वृत्तसंस्था, टोरंटो
‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत भारतीयांना जेतेपदाची फारशी संधी दिसत नसली, तरी प्रज्ञानंदकडून मला चांगली कामगिरी अपेक्षित आहे. जेतेपदासाठी फॅबियानो कारूआना आणि हिकारू नाकामुरा हे प्रमुख दावेदार आहेत, असे मत पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने व्यक्त केले.
‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेतील विजेत्या बुद्धिबळपटूला जागतिक अजिंक्यपद लढतीत जगज्जेत्या आव्हान देण्याची संधी मिळेल. ‘कॅन्डिडेट्स’च्या खुल्या विभागातील सहभागी आठ बुद्धिबळपटूंपैकी तीन भारतीय आहेत. यात आर. प्रज्ञानंद, डी. गुकेश आणि विदित गुजराथी यांचा समावेश आहे.
‘‘गुकेश जेतेपदाचा दावेदार आहे असे मला वाटत नाही. तो काही चांगले निकाल नोंदवू शकेल, पण काही सामन्यांत त्याला पराभव पत्करावा लागू शकेल. तो खूप वाईट कामगिरी करेल असे माझे म्हणणे नाही. मात्र, त्याच्याकडून फार अपेक्षाही केल्या जाऊ शकत नाही,’’ असे गुकेशविषयी कार्लसन म्हणाला.
हेही वाचा >>>हार्दिकचे कर्णधारपद धोक्यात? क्रिकेटवर्तुळात चर्चा; माजी क्रिकेटपटूंमध्ये मतमतांतरे
‘‘विदितने गेल्या काही काळात विशेषत: मानसिकदृष्ट्या खूप सुधारणा केली आहे. तो या स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी उतरेल. मात्र, तो विजेता होण्याची शक्यता कमी आहे. परंतु काही सनसनाटी निकाल नोंदवण्याची त्याच्यात निश्चित क्षमता आहे,’’ असे कार्लसनने नमूद केले.
प्रज्ञानंदविषयी कार्लसन म्हणाला, ‘‘प्रज्ञानंदला ही स्पर्धा जिंकण्याची फारशी संधी दिसत नाही. मात्र, तो फार वाईट कामगिरी करेल असेही नाही. तो मानसिकदृष्ट्या कणखर आहे. त्याच्या खेळात सुधारणा होत आहे आणि तो आपल्या खेळाकडे खूप गांर्भीयाने पाहतो. तो स्पर्धा जिंकण्यासाठी दावेदार नसला, तरी मला त्याच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे.’’
या स्पर्धेच्या संभाव्य विजेत्यांबद्दल कार्लसन म्हणाला, ‘‘फॅबियानोला जिंकण्याची उत्तम संधी आहे. पारंपरिक बुद्धिबळात त्याने आपला खेळ पुन्हा उंचावला आहे. हिकारूलाही जगज्जेता बनण्याची याहून चांगली संधी मिळणार नाही. माझ्या मते हिकारू व फॅबियानो जेतेपदाचे दोन मुख्य दावेदार आहेत.’’
प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेला बुधवारी टोरंटो, कॅनडा येथे सुरुवात झाली. उद्घाटन समारंभात भारताचा पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू आणि ‘फिडे’चा उपाध्यक्ष विश्वनाथन आनंदने सहभागी बुद्धिबळपटूंसह अन्य उपस्थितांना संबोधित केले. ‘‘प्रथमच खुल्या आणि महिला विभागातील ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा एकाच ठिकाणी होत असल्याचा आनंद आहे. मी या स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व बुद्धिबळपटूंना शुभेच्छा देतो. ‘कॅन्डिडेट्स’ला सुरुवात झाली असे मी घोषित करतो,’’ असे आनंद म्हणाला.