‘प्रो-कबड्डी’लीगच्या घवघवीत यशानंतर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने पहिल्यांदाच महाकबड्डी लीगचे आयोजन केले असून शुक्रवारपासून या स्पर्धेचा थरार दर्दी चाहत्यांना अनुभवता येणार आहे. राज्य कबड्डी असोसिएशन आणि मॅक्स गॉडविट कंपनी यांच्यांमध्ये पाच वर्षांचा करार झाला असून या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.
या स्पर्धेत पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी आठ संघ असणार असून त्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण १५ लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
ही स्पर्धा काही वर्षांमध्ये साता समुद्रापार नेण्याचा आयोजकांचा मानस आहे.
या स्पर्धेचे दोन मोसम खेळवण्यात येणार असून दुसरा मोसम नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये खेळवण्यात येणार आहे. पहिला मोसम १५ मे ते ७ जून दरम्यान मुंबई, रत्नागिरी, रायगड, पुणे या चार शहरांमध्ये होणार आहे, तर दुसरा मोसम ठाणे, बारामती, सांगली आणि अहमदनगर या ठिकाणी रंगणार आहे.
प्रत्येक संघामध्ये दहा खेळाडू असतील. खेळणाऱ्या सात खेळाडूंपैकी तीन खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील असतील तर अन्य चार खेळाडूंमध्ये जिल्हास्तरीय, कनिष्ठ गट, विद्यापीठ दर्जाच्या खेळाडूंचा सहभाग असेल. मुंबईत ही स्पर्धा वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या संकुलामध्ये होणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील कबड्डीचा आवाज हरवला होता, पण या स्पर्धेमुळे तो आवाज महाराष्ट्राला परत मिळणार आहे. ही स्पर्धा म्हणजे होतकरू खेळाडूंसाठी संस्कृतीपीठ असेल. देशाच्या इतिहासात महिला कबड्डीपटूंसाठी ही पहिलीच लीग असेल. सारेच खेळाडू ही स्पर्धा खेळभावनेने खेळतील, अशी मला आशा आहे.
-दत्ता पाथ्रीकर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा