प्रीमिअर लीग कबड्डी स्पर्धेप्रमाणेच राज्यातील कबड्डीची लोकप्रियता वाढविण्यासाठी यंदा महाकबड्डी लीग आयोजित केली जाणार आहे. या लीगसाठी येथे बुधवारी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात राजमाता जिजाऊ संघाची खेळाडू नेहा घाडगे ही सर्वात महाग खेळाडू ठरली आहे. ‘अ’ श्रेणी विभागात नेहा घाडगे हिला दोन लाख २८ हजार रुपयांच्या मानधनावर बारामती संघाने विकत घेतले आहे.
लीगसाठी महिलांमध्ये दीडशेहून अधिक खेळाडूंची नावे निश्चित करण्यात आली होती. खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे ‘अ’ व ‘ब’ श्रेणी विभागात त्यांची विभागणी करण्यात आली होती. घाडगे पाठोपाठ अभिलाषा म्हात्रे हिला २ लाख २६ हजार रुपयांचे मानधन लाभले. तिला रायगड संघाने विकत घेतले आहे. मुंबई संघाने सायली केरिपाळे हिला दोन लाख १० हजार रुपयांच्या मानधनावर विकत घेतले, तर राष्ट्रीय खेळाडू स्नेहल शिंदे हिला दोन लाख ८ हजार रुपयांची बोली लाभली. तिला ठाणे संघाने विकत घेतले. ‘ब’ श्रेणी विभागातील खेळाडूंमध्ये अपेक्षा टाकळे हिला रायगड संघाने ७८ हजार रुपयांचे मानधनावर विकत घेतले. अंकिता जगताप हिला ७४ हजार रुपयांचे मानधन लाभले असून तिला अहमदनगर संघाने विकत घेतले. स्नेहल माणिक शिंदे हिला बारामती संघाने ७२ हजार रुपयांची बोली लावून विकत घेतले. श्रद्धा पवार हिला ६४ हजार रुपयांची बोली लाभली. तिला पुणे संघाने विकत घेतले. ही लीग २५ मे ते ७ जून या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. पुणे, मुंबई, सांगली, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, बारामती व ठाणे या फ्रँचाईजींमध्ये ही स्पर्धा होत आहे.
नेहा घाडगे महाग खेळाडू
प्रीमिअर लीग कबड्डी स्पर्धेप्रमाणेच राज्यातील कबड्डीची लोकप्रियता वाढविण्यासाठी यंदा महाकबड्डी लीग आयोजित केली जाणार आहे.
First published on: 23-04-2015 at 04:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha kabaddi league neha ghadge