रोनाल्डो, डॅनिलो, मार्सेलोचा गोल; ३-१ अशा विजयासह अव्वल
रिअल माद्रिदने झंझावाती खेळाची पुनरावृत्ती करताना ‘ला लिगा’ फुटबॉल स्पध्रेत सेल्टा विगो संघाचा विजयरथ रोखला. बॅलेडोस येथे झालेल्या लढतीत माद्रिदने ३-१ असा विजय मिळवून अव्वल स्थानही पटकावले. माद्रिदच्या खात्यात नऊ सामन्यांत २१ गुण जमा झाले असून त्यापाठोपाठ सेल्टा (१८) व बार्सिलोना (१८) यांचा क्रमांक येतो. ख्रिस्तियानो रोनाल्डो, डॅनिलो आणि मार्सेलो यांनी माद्रिदसाठी, तर नोलिटोने सेल्टासाठी एक गोल केला.
‘ला लिगा’ फुटबॉल स्पध्रेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान होण्यासाठी आतुर असलेल्या माद्रिद आणि सेल्टा यांच्यातील ही लढत अटीतटीची होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सामन्याअंती ती फोल ठरली. सामन्याच्या आठव्याच मिनिटाला रोनाल्डोने माद्रिदचे खाते उघडले. लुकास व्हॅक्युजच्या पासवर रोनाल्डोने अगदी सहज हा गोल केला. १८व्या मिनिटाला सेल्टाला सामन्यात बरोबरी करण्याची संधी आली होती, परंतु माद्रिदचा गोलरक्षक केयलर नेव्हासने ओरेलानाचा प्रयत्न हाणून पाडला.
अवघ्या पाच मिनिटांत डॅनिलोने जेस रॉड्रिग्सच्या पासवर गोल करून माद्रिदची आघाडी २-० अशी वाढवली. प्रचंड दबावाखालीही सेल्टाने दमदार खेळ कायम राखला. ३१व्या मिनिटाला त्यांना फ्री किक मिळाली आणि व्ॉसने ३० यार्डावरून टोलावलेला चेंडू पुन्हा एकदा नेव्हासने अडवून सेल्टाचा गोल होऊ दिला नाही.
मध्यंतरापर्यंत नेव्हासने भक्कम बचाव करत सेल्टाचे तीन प्रयत्न अपयशी ठरवले आणि माद्रिदची आघाडी कायम राखली. मध्यंतरानंतर सामन्यातील वातावरण तापले आणि यात सेल्टाच्या गुस्टाव्हो कॅब्रलला लाल कार्ड दाखवण्यात आले. सेल्टाला दहा खेळाडूंसह पुढील संघर्ष करावा लागला. ८५व्या मिनिटाला त्यांना यश मिळाले. प्लॅनासच्या पासवर नोलिटोने गोलरक्षक नेव्हासला चकवून सेल्टासाठी पहिला गोल नोंदवला. पण, त्यांचा हा आनंद क्षणिक होता. अवघ्या सहा मिनिटांत मार्सेलोने गोल करून माद्रिदचा विजय निश्चित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा