बैलगाडय़ांच्या शर्यतीपलीकडे गाडय़ांच्या शर्यतीची काहीही परंपरा नसलेल्या कोकणातील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चिकाटी, संशोधन आणि परिश्रमांच्या बळावरनिर्माण केलेली ‘महालक्ष्मी-४’ ही रेसिंग कार येत्या जुलैमध्ये लंडनच्या सिल्व्हर स्टोन सर्किट ट्रॅकवर धावणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या अपूर्व कामगिरीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, आय मेक फॉम्र्युला स्टुडंट या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे १९९८ पासून आयोजित केल्या जात असलेल्या या उपक्रमामध्ये पेट्रोल-डिझेल गटामध्ये भारतातून या एकमेव कारचा सहभाग राहणार आहे.

संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘एमएच ०८ रेसिंग’ हा चमू गेली चार वष्रे या कारची निर्मिती करत असून सुमारे २१० किलो वजनाची आणि आठ फूट लांबीची ही कार आता सिल्व्हर स्टोन सर्किट ट्रॅकवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे.

या चमूचे व्यवस्थापक धनंजय सरवेकर आणि गौरव निंबरे या विद्यार्थ्यांनी या संदर्भात सांगितले की, ‘‘जगभरातील सुमारे दीडशे विद्यापीठांमधील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी फक्त १०० वाक्यांत कारच्या तांत्रिक वैशिष्टय़ांची माहिती व व्यावसायिक गुणवत्ताही पटवून देण्याची अवघड परीक्षा द्यावी लागली. गेली चार वष्रे चालू असलेल्या या उपक्रमातील कारच्या बांधणीचे अंतिम टप्पे आणि प्रत्यक्ष ट्रॅकवरील चाचण्या किंवा सराव कोल्हापुरात होत असल्याने महालक्ष्मीचे नाव तिला देण्यात आले आहे.’’

‘‘कोल्हापूरमधील मोहिते रेसिंग अकादमी, महाविद्यालयाच्या प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष रवींद्र माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, प्रा. अच्युत राऊत इत्यादींनी वेळोवेळी मार्गदर्शन आणि आवश्यक साहाय्य केल्यामुळे हा टप्पा गाठणे शक्य झाला,’’ असे सरवेकर यांनी सांगितले.

रेसिंग कारचा आराखडा तयार करून प्रत्यक्ष निर्मितीच्या या उपक्रमाची मुहूर्तमेढ पाच वर्षांपूर्वी, २०१४ मध्ये या महाविद्यालयात शिकणाऱ्या निखिल कारेकर आणि विद्याधर दाते यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या ‘एमएच ०८ रेसिंग’ या चमूने केली. ऑटोमोबाइल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इत्यादी निरनिराळ्या शाखांमधील उत्साही तरुणांचा सहभाग असलेल्या या चमूने रेसिंग कार निर्माण करण्याचा ध्यास घेतला आणि पुढच्याच वर्षी, २०१५ मध्ये कोइम्बतूरच्या करी मोटर्स स्पीडवेच्या ट्रॅकवर ‘महालक्ष्मी-१’ ही रेसिंग कार उतरवली. तेथे झालेल्या ‘फॉम्र्युला डिझाइन चॅलेंज इंडिया २०१५’ या स्पर्धेत या गाडीला २१वे स्थान मिळाले. त्यातून ‘एमएच ०८ रेसिंग’च्या सदस्यांचा आत्मविश्वास इतका वाढला की, पुढच्याच वर्षी, देशातील फॉम्र्यरुला-१ ही जागतिक दर्जाची स्पर्धा भरवण्यात येणाऱ्या ग्रेटर नोइडा येथील बुद्धा इंटरनॅशनल सर्किटवर आयोजित ‘फॉम्र्युला स्टुडंट इंडिया २०१६’ या स्पर्धेत त्यांनी बनवलेली ‘महालक्ष्मी-२’ ही रेसिंग कार उतरवली आणि ती ‘द मोस्ट पॉप्युलर रेसिंगकार’ म्हणून गौरवण्यात आली. यानंतर २०१७ मध्ये कोइम्बतूरला आयोजित स्पर्धेत ‘महालक्ष्मी-३’  या कारने ‘बेस्ट डिझाइन कार’, तर गेल्या वर्षी बनवलेल्या ‘महालक्ष्मी-४’ या कारने ‘बेस्ट डिझाइन’ आणि ‘लाइटेस्ट रेस कार ऑफ इंडिया’ हे दोन्ही किताब पटकावले. हीच कार आवश्यक तांत्रिक बदल करून लंडनच्या स्पर्धेत धावणार आहे.

अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत ‘एमएच ०८ रेसिंग’च्या ४० सदस्यांचा चमू प्रणीत वाटवे याच्या नेतृत्वाखाली प्रथमच सहभागी होणार आहे. या क्षेत्रातील अत्याधुनिक तांत्रिक ज्ञान आणि सुविधांचा अभाव असूनही दैनंदिन अभ्यास, प्रात्यक्षिके, परीक्षा इत्यादीमधून कोणतीही सवलत न घेता अक्षरश: रात्रीचा दिवस करून त्यांनी निर्माण केलेल्या या कारची कामगिरी केवळ या चमूसाठी नव्हे, तर भारतासाठी लक्षवेधी ठरणार आहे.

‘‘विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळावा म्हणून महाविद्यालय अशा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देते. यातूनच जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर विद्यार्थ्यांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली ही निवड आमच्यासाठी गौरवाची आणि अभिमानास्पद बाब आहे,’’ असे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahalaxmi 4 racing car