महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशला दहा विकेट राखून पराभूत केले आणि रणजी क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने वाटचाल केली.
गहुंजे येथे झालेल्या या सामन्यात शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे प्रभावी गोलंदाजी करीत हिमाचलचा दुसरा डाव ३१९ धावांत गुंडाळला. पारस डोग्रा, अभिनव बाली व ऋषी धवन यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे हिमाचलने डावाचा पराभव टाळण्यात यश मिळविले हीच त्यांची जमेची बाजू ठरली. विजयासाठी आवश्यक असलेले साठ धावांचे लक्ष्य महाराष्ट्राने १३.१ षटकांत व एकही गडी न गमावता पार केले. त्यामुळे या सामन्यात महाराष्ट्राला एक बोनस गुणासह सात गुणांची कमाई झाली. महाराष्ट्राने २९ गुणांसह साखळी ‘क’ गटात आघाडी स्थान घेतले आहे.
पहिल्या डावात २६० धावांनी पिछाडीवर असलेल्या हिमाचलने १ बाद ९८ धावांवर दुसरा डाव बुधवारी पुढे सुरू केला. वरुण शर्मा व डोग्रा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. वरुणने सहा चौकारांसह ४४ धावा केल्या. डोग्राचे अर्धशतक १३२ चेंडूंमध्ये पूर्ण झाले, मात्र त्यानंतर तो फार वेळ टिकला नाही. त्याने सहा चौकार व एक षटकारासह ६२ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर बाली याने निखिल गंगटा (२८) याच्या साथीने ५७ धावांची भागीदारी केली. बालीने ७५ चेंडूंमध्ये ५४ धावा करताना आठ चौकार मारले. तो बाद झाल्यानंतर हिमाचलकडून मोठी भागीदारी झाली नाही. तथापि, धवन याने एका बाजूने आत्मविश्वासाने खेळ करीत ६२ धावा जमविल्या. त्यामुळे त्यांना डावाचा पराभव टाळता आला. चहापानापूर्वी हिमाचलचा डाव ३१९ धावांवर आटोपला.
महाराष्ट्राकडून अनुपम सकलेचा याने सर्वाधिक तीन बळी घेतले. हर्षद खडीवाले (नाबाद २६) व कर्णधार रोहित मोटवानी (नाबाद ३३) या महाराष्ट्राच्या सलामीवीरांनी विजयासाठी असलेले ६० धावांचे लक्ष्य सहज पार केले.
संक्षिप्त धावफलक
हिमाचल प्रदेश : २२८ व ३१९ (पारस डोग्रा ६२, अभिनव बाली ५४, ऋषी धवन ६०;अनुपम सकलेचा ३/७०)
महाराष्ट्र : ६ बाद ४८८ घोषित व बिनबाद ६३.
सांघिक कामगिरीचा विजय -भावे
‘‘साखळी गटात आमचा शेवटचा सामना ३० डिसेंबरपासून आसामविरुद्ध गुवाहाटी येथे होणार आहे. तेथील धुके व खराब हवामानाचा विचार करता निर्णायक विजय मिळविणे अवघड असल्यामुळे बाद फेरीसाठी हिमाचलविरुद्ध निर्णायक विजयाचेच आमचे ध्येय होते. हे लक्ष्य आमच्या खेळाडूंनी सांघिक कामगिरीच्या जोरावर सहज साध्य केले त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे,’’ असे महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांनी सांगितले.