नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (फिडे) आणि पाच वेळचा जगज्जेता मॅग्नस कार्लसन यांच्यातील वाद अधिकच चिघळताना दिसत आहे. कार्लसनने ‘फिडे’चे अध्यक्ष अर्कादी द्वोर्कोविच यांच्यावर आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आणि दिलेली वचने मोडण्याचा आरोप केला आहे. आता तुम्ही राजीनामा देणार का, असा सवालही त्याने उपस्थित केला.
‘फिडे’ आणि ‘फ्रीस्टाइल’ बुद्धिबळ टूरचे आयोजक यांच्यात सध्या संघर्ष सुरू आहे. कार्लसनची सहमालकी असणाऱ्या ‘फ्रीस्टाइल चेस प्लेयर्स क्लब’ने आपल्या खासगी स्पर्धेस ‘जागतिक अजिंक्यपद’ असे संबोधले आहे. याला ‘फिडे’ने तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
‘‘मी न्यूयॉर्क येथील जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद स्पर्धेत खेळावे यासाठी द्वोर्कोविच यांनी १९ डिसेंबर रोजी माझ्या वडिलांना पत्र लिहिले. ‘तुम्हाला आणि मॅग्नसला एक सांगू इच्छितो की ‘फिडे’ आणि ‘फ्रीस्टाइल’ टूरचे आयोजक यांच्यात जे काही होईल, त्याचा खेळाडूंवर कोणताही परिणाम होणार नाही. खेळाडू आपला निर्णय घेऊ शकतात. फिडे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही,’ असे द्वोर्कोविच यांनी त्या पत्रात नमूद केले होते. तसेच फिडेच्या समितीने माझ्या शब्दाचे पालन न केल्यास मी राजीनामा देईन, असेही द्वोर्कोविच यांनी सांगितले होते. परंतु आता ‘फ्रीस्टाइल’ टूरमध्ये खेळण्यावर निर्बंध घातले जात आहेत. जगज्जेतेपदाच्या लढतीकरिता पात्र राहण्यासाठी खेळाडूंना ‘फ्रीस्टाइल’ स्पर्धेत न खेळण्याच्या वचनपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे. आपले वचन न पाळल्याबद्दल आता द्वोर्कोविच राजीनामा देणार का,’’ असा प्रश्न कार्लसनने उपस्थित केला आहे.