुभवी उपाध्यक्ष मदन पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या व्यक्तीला एकाच खेळाच्या राज्य संघटनेचे अध्यक्षपद सांभाळता येते. या तांत्रिक पेचामुळे अजित पवार यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षपद सोडावे लागले होते. त्यानंतर पवार राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणूक प्रक्रिया लांबणीवर ढकलून महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची घटनादुरुस्ती करतील आणि आपले कबड्डीवरील वर्चस्व टिकवतील, अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत होती; परंतु सोमवारी पुण्यात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या बैठकीत निवडणूक प्रक्रिया जाहीर होईल आणि मदन पाटील यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद सुपूर्ण करण्यात येईल. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अध्यक्षपदासाठी कबड्डीमधील वरिष्ठ वर्तुळातून सांगलीच्या मदन पाटील यांचे नाव अग्रेसर आहे. आता अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोधपणे पार पडेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा