माधव मंत्री हे सुनील गावस्कर यांचे मामा. गावस्कर यांच्या क्रिकेट कारकिर्दीत मंत्री यांचे मोठे योगदान मानले जाते. गावस्कर बालपणी प्रत्येक सुटीच्या दिवशी मंत्री यांच्या हिंदू कॉलनीमधील घरी जायचे. एका रविवारी मंत्री आपल्या सामन्यासाठी तयारी करून निघत असताना गावस्कर तिथे पोहोचले. मंत्री यांच्या कपाटातील अनेक कॅप पाहून गावस्कर यांना राहावले नाही आणि त्यांनी विचारले, ‘‘नानामामा यापैकी एक कॅप मला द्याल का?’’ तेव्हा मंत्री यांनी गावस्कर यांना खडे बोल सुनावले होते. ‘‘या कॅप्स गिफ्ट दिल्या जात नाहीत. यातील प्रत्येक कॅप मी मेहनतीने मिळवली आहे. तूसुद्धा मिळव.’’
पुढील हंगामात गावस्कर यांनी सेंट झेवियर्स हायस्कूलमधून खेळायला सुरुवात केली. प्रारंभी आठव्या स्थानावर फलंदाजी आणि गोलंदाजीची सुरुवात करण्याची जबाबदारी गावस्कर यांच्याकडे असायची. एका हंगामानंतर शाळेने त्यांच्याकडे सलामीवीर फलंदाजाची जबाबदारी सोपवली. मग एके दिवशी सायंकाळी गावस्कर मंत्री यांच्याकडे गेले होते. नवा स्वेटर आणि कॅप परिधान केलेले गावस्कर अतिशय रुबाबात मंत्री यांच्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले, ‘‘मामा, मी माझी कॅप मिळवली आहे आणि शालेय क्रिकेट स्पर्धा जिंकलो!’’
मुंबईकडून पदार्पण करण्यापूर्वी २४६ आणि २२२ अशी दोन द्विशतके गावस्कर यांनी शालेय दिवसांत झळकावली होती. यापैकी एका द्विशतकानंतर गावस्कर मंत्री यांच्या घरी गेले होते, तेव्हा मंत्री यांनी विचारले, ‘‘तू कसा बाद झालास?’’ गावस्कर यांनी अभिमानाने सांगितले की, ‘‘द्विशतक झळकावल्यावर मी माझी विकेट फेकली.’’ हे ऐकताच मंत्री यांनी रागाने गावस्कर यांना सांगितले, ‘‘आपली विकेट अशी द्यायची नसते, प्रतिस्पर्धी गोलंदाजाला ती मिळवता यायला हवी.’’ मंत्री यांचा तो मौलिक कानमंत्र गावस्कर यांना आपल्या कारकिर्दीत सदैव प्रेरणा द्यायचा.
गावस्कर यांनी आपल्या आत्मचरित्रात मांडलेला आणखी एक किस्सा सर्वश्रुत आहे. गावस्कर आणि शेजारील बेडवरील कोळ्याचे पोर बदलले गेले होते. परंतु गावस्कर यांच्या कानापाशी असलेली एक जन्मखूण मंत्री यांना माहीत होती. मंत्री यांनी त्वरेने इस्पितळ प्रशासनाला ही गोष्ट लक्षात आणून दिली. त्यामुळे मंत्री यांनी आपल्या भाच्याला अचूक ओळखले.
माधव मंत्री यांनीच मला क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित केले. मंत्री हे अतिशय शिस्तप्रिय होते. १९६६च्या दौऱ्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या मला संघात घेण्याविषयी पतौडी यांचे मन मंत्री यांनीच वळवले.
अजित वाडेकर, भारताचे माजी कर्णधार

माधव मंत्री हे मुंबईतील खेळाडूंसाठी कायम प्रेरणास्थान ठरले. मुंबई आणि भारतीय क्रिकेटचे ते सच्चे चाहते होते. माझ्यासारख्या क्रिकेट प्रशासकांनी त्यांनी कायम चांगले नाते जपले.
शरद पवार, माजी अध्यक्ष, बीसीसीआय

Story img Loader