विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनची वाटचाल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आव्हाने कितीही कठीण असली तरी अनुभव तुमच्या पाठीशी असेल तर ही आव्हाने तुम्ही सहज मोडून काढू शकता असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. बुद्धिबळातील चौसष्ट घरांचा सम्राट म्हणून नावलौकिक मिळालेल्या मॅग्नस कार्लसन याच्याबाबत असेच म्हणावे लागेल. त्याने नुकत्याच झालेल्या विश्व अजिंक्यपद लढतीत आव्हानवीर सर्जी कर्जाकिन याच्यावर मात केली ती प्रामुख्याने त्याच्याकडे असलेल्या विश्व अजिंक्यपद लढतींचा गाढा अनुभवाच्या जोरावरच.

नॉर्वेचा ग्रँडमास्टर कार्लसन याने यंदा विश्वविजेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. असे सहसा म्हटले जाते, की विजेतेपद मिळविणे सोपे असते, मात्र ते टिकविणे हे अधिक कठीण असते. कार्लसन याने २०१३ पासून विश्वविजेतेपद टिकवीत खऱ्या अर्थाने आपण बुद्धिबळाचा अनभिषिक्त सम्राट असल्याचे दाखवून दिले आहे. कर्याकिन याने आव्हानवीर ठरविण्यासाठी झालेल्या स्पर्धेत विजेतेपद मिळविले व कार्लसन याचा आव्हानवीर होण्याचा मान मिळविला होता. कर्जाकिन याच्या तुलनेत कार्लसन याने विश्व अजिंक्यपदाच्या लढतींचा भरपूर अनुभव मिळविला आहे. हाच अनुभव त्याच्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरली. विशेषत: टायब्रेकर डावांमध्ये कार्लसन याला जे यश मिळाले ते त्याच्याकडे विश्वविजेतेपदासाठी असलेल्या कल्पक व्यूहरचनांच्या अनुभवामुळेच.

कार्लसन याने २०१३ मध्ये भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याच्यावर मात करीत कारकीर्दीतील पहिले विश्वविजेतेपद मिळविले. पुन्हा त्याने २०१४ मध्ये आनंद याचे आव्हान मोडून काढले आणि विश्वविजेतेपद राखले. साहजिकच त्याच्याकडे विश्वविजेतेपदाच्या लढतींचा भरपूर अनुभव होता. त्याचबरोबरच त्याने ब्लिट्झ व जलद स्वरूपांच्या जगज्जेतेपदाच्या लढतींमध्येही अव्वल स्थान घेतले होते. त्यामुळेच कर्याकिनविरुद्धच्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत त्याचे पारडे जड मानले जात होते.

कर्याकिन याने बारा डावांच्या या लढतीमधील आठव्या डावात सनसनाटी विजय मिळविला होता. त्या वेळी त्याच्या बाजूने लढत झुकली होती. या डावात कार्लसन याने केलेली अक्षम्य परंतु क्षुल्लक चूक त्याच्या अंगलटी आली. अर्थात कार्लसन याने दहावा डाव जिंकून पुन्हा बरोबरी साधली. बाराव्या डावात त्याला पांढऱ्या मोहरांनी खेळण्याची संधी होती. या डावात थोडासा धोका पत्करून विजय मिळविण्याची कार्लसन याला संधी होती. मात्र या डावात जोखीम पत्करणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण होण्यासारखेच आहे हे कार्लसन याने ओळखले होते. त्यातही हा डाव बरोबरीत सुटल्यानंतर टायब्रेकरमध्ये आपण कर्याकिन याच्यावर मात करू शकतो हा आत्मविश्वास त्याच्याकडे होता. त्यामुळेच त्याने बारावा डाव बरोबरीत सोडवीत लढतही बरोबरीत सोडविण्यावर भर दिला. बुद्धिबळामध्ये एखादी चूकही महागात ठरू शकते. या खेळात संयम, चिकाटी व एकाग्रता याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. टायब्रेकर डावांमध्ये नेमक्या याच गुणांबाबत कार्लसन हा वरचढ ठरला. वेळेच्या बंधनात चाली करण्यास महत्त्व आहे. कार्लसन याच्याकडे विश्वविजेतेपदाच्या लढतींचा अनुभव असल्यामुळे त्याने वेळेच्या बंधनात चाली करण्याबाबतचे कोणतेही दडपण घेतले नाही. कर्याकिन हा प्रथमच विश्वविजेतेपदासाठी लढत होता व त्यातही टायब्रेकर सुरू असल्यामुळे त्याच्यावर खूपच दडपण आले होते. कार्लसन याने कल्पकतेने डावपेच करीत कर्याकिन याला चुका करण्यास भाग पाडले. कार्लसन याचा भर जास्त करून प्रत्यक्ष लढतींमधील व्यूहरचनेवर होता. कर्याकिन याचा नियोजनबद्ध खेळावर भर होता. काही वेळा असे नियोजनही घातक ठरू शकते. कर्याकिन याच्याबाबत असेच घडले. टायब्रेकरमधील तिसऱ्या व चौथ्या डावांमध्ये कार्लसन याने या खेळावरील आपली मुलखावेगळी हुकमत सिद्ध केली. कर्याकिन यानेही बारा डावांमध्ये कार्लसन याला खूपच चांगली लढत दिली. या डावांपैकी केवळ एकच डाव त्याने गमावला यावरून त्याच्याकडील झुंजार शैलीचा प्रत्यय येऊ शकतो.

डावाच्या शेवटच्या टप्प्यात प्रत्येक खेळाडूची खरी कसोटी ठरत असते. कार्लसन हा शेवटच्या टप्प्यात खूपच अव्वल दर्जाचा खेळाडू मानला जातो. बॉबी फिशर, होजे कापाब्लॅन्का, अनातोली कापरेव्ह यांच्या खेळाशी त्याची तुलना केली जाते. यावरूनच त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. कार्लसन याच्या विजेतेपदामुळे नॉर्वेमधील बुद्धिबळ खेळास चालना मिळणार आहे. अवघ्या २६व्या वर्षी तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळविणे ही काही सोपी गोष्ट नाही. आनंदच्या करिअरकडे पाहिले तर कार्लसन याला आणखी किमान दहा-बारा वर्षे विश्वविजेतेपदाची संधी आहे. अर्थात अनेक युवा खेळाडू विश्वविजेतेपदाची दारे ठोठावत आहेत. आनंदसारखे प्रौढ खेळाडूही अजून आपल्यात विश्वविजेतेपद मिळविण्याची क्षमता आहे हे दाखवीत असतात. या आव्हानांना कार्लसन कसा सामोरा जातो हीच उत्सुकता राहणार आहे.

 

मिलिंद ढमढेरे

milind.dhamdhere@expressindia.com