महाकबड्डी लीगच्या तिसऱ्या टप्प्यातील सामन्यांना गुरुवारपासून अलिबाग येथे सुरुवात होणार आहे. साखळी सामन्यांसाठी येथील आरसीएफ क्रीडा संकुल सज्ज झाले आहे. चार दिवस चालणाऱ्या या कबड्डी लीगसाठी संघ दाखल झाले आहेत. पुरुष गटात गुरुवारी रायगड आणि मुंबई यांच्यात, तर महिला गटात रत्नागिरी आणि बारामती संघांमध्ये लढत होणार आहे. विजयी प्रारंभ करण्यासाठी चारही संघांनी बुधवारी कसून सराव केला.
रायगड जिल्ह्य़ात आजवर अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. महाकबड्डी लीगच्या धर्तीवर जिल्ह्य़ात नुकत्याच पार पडलेल्या रायगड कबड्डी लीगलाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे महाकबड्डी लीगला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
‘‘महाकबड्डी लीगची तयारी पूर्ण झाली असून सामन्यांच्या तिकीट विक्रीलाही सुरुवात झाली आहे. सध्या तिकीट विक्रीला अपेक्षित प्रतिसाद मिळला नसला तरी सामन्यांना सुरुवात झाल्यावर प्रेक्षकांचा प्रतिसाद नक्की मिळेल’’, असा विश्वास रायगड कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह आस्वाद पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्ह्य़ातील बहुतांश भागांत मोठय़ा प्रमाणात कबड्डीची ओळख आहे. विजय म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, संजय म्हात्रे, आशीष म्हात्रे, सुधीर पाटील यांसारखे शिवछत्रपती पुरस्कार विजेते कबड्डीपटू रायगडच्याच मातीत घडले. त्यामुळे गावागावांत खेळला जाणारा आणि कमालीचा लोकप्रिय खेळ म्हणून कबड्डीची ओळख आहे. त्यामुळे कबड्डीचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या रायगडमध्ये महाकबड्डीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अलिबागमध्ये आजपासून महाकबड्डीचा थरार
महाकबड्डी लीगच्या तिसऱ्या टप्प्यातील सामन्यांना गुरुवारपासून अलिबाग येथे सुरुवात होणार आहे. साखळी सामन्यांसाठी येथील आरसीएफ क्रीडा संकुल सज्ज झाले आहे.
First published on: 28-05-2015 at 03:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha kabaddi league at alibaug